Skip to main content
x

दाभोळकर, दत्तप्रसाद अच्युत

      दत्तप्रसाद अच्युत दाभोळकर यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे सर्व शालेय शिक्षण तेथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत कीर्ती महाविद्यालय आणि रुपारेल महाविद्यालय येथे पार पडले. १९६२ साली सेंद्रिय रसायन (ऑरगॅनिक केमिस्ट्री) या विषयात त्यांनी एम.एस्सी. पदवी मिळवली. या विषयात ते मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात पहिले आले. एम.एस्सी. झाल्याबरोबर ताबडतोब ते ‘सीबा रिसर्च सेंटर’ येथे ‘साहाय्यक संशोधक’ म्हणून काम करू लागले. १९७० सालापर्यंत ते तेथे कार्यरत होते. त्याच दरम्यान त्यांनी डॉ. नरगुंद यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. १९६७ साली मिळवली. पीएच.डी.साठी त्यांनी ‘सिंथेसिस ऑफ न्यू पोटेन्शियली अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅन्टी हिस्टेमिनिक कम्पाउण्ड्स’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला.

     १९७० साली त्यांनी मुंबई सोडली आणि ते जे.के. सिंथेटिक्स, कोटा (राजस्थान) संचालित ‘सर पदमपत रिसर्च सेंटर’ येथे ‘पॉलिमर केमिस्ट्री अ‍ॅण्ड मटेरियल सायन्सेस’ या विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. १९७९ सालापर्यंत ते या केंद्रात कार्यरत होते. दाभोळकरांच्या संशोधन कारकिर्दीतला तो पहिला टप्पा आहे. या कंपनीतर्फे पालिएस्टर, नायलॉन, नायलॉन टायर कॉर्ड, अ‍ॅक्रिलिक या सर्व मानवनिर्मित (कृत्रिम) धाग्यांचे उत्पादन केले जायचे. या उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे अनेक साहाय्यक पदार्थ आयात केलेले असत. ज्या पदार्थांची जागतिक एकस्वाची मुदत संपली असेल त्याचे पृथक्करण करून आणि त्याचा सखोल अभ्यास करून, त्या पदार्थांची रासायनिक रचना समजून घेवून त्या पदार्थांचे भारतात उत्पादन करण्यास सुरुवात या कंपनीमध्ये करण्यात आली. अशांपैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ‘अ‍ॅनॉक्स गॅमा.’

      डॉ. दाभोळकर कोटा येथे कार्यरत असताना, त्यांनी केलेले महत्त्वाचे संशोधन म्हणजे पॉलिएस्टर आणि नायलॉन यांच्या वाया जाणाऱ्या भागातून ते पदार्थ ज्यांच्यापासून तयार केले ते पदार्थ म्हणजे ‘मोनामर’ किंवा त्याचे मूळ घटक पदार्थ, पुन्हा शुद्ध स्वरूपात मिळवणे. त्याचा उपयोग पुन्हा पॉलिएस्टर, नायलॉन यांचे पुन्हा उत्पादन करण्यासाठी होऊ शकतो. अशा पद्धतीची दर दिवशी प्रत्येकी तीन टन पॉलिएस्टर आणि नायलॉन फुकट जाणाऱ्या पदार्थापासून मिळणारे प्लांट्स भारतात प्रथमच कोटा येथे जे.के. सिंथेटिक्स या कंपनीत कार्यरत झाले. पॉलिएस्टर आणि नायलॉन उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी नंतर त्यांचे अनुकरण केले. हे सर्व संशोधन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एकस्वे घेऊन सुरक्षित करण्यात आले. ‘पॉलिएस्टर वेस्ट रिकव्हरी’ याविषयी जगभरात अनेकांनी एकस्वे घेतली; पण त्यांचे उत्पादन सत्तर टक्के ते नव्वद टक्क्यांपर्यंत होते. दाभोळकरांनी मिळवलेल्या एकस्वाच्या पद्धतीनुसार हे उत्पादन नव्याण्णव टक्के मिळत होते. ही कामगिरी अजोड अशीच आहे. पॉलिइथिलिन टेरेपॅथलेट वेस्टपासून सुधारित पद्धतीने डायमिथाइल टेरेपॅथलेट मिळवण्याची पद्धत, सिंथेटिक फिल्मच्या टाकाऊ भागाचे उपयुक्त पदार्थात रूपांतर करण्याची पद्धत आणि पॉलिइथिलिन टेरेपॅथलेटच्या टाकाऊ पदार्थाचे उपयुक्त अशा मिथाइल हायड्रॉक्सी इथाइल टेटेपॅथलेटमध्ये रूपांतर करण्याची पद्धत, अशी तीन महत्त्वपूर्ण एकस्वे दाभोळकरांच्या नावावर आहेत.

