Skip to main content
x

देशपांडे, ब्रम्हानंद श्रीकृष्ण

डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे यांचा जन्म रिसोड (जि. वाशिम) येथे झाला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील वतनदार असलेल्या ब्रह्मानंद देशपांडे यांचे वडील श्रीकृष्ण रामचंद्र देशपांडे जळगावकर हे रिसोड येथे शिक्षक होते. रिसोड येथे प्रारंभीचे शिक्षण झाल्यानंतर मध्य प्रदेशातील सागर येथील हरिसिंग गौर विश्वविद्यालयातून १९६३ साली बी.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. याच विद्यापीठातून त्यांनी १९६५ मध्ये प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती तसेच नागपूर विद्यापीठातून १९७१ मध्ये आधुनिक इतिहास घेऊन एम.ए. ही पदवी मिळविली. १९६५-१९६६ साली प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण तसेच १९६६-१९६७ या दरम्यान औरंगाबाद तसेच १९६७-१९६९ दरम्यान नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात अध्यापक म्हणून नोकरी केली. १९६९ ते २००० या दरम्यान सेवानिवृत्त होईपर्यंत औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात अध्यापक म्हणून काम केले.

शिक्षणाच्या निमित्ताने डॉ. ब्रह्मानंद देशपांडे मध्य प्रदेशातल्या सागर येथे वास्तव्य करून होते. रायपूरला त्यांच्या बंधूंकडे त्यांचे शिक्षणासाठी वास्तव्य होते. त्यामुळे त्यांचे हिंदी साहित्यावर प्रभुत्व प्रस्थापित झाले. नागपुरात शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने संस्कृत भाषेचा परिचय झाला. इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. पैठण येथल्या महाविद्यालयात नोकरीच्या काळात ते महानुभाव आश्रमात जाऊन बसत असत. त्या काळात आणि ‘देवगिरीचे यादव’ या ग्रंथाच्या निर्मितीच्या निमित्ताने त्यांचा महानुभाव साहित्याचा विशेष अभ्यास झाला. या अभ्यासातूनच ते महानुभाव साहित्याच्या प्रेमात पडले. तो त्यांच्या निदिध्यासाचा विषय झाला.

डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या इतिहास संशोधनाचे दोन विभाग करता येतात. एक - महानुभाव पंथ आणि त्याचे साहित्य आणि दोन - प्राचीन भारत विशेषत: प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या अभ्यास विषयाचे मध्ययुगीन साहित्याशी एकात्म नाते आहे, याची जाणीव ठेवून डॉ. देशपांडे यांनी संशोधन केले आहे. डॉ. देशपांडे यांचे शिक्षण मध्य प्रदेशात झाले. त्यांच्या भाषेवर संस्कार झाले ते हिंदीचे, पण त्यांनी महानुभाव साहित्याचा अभ्यास जिद्दीने केला. महानुभाव साहित्याचे अंतरंग जाणून घेतले. सकळी, सुंदरी या लिप्या शिकले. यादव काळाचा अभ्यास करताना ते या साहित्याकडे आकृष्ट झाले. ‘चक्रपाणी चिंतन’ या ग्रंथाला त्यांनी डॉ. रा.चिं. ढेरे यांनी मांडलेल्या महानुभाव पंथविषयक अपसिद्धान्ताचे झडाडून खंडण केले. ‘शब्दवेध’ या ग्रंथातून त्यांनी प्राचीन मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती मांडल्या. केशिराज बासांचे ‘रत्नमाला स्तोत्र’ हे काव्य संपादित केले. ‘लीळाचरित्र एकांक’ आणि ‘श्रीगोविंदप्रभु चरित्र’ हे त्यांनी संपादित केलेले आणखी दोन महानुभावीय ग्रंथ. महानुभाव साहित्याचे जे बोटावर मोजण्याइतके साक्षेपी संशोधक आहेत, त्यांत ब्रह्मानंद देशपांडे यांचे नाव घेतले जाते. औरंगाबादहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘महानुभाव’ मासिकाचे ते काही काळ संपादकही होते. सप्तपर्णी, तीन शोधनिबंध आणि महानुभावीय शोधनिबंध खंड पहिला; हे तीन ग्रंथ त्यांचा महानुभावीय साहित्यावरचा अभ्यास व अधिकार प्रदर्शित करणारे आहेत.

