Skip to main content
x

देऊसकर, रामकृष्ण वामन

             हैदराबाद संस्थानचे राज-चित्रकार व सुप्रसिद्ध सालारजंग म्युझियम उभारण्यात महत्त्वाचा सहभाग असणारे कलावंत म्हणून रामकृष्ण वामन देऊसकर आपल्या आयुष्या-तील उमेदीच्या वर्षांत कार्यरत होते. मराठी मुलखातील हे कलावंत आयुष्याची अनेक वर्षे आपल्या कर्तृत्वाने हैदराबाद संस्थानात प्रसिद्धीस आले, पण महाराष्ट्रात मात्र अज्ञातच राहिले.

             देऊसकर कुटुंब हे मूळचे देवासचे; पण अहमदनगरमध्ये स्थायिक झाले होते. या कर्मठ ब्राह्मण कुटुंबात रामकृष्ण वामन देऊसकर यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यातच कला होती व वडील मूर्ती करीत. त्यांचे चुलत बंधू दामोदर (व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊसकरांचे वडील) हेदेखील अहमदनगरमधील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. शालेय शिक्षणानंतर रामकृष्ण देऊसकरांनी मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये १८९५ च्या दरम्यान वयाच्या चोविसाव्या वर्षी प्रवेश घेतला व १९०० मध्ये तेथील कलाशिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेतील त्यांची काही चित्रे जे.जे.च्या संग्रहात आहेत, त्यावरून त्यांची चित्रकलेची जाण, कौशल्य व दर्जा लक्षात येतो. शेवटच्या वर्षी त्यांना भित्तिचित्रांच्या उत्तम चित्रसंचासाठी व विशेष प्रावीण्याबद्दल पारितोषिक व प्रमाणपत्रही मिळाले. या दरम्यान त्यांचा विवाह झाला. त्यांच्या या प्रथम पत्नीचे नाव सीता होते.

             याच वर्षी त्यांचा काहीशा ज्येष्ठ व जे.जे.त सहा महिने शिक्षक असलेल्या व पुढील काळात वेदमहर्षी म्हणून गाजलेल्या चित्रकार श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्याशी स्नेह जुळून आला. सातवळेकर व देऊसकर या दोघाही तरुण चित्रकारांनी त्या काळी समृद्ध असलेल्या हैदराबाद संस्थानात आपल्या कलेला व व्यवसायाला वाव मिळेल असा विचार केला व त्यांनी हैदराबाद येथे, १९०१ च्या प्रारंभी, दक्षिण रेसिडन्सी बाजारात आपला स्टुडीओ सुरू केला. या स्टुडिओत श्रीमंत नवाब व सरदार मंडळींची तैलचित्रे व छायाचित्रणाचेही काम होत असे.  नेपथ्यकार पु.श्री. काळे (लेखक व.पु. काळे यांचे वडील) तरुणपणी, १९०४ च्या दरम्यान मार्गदर्शनासाठी या स्टुडीओ देऊसकर व सातवळेकरांना भेटण्यासाठी गेले होते. आपल्या ‘रंगभूमीवरील नेपथ्य’ या पुस्तकात आहे, त्याबद्दल ते लिहितात, ‘१९०४ सालची गोष्ट. मी त्या महान चित्रकारांच्या स्टूडिओत गेलो. तेथील त्यांची जलरंगातील आणि तैलरंगातील कलाकृती पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो. हैदराबाद संस्थानचे त्या वेळचे मीर मेहबूब अली पातशहा ह्यांचे ते पूर्ण आकाराचे व्यक्तिचित्र तर साक्षात त्यांचे दर्शन घडवीत होते.’

             या काळात स्टुडीओच्या कामातून अर्थार्जन करून दोघांनीही परदेशी जाऊन कलाशिक्षण घेण्याचे स्वप्न हैदराबादमध्ये आल्यापासून अनेकदा पाहिले होते. पण लवकरच सातवळेकर व देऊसकर यांचे मार्ग भिन्न झाले. १९०६ व १९०७ च्या दरम्यान सातवळेकर स्टुडीओ चालवण्यासोबतच वेदांवरील व्याख्यांनाद्वारे स्वदेशीच्या संदर्भात जनजागृती करू लागले. निजामाच्या राजवटीत अटक व हद्दपारीची कारवाई होण्याची शक्यता दिसताच सातवळेकरांनी स्टुडीओ देऊसकरांवर सोपवून हैदराबाद सोडले.

