देवरस, पुरुषोत्तम जयकृष्ण
जागतिक कीर्तीचे सर्पतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.पुरुषोत्तम जयकृष्ण देवरस यांचा जन्म मध्यप्रदेशातील बिलासपूर शहरात झाला. मध्यप्रदेशातच शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरला झाले आणि तेथील विज्ञान महाविद्यालयामधून त्यांनी प्राणिशास्त्रात एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर दोन वर्षे खेड्यापाड्यांत राहून भातावरील ‘गाद’ नावाच्या कीटकामुळे उद्भवणाऱ्या रोगांवर त्यांनी मौलिक संशोधन केले.
पुढे १९३८ साली ते हिंदू एज्युकेशन फंडाची शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडला गेले. तेथे प्रथम एडिन्बरा व नंतर डरहॅम विद्यापीठाच्या किंग्ज महाविद्यालयामध्ये त्यांनी ‘आफ्रिकेतील काही उंदरांवरील कीटक’ आणि ‘प्लासी नदीच्या खोर्यात अॅलर्जी उत्पन्न करणारे केडीस फ्लाइज’ या दोन विषयांवर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली. भारतात परतल्यावर अखिल भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली येथे माशी व डास यांच्यावर त्यांनी संशोधन केले. पुढे १९४२ साली त्यांनी टोळधाड नियंत्रण मंडळातर्फे राजस्थान, गुजरात व सिंध प्रांतांची पाहणी करून या कार्यासाठी विमानाचा प्रथमच उपयोग करून दाखविला.
पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते १९४३ साली रुजू झाले. १९४७ साली डॉ.आघारकर यांच्याबरोबर त्यांनी व इतरांनी ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या स्वायत्त संशोधन संस्थेची स्थापना पुण्यातील विधी महाविद्यालयाच्या तळघरात केली.
१९५१ साली पुण्याहून मुंबईला आल्यावर त्यांची परळ येथील हाफकिन संशोधन संस्थेत कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख व उपसंचालक म्हणून नेमणूक झाली. १९६९ साली सेवानिवृत्त होईपर्यंत तेथेच त्यांनी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुखपद भूषविले. हाफकिनमध्ये कार्यरत असताना दूषित पाणी, आरेचे दूध, मुंबईतील आरोग्यनाशक किटकांची जंत्री, पिसवा, माश्या, डास इत्यादींवर त्यांनी संशोधन करून बारा विद्यार्थ्यांना एम.एस्सी., पीएच.डी.करिता मार्गदर्शन केले. या काळात त्यांनी प्लेग रोगावर मूलगामी संशोधन केले. प्लेगचा फैलाव करणारे शहरातील उंदीर प्लेगच्या जंतूंना जुमानत नाहीत. त्यातून असे दिसून आले की, महाराष्ट्रातल्या बऱ्याच शहरांतील उंदरांच्या विशिष्ट जातींची आकडेवारी बदलली आहे, तर शेतमळ्यातील उंदीर आता घरात शिरले आहेत. या उंदरांवरील पिसवांचे तीन प्रकार आहेत. त्यांची रक्तशोषणाची क्रिया वेगवेगळी आहे. या क्रियेवरच प्लेगची लागण अवलंबून असते, आदी निष्कर्ष त्यांच्या संशोधनातून निघाले.
तसेच डी.डी.टी.चा परिणाम भारतातील कीटकांवर होत नाही, हे पाहून त्यांनी देशातील कीटक नियंत्रण औषधांचे संशोधन व्हावे म्हणून चालना दिली. तसेच महाबळेश्वर, जम्मू, नीलगिरी, आसाम येथे पेरलेली पाथरेश्रम नावाची वनस्पती यावर उपयोगी पडू शकते, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचे मौलिक संशोधन लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना प्लेगविषयक तज्ज्ञ समितीवर नेमले. यामुळे उंदीर व प्लेगवर एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून त्यांची देशात व परदेशात गणना झाली.
भारतात प्रतिवर्षी दोन लाख लोकांना सर्पदंश होतो व त्यात सुमारे वीस हजार लोक दगावतात, असा अंदाज त्या वेळी वर्तवण्यात आला होता. पण एवढी गंभीर समस्या असूनही या विषयावर कोठेच संशोधन होत नव्हते. देवरसांनी जंगल, डोंगर व माळरानांत प्रवास करून सर्पजीवनाचे अवलोकन केले, प्रयोग केले. त्यांनी असे शोधून काढले, की महाराष्ट्रात सापांच्या २७८ जाती असून त्यांतील नाग- फुरसे-मण्यार व घोणस एवढ्या चारच जाती विषारी आहेत. यासंबंधी सर्वसामान्य जनतेलाही माहिती व्हावी या उद्देशाने त्यांनी १९५४ साली हाफकिन संस्थेत सर्पालय स्थापन केले. भारतातील हे पहिले सर्पालय होय. याची सर्वत्र वाहवा झाली. पुढे यालाच जोडून विषारी प्राण्यांच्या संशोधनाकरिता एक प्रयोगशाळा स्थापन झाली.
१९७२ साली स्टॉकहोमला भरलेल्या जागतिक प्रदूषण परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले, तर सर्पावरील मौलिक संशोधनामुळे १९७६ साली दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुएला देशाच्या कॅराकस या राजधानीच्या ठिकाणी भरलेल्या पहिल्या जागतिक सर्प परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. तसेच, १९८० साली भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय प्राणी विज्ञान संस्थेच्या अधिवेशनात त्यांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले. रॉकफेलर फेलोशिप व डॉ.भन्साळी लेक्चर अवॉर्डचे ते मानकरी होते. संयुक्त राष्ट्रसंघाची मानव पर्यावरण परिषद, जागतिक स्वास्थ्य संस्थेची प्लेग - कीटक परिषद आदी कैक परिषदांना हजर राहून त्यांनी जगभर प्रवास केला.
डॉ.देवरस ‘फ्रेंड्स ऑफ टीज’, ‘सोक्लीन’, मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आदी अनेक संस्थांचे सदस्य वा पदाधिकारी होते. मराठी विज्ञान परिषदेच्या १९७६ साली भरलेल्या अकराव्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
साप चावल्यानंतर सर्प किती विष देतो, सर्वच सर्प विषारी असतात काय आणि सर्पदंश इ. शीर्षकांखाली त्यांनी प्रबंध सादर केले. त्यांनी लिहिलेल्या निबंधांची संख्या शंभरवर भरते. त्यांनी पाच पुस्तके आणि मराठी, हिंदी व इंग्रजीतून अनेक लेख लिहिले. ‘भारतीय सर्प’ हा त्यांचा ग्रंथ अद्वितीय गणला गेला. सर्व भारतीय भाषांत त्याचा अनुवाद करण्यात आला. त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या ग्रंथातील तीन प्रकरणे इंग्लंड व अमेरिकेतील ग्रंथांत अंतर्भूत करण्यात आली. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांची सातत्याने भाषणे व अन्य विद्वानांशी चर्चा झाल्या.
- ज. बा. कुलकर्णी