प्राचीन भारत आणि विशेषत: प्राचीन महाराष्ट्र हे त्यांच्या अभ्यासाचे आणखी एक क्षेत्र. त्यांच्या ‘देवगिरीचे यादव’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ब्रह्मानंदांचा खरा प्रांत शिलालेख, ताम्रपटाचा. त्यासाठी त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. ते फार शिस्तप्रिय अध्यापक होते. शिलालेख वा ताम्रपट सापडताच ते घाईघाईने प्रकाशित करून स्वत:च्या नावाचा उदोउदो करणे त्यांना जमले नाही. त्या लेखाचा ते सगळ्या अंगांनी अभ्यास करत. अतिशय साक्षेपाने त्यांचे संपादन भाष्य लिहीत. त्यामुळे त्यांचे संपादन खोडून काढणे अशक्यप्राय आहे. आधीच्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेले शिलालेख, ताम्रपट यांचाही ते सूक्ष्म अभ्यास करत. त्यांतील त्रुटी दाखवत. नवीन विवेचन सादर करत. डॉ. मो.गं. दीक्षित, म.म.वा.वि. मिराशी, डॉ. वाल्टर स्पिंक यांच्यासारख्या दिग्गजांच्या लेखनावर त्यांनी साक्षेपाने विवेचन केले आहे. त्यांच्या लेखांचे पाच संग्रह ‘शोधमुद्रा’ नावाने प्रसिद्ध झाले आहेत.

महाराष्ट्रावर आधिपत्य गाजविणाऱ्या जवळ-जवळ सर्व राजघराण्यांचा डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी अभ्यास केलेला दिसतो. त्यामध्ये सातवाहनांपासून यादव-शिलाहारपर्यंत अनेक राजघराण्यांचा समावेश आहे. या दोहोंमधील वाकाटक-चालुक्य-राष्ट्रकूटादी राजघराण्यांच्या काळातील महाराष्ट्र हा विषय त्यांनी आपल्या अभ्यासाचा विषय बनविला. तसेच त्रैकूटक, सिंद, विदर्भाचे राष्ट्रकूट, कलचूरी, परमार आदी महाराष्ट्राच्या संदर्भात तुलनेने कमी महत्त्वाच्या राजघराण्यांवरही आपली संशोधकीय लेखणी चालविलेली दिसते. वाकाटकांच्या संदर्भात वाकाटक नृपती हरिषेण एक पुनर्मूल्यांकन (शोधमुद्रा-२), खानदेश आणि वाकाटक राजवंश (शोधमुद्रा-३) आणि वाकाटक-त्रैकूटक संबंध (शोधमुद्रा-४) हे तीन लेख विशेष उल्लेखनीय होत. ‘वाकाटक नृपती हरिषेण - एक पुनर्मूल्यांकन’ हा त्यांचा लेख अमेरिकी विद्वान डॉ.वाल्टर स्पिंक यांच्या अजिंठ्याविषयक लेखाचा प्रतिवाद करण्यासाठी लिहिला गेला. मिराशी-शोभना गोखले यांच्या मतांमधील विसंगती ब्रह्मानंदांनी अचूकपणे हेरतात. गोखले व वॉल्टर स्पिंक यांनी अजिंठा लेणे क्र.१६ मधील शिलालेखात ‘त्रिकूटलाटांध्रापरांत’ असे केलेले वाचन हे छंदशास्त्राच्या आधारे चुकीचे कसे आहे, हे सांगून हरिषेणाचा अपरांत विजय ते त्याज्य ठरवितात. डॉ.देशपांडे दशकुमारचरितातील कथानकाचा हरिषेणाशी काहीही संबंध नाही, हे सिद्ध करून वाल्टर स्पिंकचा हरिषेणाच्या मृत्यूच्या आधारे अजिंठा लेण्याचा काळ नक्की करण्याच्या सिद्धान्तालाच आव्हान देतात. ‘वज्रटाची समस्या’ या लेखात डॉ. देशपांडे राष्ट्रकूट ताम्रपटांमध्ये दंतीदुर्गाने पराभूत केलेल्या कर्णाट सैन्याने पराभूत केलेल्या, ज्या वज्रट या राजाचे नाव येते, तो वज्रट कोण या समस्येचा विचार मांडला आहे.

