Skip to main content
x

चिटणीस, हेमंत रामकृष्ण

      चिटणीस रामकृष्ण हे ठाण्यातील नामवंत वकील होते. त्यांचे सुपुत्र हेमंत चिटणीस यांचा जन्म मुंबई येथे झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील एम्. एच्. विद्यालयात तर पुढील शिक्षण  मुंबईतल्या  एलफिन्स्टन महाविद्यालयात झाले.  शिकत असतानाच म्हणजे  १९४३ मध्ये  ते पुण्यात वायुसेनेत दाखल झाले. १९४४ मध्ये त्यांची नियुक्ती  सिकंदराबादला  झाली. अंबाला, पेशावर इत्यादी ठिकाणी ते काही काळ होते. नंतर त्यांना ब्रह्मदेशावर झालेले जपानी आक्रमण थोपवण्यासाठी रंगूनला पाठवण्यात आले.

     १९४६ मध्ये चिटणीस कलकत्ता येथे परतले आणि तेथून उड्डाण प्रशिक्षक अभ्यासक्रमासाठी इंग्लंडला गेले. हा सात महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते भारतात परत आले. त्यांच्या प्रयत्नाने १९४७ मध्ये अंबाला येथे ‘फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स स्कूल’ची स्थापना झाली. १९५२-५२ च्या दरम्यान त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेत वायुसेना विभागाची स्थापना मुंबईत केली. १९५२ ते १९५४ या काळात जोधपूर अ‍ॅकॅडमीत स्क्वॉड्रन लीडर म्हणून त्यांना बढती मिळाली. हैद्राबादेतील हकीम पेठमधील तळावर असिस्टंट डायरेक्टर ऑफ फोरकास्टिंग अँड प्लॅनिंग आणि हंटर विमानाचे  स्क्वॉड्रन लीडर म्हणून १९६० पर्यंत त्यांनी काम पाहिले. १९६० मध्ये विंग कमांडर म्हणून दिल्ली येथे मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये त्यांची बदली झाली. ते ‘जॉईंट आपरेशन कमांड’मध्ये कार्यरत होते.

     याच काळात चिटणीस वेलिंग्टन येथे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये दाखल झाले व १९६१-६२ मध्ये तेथील परीक्षा उत्तीर्ण झाले. १९६२ मध्ये चिनी आक्रमणाच्या काळात त्यांची नियुक्ती दिल्लीला सेनाध्यक्षांच्या समितीवर झाली. १९६३ मध्ये चुम्बी व सिलिगुडी नेक येथे चिनी आक्रमणाची शक्यता ध्यानात घेऊन त्यांची बदली वडोदरा वायुदलाच्या तळावर झाली. १९६५ मध्ये चिटणीस दिल्लीला परत आले. त्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाची पदे भूषविली. वायुसेनेतील सैनिकांची वेतन आयोगाला द्यावयाची कैफियत त्यांनी तयार केली.

     १९६९ मध्ये चिटणीस यांना वायुसेनेचे पहिले पदक एअर मार्शल अर्जनसिंग यांच्या हस्ते मिळाले. नंतर त्यांना एअर व्हाईस मार्शल म्हणून पदोन्नती मिळाली व ते एअर चीफ मार्शल मुळगांवकर यांच्या हाताखाली ‘असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ - प्लॅनिंग’ म्हणून दिल्लीस आले. त्यांच्या काळात जग्वार विमाने वायुसेनेने खरेदी केली.

     १९७४ मध्ये त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. भारत सरकारने १९७७ मध्ये त्यांना अमेरिकेत आंतरराष्ट्रीय संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी पाठविले. १९७८ मध्ये त्यांना एअर मार्शल पद मिळाले. दुरुस्ती व देखभाल (मेटेनन्स) विभागात ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ म्हणून त्यांची नागपूरला नियुक्ती झाली. हंटर, जग्वार इत्यादी विमानांचा वायुसेनेत समावेश, प्रशिक्षक शाळा (इन्स्ट्रक्टर्स  स्कूल), सुधारित वेतनश्रेणी इत्यादी सुधारणा त्यांनी केल्या.

     त्यांची उत्कृष्ट सेवा लक्षात घेऊन सरकारने २६ जानेवारी १९८० रोजी त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करून त्यांचा गौरव केला. लगेचच २९ फेब्रुवारी १९८० रोजी एअर मार्शल हेमंत चिटणीस सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी इतर क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंटची त्यांनी शून्यातून सुरुवात केली. तंत्र शिक्षण विभागाकडूनही या संस्थेला मान्यता मिळाली. कुक्कुटपालन व्यवसायातील विविध विषयांचे प्रशिक्षण आज या संस्थेतून दिले जाते.

     चिटणीस यांचे थोरले चिरंजीव अजय चिटणीस यांनी नौसेनेच्या वायुदलात वैमानिक म्हणून काम केले. त्यांनाही १९८४ मध्ये शौर्यचक्र मिळाले. चिटणीस यांचे धाकटे पुत्र अमोल चिटणीस हेही १९७० मध्ये नौसेनेच्या वायुदलामध्ये दाखल झाले. हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून काम करताना त्यांनीही अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला.

- वर्षा जोशी-आठवले

चिटणीस, हेमंत रामकृष्ण