             हैदराबाद येथे १९०७ मध्ये स्वदेशहितचिंतक नाटक मंडळी प्रयोगासाठी गेली होती. तेव्हा तिचे मालक केशवराव भोसले, स्त्री-पार्टी मा.दीनानाथ व बापूराव पेंढारकर यांचा संबंध देऊसकरांशी आला व त्यांनी नाटकमंडळींसाठी पडदेही रंगवून दिले. त्यांचा स्टूडिओ लोकप्रिय झाला होता परंतु देऊसकरांना चित्रकलेचे उच्चशिक्षण पाश्‍चिमात्य देशात जाऊन घेण्याची ऊर्मी अस्वस्थ करत होती. त्या काळी हैदराबादमध्ये अनेक मराठी कुटुंबे स्थिरावली होती. अखेरीस देऊसकरांचे कनिष्ठ बंधू, डॉ.गंगाधरराव किर्लोस्कर, डॉ.सीतारामपंत सातवळेकर व इतर मित्रमंडळींच्या भरवशावर आपले कुटुंब व मुले हैदराबादेस ठेवून १९०८ च्या दरम्यान उच्च शिक्षणासाठी देऊसकर इटलीस रवाना झाले. पुढील चार वर्षांत त्यांनी पाश्‍चिमात्य कलेचा व तंत्राचा अभ्यास केला.

             या काळात त्यांचा संबंध तत्कालीन बंगाल प्रांतातील (आताचा बांगला देश) चित्रकार शशी कुमार हेश यांच्याशी आला. चित्रकार हेश हे त्या काळी फ्रान्समध्ये आपल्या फ्रेंच पत्नीसह राहत असत व काही काळ या दोन चित्रकारांनी पॅरिसमध्ये एकाच स्टुडीओत कामही केले. शशी हेश यांची बहीण मुक्ताकेशीदेवी व रामकृष्ण देऊसकर यांचे प्रेमसंबंध जुळून आले व ते उभयता विवाहबद्ध झाले. त्यांचा मुलगा सुकुमार १९१० मध्ये जन्मला व द्वितीय पत्नी आणि लहानग्या सुकुमारला घेऊन १९१४ मध्ये देऊसकर हैदराबादला परतले.

             हैदराबादला परतताच त्यांनी मोठ्या उमेदीने आपला स्टुडीओ नव्याने सुरू केला. व्यक्तिचित्रण व वास्तववादी शैलीतील प्रभुत्वामुळे हैदराबादसारख्या श्रीमंत व नवाबी शहरात त्यांचा शेठ धनराज गिरजी व प्रताप गिरजी या धनाढ्य बंधूंशी परिचय झाला व देऊसकरांचे ते चहाते व आश्रयदाते बनले. परंतु याच काळात त्यांना घर सोडावे लागले. देऊसकरांची आई ही अत्यंत कर्मठ विचारांची होती. देऊसकरांचे परदेशगमन व द्वितीय विवाह, तसेच त्यांच्या बंगाली पत्नीचा मांसाहार यांमुळे व्यथित होऊन आईने त्यांना वेगळे राहण्यास सांगितले. पुढील आयुष्यात देऊसकर व त्यांची प्रथम पत्नी सीता हे कधीच एकत्र येऊ शकले नाहीत.

             हैदराबादमध्ये काम करीत असतानाच देऊसकरांना मुंबईतही काम करण्यासाठी आमंत्रित केले जात असे. एकदा शेठ धनराज गिरजी यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळच्या आपल्या धनराज महलमध्ये भित्तिचित्रे करण्यास देऊसकरांना १९२० मध्ये आमंत्रित केले. ते काम सुरू असतानाच हैदराबादचे युसुफ अली खाँ (कोप्पाळचे नवाब व निजामाचे पंतप्रधान) ऊर्फ सालारजंग (तृतीय) यांनी ते पाहिले. कलासक्त व गुणग्रही नवाब सालारजंग (तृतीय) यांनी शेठ धनराज गिरजी यांच्याकडे या कलावंताची मागणी केली. लवकरच युसुफ अली खाँ व देऊसकर यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला.