राष्ट्रकूट नृपतींची मानपूर राजधानी, राष्ट्रकूटांच्या इतिहासातील एक कोडे (शोधमुद्रा-२), विदर्भाचे राष्ट्रकूट, राष्ट्रकूट परबलाचा पठारी स्तंभलेख (शोधमुद्रा-३), राष्ट्रकूट नृपती नित्यवर्ष खोट्टिगदेव याचा लोणी ताम्रपट (शोधमुद्रा-४) या राष्ट्रकूट घराण्यासंबंधीच्या लेखांबरोबरच चालुक्य नृपती सोमेश्वर तृतीय भूलोकमल्ल याचा धर्मापुरी शिलालेख, परमार राजकुल आणि मराठवाडा- एक अभ्यास (शोधमुद्रा-१) यांद्वारे महाराष्ट्रातील इतर राजवटींसंबंधी चर्चा केली आहे. शिलालेखांत येणार्‍या धान्यकटक, भारशिव, पातालमल्ल आणि कपालसंधि, पिवळे जांभुळ, गंधवारण, आदिआछिपलेआ, मरुवक्कसर्प, छदाम, आसु, दाम आणि विसोबा आदी शब्दांचासुद्धा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. ब्रह्मानंद देशपांडे यांचे स्वत:चेच अध्ययन अतिशय चौफेर आहे. ते एका शिलालेखाचा इतर अनेक लेखांशी, इतिहासाशी असलेला संबंध स्पष्ट करतात. असे संबंध स्पष्ट करताना निरनिराळ्या ऐतिहासिक समजुती बदलून टाकतात. आजतागायतची समजूत अशी की घारापुरी येथील लेणी कलचुरींची आहेत. ब्रह्मानंदांनी ती चालुक्यांची ठरविली आहेत. मराठवाड्यातील परमार राजवंशाच्या संचाराकडे त्यांनी लक्ष वेधले. शिलालेखाच्या समकालीन जैन, संस्कृत आणि महानुभाव वाङ्मयांशी असलेला सांधा त्यांनी स्पष्ट केला.

राष्ट्रकूटांनंतर यादव राजवटीची चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण त्याहीपूर्वी एका महत्त्वाच्या प्रश्नाची दखल घेणे आवश्यक ठरते. तो म्हणजे मराठीमधील आद्य शिलालेखाचा. या प्रश्नाची सविस्तर चर्चा ब्रह्मानंद त्यांच्या ‘मराठीतील पहिला शिलालेख कोणता?’ (शोधमुद्रा-२) या लेखामधून करतात. श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीच्या किंवा गोमटेश्वराच्या पायाशी ‘श्रीचावुंडराजे करवियले’ आणि ‘श्रीगंगराजे सुत्ताले करवियेले’ असे दोन शिलालेख आहेत. त्यांच्यातील पहिला शिलालेख हा मराठीतील आद्य शिलालेख असल्याची सर्वसाधारण समजूत आहे. याच परिसरात सापडलेल्या कन्नड आणि तामिळ शिलालेखांची मदत ब्रह्मानंद यांनी घेतली. त्यामुळे आद्यत्वाचा प्रश्न सुटायला मदत तर झालीच शिवाय मराठी अभ्यासकांनी कन्नड व तमिळ शिलालेखांकडे केलेला कानाडोळा याच्याकडेही लक्ष वेधले जाते. मराठी लेखांप्रमाणे कन्नड लेखांचा अभ्यास केला असता त्यांच्यातील अक्षरविन्यास भेदामुळे ते वेगवेगळ्या काळी लिहिले गेले असल्याचे स्पष्ट होते. ब्रह्मानंद असे मानतात की, ‘चावुंडराजे करवियले’ हा मराठी लेख कन्नड आणि तमिळ लेखाबरोबर शके ९०५ मध्ये कोरला गेलेला आहे.