     १९७९ साली दाभोळकरांनी कोटा येथील नोकरी सोडली आणि दिल्ली येथील ‘श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च’ येथे रुजू झाले. या संशोधन संस्थेत मे १९७९ ते मार्च १९९० सालापर्यंत संयुक्त संचालक होते. ते एप्रिल १९९० ते मे २००२ सालापर्यंत संचालक म्हणून कार्यरत होते. श्रीराम इन्स्टिट्यूट ही एक वेगळी संशोधन संस्था आहे, येथे कोणाही व्यक्ती किंवा संस्थेकडून अनुदान वा मदत घेता येत नाही. नव्या पदार्थाच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान विकसित करणे, जुन्या पदार्थाच्या निर्मितीसाठी सोपी व नवी पद्धत शोधणे, आयात पदार्थांना पर्याय शोधणे (एकस्वाचे उल्लंघन न करता), जनसामान्यांना उपयोगी पडणारे वेगळे पदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे अशी कामे करून व ते तंत्रज्ञान विकून त्यांतून संस्थेचा सर्व खर्च भागवणे, असे कार्य करू शकणारे वैज्ञानिक तयार करणे आणि त्यांचे वेगवेगळे गट करून त्यांच्या माध्यमातून ही संस्था संपूर्णपणे स्वयंपूर्ण बनवणे. या संकल्पनेप्रमाणे येथे कार्य चालते. येथील संचालकाचे हे मुख्य कार्य होते आणि आहे. ते कार्य डॉ. दाभोळकरांनी यशस्विरीत्या पार पाडले आहे. एवढेच नव्हे, तर संस्थेची एक शाखा बंगळुरू येथे उभी करून तीसुद्धा स्वयंपूर्ण करण्यात दाभोळकरांचा महत्त्वाचा वाटा आहे.

     भारतात ए.बी.एस. प्लॅस्टिक कोणीही बनवले तरी ते श्रीराम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या आणि नॅशनल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एन.आर.डी.सी.) माध्यमातून विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारितच असे. त्याचे स्वामित्वधन (रॉयल्टी) संस्थेला मिळत असे. याविषयी सर्व एकस्वे श्रीराम इन्स्टिट्यूटच्या नावे आहेत. श्रीराम इन्स्टिट्यूटने एन.आर.डी.सी. आणि न्यूकेम प्लॅस्टिक (गुरगाव) यांच्याबरोबर संयुक्तपणे काम करून पॉलिकार्बोनेट तयार करण्याची नवीन पद्धत विकसित केली. त्याचप्रमाणे हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरीन तयार करण्यासाठी नवीन प्रक्रिया संयुक्तपणे विकसित केली आणि त्याची तीस एकस्वे घेतली. याखेरीज, तांदळाच्या टरफलापासून सिलिका बनवणे, निवडुंगाच्या चिकापासून खास प्रकारचे रंग बनवणे इत्यादी आणखी अनेक विषयांवर त्यांनी संशोधन केलेले आहे.

     अंटार्क्टिकावरील कायम निवासस्थान लाकडाचे बनलेले होते. एवढ्या उंचीच्या जागी नेहमीचे रंग वापरता येत नव्हते. तेव्हा दाभोळकरांनी स्वत: तिथे चार महिने राहून, तेथील वातावरणात काम करील असा रंग बनवला आणि त्याचा उपयोग केला गेला. त्यांनी अनेक उद्योजकांनाही वेगवेगळी उत्पादने यशस्वीपणे विकसित करून दिली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘विज्ञानेश्वरी’ या पुस्तकाचे हिंदी रूपांतर झालेले आहे, तर ‘माते नर्मदे’ या पुस्तकाच्या हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेतील आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत.

     दाभोळकरांच्या नावावर शंभराहून अधिक एकस्वे आहेत, तसेच अनेक संशोधनपर लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीस विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केलेली आहे. दाभोळकरांना ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्टी’, ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक्स अ‍ॅण्ड रबर्स’ आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल्स’ या तीन आंतरराष्ट्रीय संस्थांची फेलोशिप मिळाली होती. औद्यागिक संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दाभोळकरांना फाय फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे.

- गार्गी लागू

- दिलीप हेर्लेकर

दाभोळकर, दत्तप्रसाद अच्युत