             पुढील आयुष्यात देऊसकर व त्यांच्यातील कलावंत आपल्या या कलासक्त, सौंदर्यप्रेमी कलासंग्रहकासाठीच जगले. त्यातूनच हैदराबादचे सुप्रसिद्ध सालारजंग म्युझियम निर्माण झाले.

             त्या काळी स्त्री पार्टी करणाऱ्या नटांना सहसा मुली देत नसत. अशा वेळी देऊसकरांनी आपली कन्या काशी हिचा विवाह बापूराव पेंढारकरांशी १९२०च्या दरम्यान करून दिला.

             एकदा अशी अडचण आली की नवाब सालारजंगना आपल्या महालात हॉलिवुडच्या एका विख्यात सौंदर्यवतीचे स्वागत करायचे होते. हे स्वागत ज्या हॉलमध्ये होणार होते, तो नृत्याचा हॉल ६०×३० फूट एवढा भव्य होता. त्यात घालण्यासाठी लागणारा गालिचा भारतातच नव्हे, तर इराणमध्येही कुणी तयार करीत नव्हते. नवाब सालारजंगांनी सांगितल्यावरून देऊसकरांनी हे आव्हान स्वीकारले. भारतातूनच नव्हे, तर इराणमधूनही त्यांनी कारागीर मागविले. स्वतः गालिच्याचे डिझाइन तयार केले व त्यावर मध्यभागी अक्षरे विणली, ‘ट्रूथ इज गॉड’ या घटनेपासून रामकृष्ण देऊसकर हे नवाब सालारजंगांचे सर्वांत जवळचे सुहृद झाले. या कामासाठी खास आमंत्रित केलेल्या गालिचे विणणाऱ्या कारागिरांच्या विनंतीवरून देऊसकरांनी हैदराबादमध्ये गालिचे विणण्याचा कारखानाच सुरू केला व त्यातून कित्येक कारागिरांना रोजगारही मिळाला. ही घटना अंदाजे १९२८ च्या दरम्यानची असेल.

             सालारजंगांना आपल्या भागातील कलेचे फार अगत्य होते. तिचे रक्षण व पुनरुज्जीवन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात देऊसकर मनःपूर्वक सहभागी झाले. त्या काळी हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत असणाऱ्या व सालारजंगांच्या जहागिरीचा भाग असलेल्या अजिंठा-वेरूळच्या जतन व संवर्धनात त्यांनी भाग घेतला. अजिंठ्याच्या प्रतिकृती करण्याच्या कामात देऊसकरही कार्यरत होते. ही चित्रे आज सालारजंग म्युझियममध्ये पाहावयास मिळतात.

             सालारजंगांना कुतुबशाही, आदिलशाही व असीफशाही या आपल्या पूर्वसुरींची प्रतिमासृष्टी उभी करायची होती. या सर्व कामाची जबाबदारी देऊसकरांवर आली व त्यांनी कर्तृत्ववान राजपुरुषांची तैलरंगातील व्यक्तिचित्रे तयार केली. नवाब सालारजंगांचे मित्र असूनही या चित्रकाराची त्यातून सुटका नव्हती. याशिवाय १९३६मध्ये त्यांनी निजामाच्या राज्याभिषेकाची दोन भव्य तैलचित्रे रंगविली. या सोबतच त्यांना इंग्रज चित्रकारांनी केलेल्या टिपू सुलतानाच्या जीवनावर आधारित चित्रांच्या प्रतिकृतीही कराव्या लागल्या.

             हे सर्व करीत असतानाच या दोन मित्रांनी एकमेकांच्या संगतीने जगभर प्रवास केला. अतिशय दुर्मीळ अशी चित्रे, शिल्पे कलाकुसरीच्या वस्तूंचा ते संग्रह करू लागले. नवाब सालारजंग यांचा पैसा व चित्रकार देऊसकरांच्या कलाविषयक जाणिवा यांतून हा संग्रह फुलत गेला.