यादवकालीन ताम्रपट, शिलालेख आणि महानुभावादी साहित्य यांच्या अभ्यासाचा पूर्ण परिपाक ब्रह्मानंदांच्या ‘देवगिरीच्या राजवंशावर नवीन प्रकाश’ या लेखात दिसून येतो. (शोधमुद्रा-२). यादव राजवंशाविषयीच्या काही गैरसमजांचे निराकरणही त्यांनी केले आहे. यात एक प्रमुख गैरसमज रामदेवराव यादवाबद्दल आहे. आमणदेवाला कपटाने पदच्युत करून रामदेवराव राज्यावर आला, हा तो समज होय. रामचंद्रदेवाने देवगिरी दुर्गात नाचे लोकांचा वेष घेऊन प्रवेश केला आणि आमणदेव नाचगाण्याचा आस्वाद घेत असताना त्याला कपटाने ठार मारले असा गैरसमज पुरुषोत्तमपुरी ताम्रपटाच्या चुकीच्या वाचनामुळे प्रस्तुत केला आहे. डॉ. मिराशींचा हा गैरसमज मूळच्या ‘वृत्त’ हा शब्द चुकीने ‘नृत्त’ असा वाचल्यामुळे झाल्याचे ब्रह्मानंद यांनी दाखवून दिले आहे. वस्तुत: दुर्गाबाहेर घनघोर युद्ध झाले व त्यात तटाला शिड्या लावून रामदेवाचे सैन्य आत शिरले, यात कपट काहीच नाही.

यादवांची शिलाताम्रशासने गोळा करण्यासाठी ब्रह्मनंदांनी अपार भटकंती केली. अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक संग्रहालयातील आईरमदेव यादवाचा ताम्रपट त्यांनी संपादित केला (शोधमुद्रा-३). या ताम्रपटाचे संपादन करताना त्यांनी यादवांच्या आईरमदेवापर्यंतच्या सर्व उपलब्ध शिलाताम्रशासनांचा धांडोळा घेतला. दृढप्रहारसारखा नवा वीर कसा पुढे आला, त्या वेळी राजकीय परिस्थिती त्याला कशी अनुकूल होती, याचे यथायोग्य विवेचन त्यांनी दिले आहे. महाकुमार सिंघणदेव आणि त्याचा चनई शिलालेख यांचा आईरमदेवाच्या आश्वी आणि अहमदनगर संग्रहालय ताम्रपट यांच्याशी त्यांनी सुरेख मेळ घातला. अंबाजोगाई येथील संगीत मशीद शिलालेखही त्यांनी सिंघणदेव प्रथम याचा ठरविला आहे. कल्याणी येथील चालुक्य राजवंशात गृहकलह लागला, त्यामुळे सिन्नर येथील सेऊणदेशकर यादव याचे महत्त्व कसे वाढले, ते मराठवाड्याच्या दिशेने पुढे कसे सरकले, सेऊणदेशकर यादव सिंघणदेव प्रथम याच्या काळापासून देवगिरीकर कसे झाले, यांचे अतिशय साक्षेपी विवेचन त्यांंनी केले आहे.

डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी दोन महत्त्वाची संपादने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात पूर्णत्वास नेली. त्यांपैकी पहिले म्हणजे त्यांनी संपादित केलेला ‘इतिहासाचार्य वि.का. राजवाडे समग्र साहित्य - खंड चौथा : अभिलेख संशोधन’ हा ग्रंथ होय. वि.का. राजवाडे हे जरी इतिहासकार म्हणून ओळखले जात असले तरी मराठी भाषा व वाङ्मय यांविषयी त्यांच्या मनात असलेल्या उत्कट जिज्ञासू वृत्तीपोटी ते मराठीच्या उत्पत्ती विषयीचे संशोधन करण्यास प्रवृत्त झाले. त्यातूनच ते महाराष्ट्रातील शिलाताम्रशासनांच्या अभ्यासाकडे वळले. राजवाडे यांनी संपादलेले लेख बहुधा यादवकालीन अथवा यादवोत्तरकालीन मराठी भाषेतील आहेत. काही थोडे संस्कृत आहेत. संस्कृत, प्राकृत आणि मराठी या तिन्ही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. ते पट्टीचे वैयाकरणी होते. त्यांनी प्रकाशित केलेल्या सर्व शिलाताम्रशासनाचा नव्याने आढावा घेऊन आणि काळाच्या ओघात नव्याने उजेडात आलेल्या संशोधनाची जोड देऊन डॉ.ब्रह्मानंद देशपांडे यांनी या ग्रंथाचे  साक्षेपी संपादन केले आहे. डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी संपादित केलेला दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे भारत इतिहास संशोधन मंडळाने प्रकाशित केलेले दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचे चार खंड. इतिहास तज्ज्ञ ग.ह. खरे व मो.गं. दीक्षित यांनी संपादित केलेले ग्रंथ प्रकाशित होऊन बराच कालखंड लोटला होता. खरे, मिराशी, दीक्षित यांच्या संपादनातील चुका, त्यांचे चुकलेले वाचन, नव्याने उजेडात आलेली इतर शिलाताम्रशासने इत्यादींचा आढावा घेत देशपांडे यांनी अतिशय उत्तम तर्‍हेने हे खंड संपादित केले आहेत.

डॉ. ब्रह्मानंद देशपांडे हे औरंगाबादचे रहिवासी. पर्यटन हा त्यांचा आवडीचा विषय. अजिंठा, वेरूळ, दौलताबाद हा प्रदेश त्यांनी आपल्या अभ्यासार्थ अनेक वेळा पालथा घातला. त्यांतील शिल्पांचा, शिलालेखांचा नव्याने अभ्यास करून नवी प्रमेये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो. या त्यांच्या आवडीतून त्यांनी या तिन्ही ठिकाणांवर मराठीत तसेच इंग्लिशमध्येही पर्यटकांना उपयोगी पडतील अशी पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी केलेले संशोधन हे जगभरातील मान्यवर अभ्यासकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी अभ्यासलेल्या शिलाताम्रशासनांचे ‘Studies in Epigraphy,Vol 1’ आणि ‘ Studies in Ajintha and Ellora Epigraphs’हे दोन इंग्लिश ग्रंथ लिहिले.

त्यांचे १५०च्या वर शोधनिबंध मान्यवर नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. ते बहुभाषाकोविद होते. हिंदी, संस्कृत, इंग्लिश, प्राकृत, अपभ्रंश, उर्दू या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ते पट्टीचे व्याख्याते होते. अनेक परिषदा, चर्चासत्रे यांमधून त्यांनी दिलेली व्याख्याने गाजली आहेत. पीएच.डी.चे ते मार्गदर्शक होते. महानुभाव साहित्य, वाङ्मय व इतिहास संशोधन यांत त्यांनी केलेल्या अभ्यासासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामध्ये ‘रत्नमाला’ या ग्रंथाला ‘महानुभाव विश्वभारती’ पुरस्कार, अखिल भारतीय महानुभाव परिषदेकडून ‘विद्याभूषण’ ही पदवी, मधुकर इनामदार न्यासाचा ‘संग्रहालय शास्त्रज्ञ’, छत्तीसगड शोध संस्थान, रायपूरद्वारे ‘शोध विभूषण’ पुरस्कार, उत्तर भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘महामहोपाध्याय’ ही पदवी, यांचा समावेश होतो. इ.स. २००२ मध्ये नागपूर विद्यापीठाने त्यांना त्यांच्या ‘Inscriptional aspects of Ancient Maharashtra’ या ग्रंथाला डी.लिट. पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मानही केला आहे. अशा या विद्वानाचे पुणे मुक्कामी निधन झाले.

गिरीश मांडके, डॉ. विद्या गाडगीळ

देशपांडे, ब्रम्हानंद श्रीकृष्ण