             युरोपमधील श्रेष्ठ कलावंतांच्या मूळ कलाकृती विकत घेणे शक्य नव्हते; पण आपल्या संग्रहासाठी त्यावरून प्रतिकृती तयार कराव्यात अशी अपेक्षा सालारजंग यांनी व्यक्त केली व त्यासाठीही हा चित्रकार कार्यरत झाला. याशिवाय इंग्रजांविरुद्ध टिपू सुलतानाने दिलेला लढा हा हैदराबादकरांचा आपुलकीचा विषय होता. त्यावरील इंग्रज चित्रकारांच्या चित्रांच्या प्रतिकृतीही देऊसकरांनी केल्या; पण या सर्व उद्योगात देऊसकरांची स्वतंत्र कलानिर्मिती मागे पडली.

             नवाब सालारजंग यांचा मृत्यू १९४९ मध्ये झाला. त्यापूर्वीही या अफाट कलावस्तुसंग्रहालयाचे काय करायचे हा प्रश्‍न त्या दोघांसमोर होताच. सालारजंग यांच्या मृत्यूनंतर तर तो अधिक तीव्र झाला. मालकी हक्क व अन्य कायदेशीर कटकटी उद्भवल्या; पण देऊसकरांनी अन्य मित्रांच्या व सहानुभूतिदारांच्या साहाय्याने त्यावर मात करीत त्या प्रचंड कलावस्तूंची वर्गवारी करून सालारजंगांच्या राहत्या वाड्यात, ‘दिवान देवडी’त म्युझियम उभारले. (सालारजंग हयात असतानाही देऊसकरांचे वास्तव्य तेथेच होते.) विश्‍वस्त मंडळाने त्यांचीच सालारजंग म्युझियमचे पहिले प्रमुख (क्युरेटर) म्हणून नियुक्ती केली व १९५७ मध्ये वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी मृत्यू पावेपर्यंत ते सालारजंग म्युझियमचे क्युरेटर होते.

             आज रामकृष्ण देऊसकरांची जे.जे.च्या संग्रहात असलेली शैक्षणिक काळातील अभ्यासचित्रे व रेखाचित्रे यांवरून त्यांचे कौशल्य, माध्यमावरील प्रभुत्व व यथार्थदर्शनाचा अभ्यास जाणवतो. तसेच, सुरुवातीच्या काळातील ‘बहादूरसिंग’ या वृद्ध राजपूत योद्ध्याच्या व्यक्तिचित्रातून त्यांचे व्यक्तिचिबत्रणावरील प्रभुत्व व सामर्थ्यही प्रकर्षाने लक्षात येते. वृद्धत्वातही असलेला करारीपणा व्यक्त करणारे डोळे, बाकदार नाक व दाढीमिशी, तलवारीवरील हाताच्या पकडीतून जाणवणारा आत्मविश्‍वास व या सगळ्याला खुलवणारी लालभडक रंगाची अंगावरील शाल या व्यक्तिचित्राला एक वेगळीच उंची देते. त्यातून अभ्यासच नव्हे, तर अभिव्यक्तीकडील या कलावंताची वाटचाल दिसून येते. याशिवाय राजा रविवर्मांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी काही भारतीय पौराणिक विषयांवरही चित्रे रंगविल्याचे आढळते.

             पण देऊसकरांची पुढील काळातील अशी चित्रे क्वचितच आढळतात व त्यांच्यातील कलावंत व्यावसायिकतेच्या मर्यादेत अडकल्याचे जाणवते. कलामूल्यांपेक्षा व्यक्तिचित्रातील साधर्म्य व ही चित्रे राजपुरुषांचीच असल्यामुळे त्यांतील भरजरी पोशाख व दागदागिने कौशल्याने रंगवण्यातच त्यांची प्रतिमा खर्ची पडल्याचे दिसून येते.

             देऊसकरांनी १९३६ मध्ये निजामाच्या राज्यारोहण प्रसंगाची दोन भव्य दरबार चित्रे रंगविली. त्यात असंख्य व्यक्तिरेखा असून त्यांतील प्रत्येक व्यक्तीचा पोशाख, साधर्म्य व राजप्रासाद आणि राजसिंहासनाचे दृश्य साकार करताना त्यांचा अभ्यास, कौशल्य व प्रभुत्व जाणवल्याखेरीज राहत नाही. विशेष म्हणजे ही अत्यंत भव्य चित्रे काढण्याचे आव्हान त्यांनी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी स्वीकारले. या कामात त्यांना त्यांचे चिरंजीव चित्रकार सुकुमार देऊसकर यांची मदत होती.

             सुकुमार देऊसकर (१९१०-१९५२) यांचे कलाशिक्षण शांतिनिकेतन येथे नंदलाल बोस यांच्या हाताखाली झाले. त्यानंतर त्यांनी युरोपमध्येे जाऊन कलेचे शिक्षण घेतले. त्यांनी जर्मनी (१९३२) व स्पेन (१९३३) येथे प्रदर्शने भरविली. त्यांनी १९५१ मध्ये  कैरो येथील प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय १९३२ च्या सुमारास टागोरांच्या ‘पोस्ट ऑफिस’ या सुप्रसिद्ध नाट्यप्रयोगासाठी त्यांनी काढलेली चित्रे जर्मनीतही वाखाणली गेली. हैदराबाद येथील कलामहाविद्यालयात ते अध्यापक व प्राचार्य म्हणून कार्यरत होते. याशिवाय हैदराबाद आर्ट सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. उस्मानिया विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर २६ ऑक्टोबर १९५२ रोजी सामना खेळताना त्यांचा अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी मृत्यू झाला.

             सुकुमार देऊसकरांची कन्या कविता देऊसकर (जन्म १९४६) यांचे कलाशिक्षण बडोदा येथे के.जी. सुब्रह्मण्यन यांच्या मार्गदर्शनाखाली झाले व भित्तिचित्रण या विषयात त्यांनी प्रावीण्य मिळविले. हैदराबाद फाइन आर्ट कॉलेज येथे प्राध्यापक व विभागप्रमुख या पदावर त्यांनी काम केले असून आधुनिक शैलीत हैदराबादमध्ये काम करणाऱ्या स्त्री-चित्रकार म्हणून त्या ख्यातनाम आहेत.

             रामकृष्ण वामन देऊसकरांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या विष्णू यांचे चिरंजीव मधुकर (१९३९-२००९) यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून १९५९ मध्ये पदविका घेतली. मधुकर यांचे सुपुत्र प्रीतम (१९६२) यांनीही चित्रकलेचे शिक्षण घेतले असून प्रिंटमेकिंगच्या ‘वुडकट’ माध्यमात कॅनव्हासवर मोठ्या आकारातील प्रिंटसाठी ते ख्यातनाम आहेत.

             - गीता जाधव, सुहास बहुळकर

संदर्भ
संदर्भ: १. गोखले, पु.पां.; ‘वेदव्यास पं. सातवळेकर’; उषा प्रकाशन, पारडी; १९६७.  २. देऊसकर, विष्णू रामकृष्ण; (वय ः ९१); मुलाखत ः १९९७. ३. प्रा. जोशी, द.पं.; देऊसकर कुल वंशपरंपरा-हैदराबाद; पाचवी जागतिक मराठी परिषद; १९९९. ४. काळे, पु. श्री.; ‘ललितकलेच्या सहवासात’ व ‘रंगभूमीवरील नेपथ्य’. ५. श्रीमती कीर्तने, गौरीबाई (डॉ. सीतारामपंत सातवळेकरांच्या कन्या, वय ः ८०);  मुलाखतः फेब्रुवारी २००६. ६. जोशी, प्रतिमा; ‘मराठी कुंचल्यांची हैदराबादी किमया’; मे २००३.  ७. देऊसकर, मधुकर विष्णू; मुलाखत : २००७.
देऊसकर, रामकृष्ण वामन