Skip to main content
x

गोळे, पद्माकर विश्‍वनाथ

        द्माकर विश्‍वनाथ गोळे यांचा जन्म इंदौर येथे झाला. त्यांचे वडील इंदौरमधील होळकर महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. आई कमलाबाई घरी मुलांना स्वयंशिस्तीचे धडे देत असंत. त्यांचे आजोबा गोपाळ शिवराम गोळे हे इंदौर संस्थानात जिल्हा न्यायाधीश होते तर आजोबांचे बंधू महादेव शिवराम गोळे हे फर्गसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. गोळेंचे दहावीपर्यंतचे शिक्षण इंदौरलाच झाले. त्यानंतर १९३८मध्ये अकरावी-बारावीसाठी त्यांनी पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९४०मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हील इंजिनिअरिंग) प्रवेश घेतला. १९४३मध्ये अर्थात वयाच्या एकवीसाव्या वर्षी ते अभियांत्रिकी उत्तीर्ण झाले आणि त्याच वर्षी त्या काळी घेतली जाणारी फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांची आय.आर.एस.ई. म्हणून रेल्वेत निवड झाली.

       त्यांची पहिली नियुक्ती सिकंदराबाद येथे झाली. या परिसरात नद्यांवरील रेल्वे पूल वाहून जाण्याचे प्रकार नेहमी घडत असत. पूल वाहून गेल्यानंतर रेल्वे सेवा एक एक महिना विस्कळीत व्हायची व जनजीवन ठप्प व्हायचे. एका पावसाळ्यात वेरूर नदीवरील महत्त्वाचा रेल्वे पूल वाहून गेला आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. किमान एक महिना तरी व्यवहार बंद राहणार होते. तेव्हा गोळेंनी नदीवर हंगामी गाईडर्स टाकले आणि अवघ्या दहा दिवसात रेल्वेसेवा सुरळीत चालू केली. त्यानंतर मुख्य पुलाच्या उभारणीला सुरुवात झाली. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण कामगिरी रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होती. गोळे कर्तव्यदक्ष व प्रखर राष्ट्रभक्त आहेत.  स्वातंत्र्यानंतर भारताची सैनिकव्यवस्था सबल करण्यासाठी इतर शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाही स्वयंसेवक म्हणून काम करता येत असे. गोळे रेल्वेच्या टेरिटोरियल आर्मीत स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले आणि त्यांना त्यांचे कर्तृत्व दाखवून देण्याची संधीही चालून आली. कारण त्याच दरम्यान १९७१च्या लढाई नंतर बांगलादेशाची निर्मिती झाली. यावेळी बंडखोरांनी रेल्वेची अतिशय नासधूस केली होती. तेथील रेल्वे रुळ व रेल्वे पूल उभारण्यात आणि रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यात त्यांनी सहभाग घेतला.

        बांगलादेशवाद्यांचा सशस्त्र हल्ला होत असल्याने रेल्वे मार्ग उखडले जात होते. पकडले जाणाऱ्या  बांगलादेशवाद्यांना रेल्वेने आग्य्राला आणून सोडण्याचे महत्त्वपूर्ण काम गोळे यांच्या नेतृत्वाखालील गटाने यशस्वीरीत्या पार पाडले. रेल्वे मार्ग उखडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. हे रेल्वेमार्ग व्यवस्थित करण्याचे काम गोळेंकडे सोपविण्यात आले. त्यासाठी त्यांना फक्त १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. हे काम चालू असताना दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरूंगाचे स्फोट होऊन त्यांचे सहकारी जखमीही होत होते पण गोळे मागे हटले नाहीत आणि त्यांनी हे काम अवघ्या १० दिवसात पूर्ण केले. बंगाली जनतेला आपापल्या गावी परत जाण्यासाठी व सैन्याला जलद हालचाली करण्यासाठी या रेल्वेमार्गाचा मोठा उपयोग झाला. रेल्वे सेवेत असताना सैन्याच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने ‘अतिविशिष्ट सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

         तसेच त्यांची एअर इंडियाच्या संचालकपदी नियुक्ती करून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. ते एअर इंडियात येण्याअगोदर या संस्थेची स्थिती अतिशय वाईट झालेली होती.वैमानिक आणि कामगार संघटना मनमानी करत होत्या. अवास्तव मागण्या केल्या जात होत्या आणि त्यामुळे एअर इंडियाची व्यवस्थापन समिती प्रचंड तणावात होती.

         अशा मागण्यांसाठीच सर्व वैमानिकांनी बेमुदत संप पुकारला. विमान वाहतूक विस्कळीत झाली. वैमानिकांच्या अवास्तव मागण्या मान्य करणे एअर इंडियाला कधीच शक्य नव्हते. अशा परिस्थितीत गोळेंची संचालकपदी झालेली निवड ही एअर इंडियासाठी संजीवनीच ठरली. गोळेंनी संप केलेल्या सर्व वैमानिकांना निलंबित केले. नवीन वैमानिकांची भरती सुरू केली.

        याच दरम्यान इंग्लंडमध्ये कडक अशा मार्गारेट थॅचर यांचे सरकार आले होते. त्यांच्या प्रशासनाने एअर इंडियाच्या लंडनमधील कर्मचाऱ्यांना बंद पुकारूच दिला नाही. त्यामुळे वैमानिकांचा हा बंद सपशेल फसला. त्यांच्या मागण्या मान्य करणे सोडाच उलट गोळेंनी व्यवस्थापनाच्याच अटी संघटनेला मान्य करायला लावल्या.

        गोळे हे १९७८ साली एअर इंडियातून निवृत्त झाले व पुण्यातच कायमचे स्थायिक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी प्रदीप वाघ या शिक्षणतज्ज्ञाबरोबर उद्योजक विकास संस्थेमार्फत शिक्षण क्षेत्रात काम केले. आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यात यावे यासाठी ते सदैव आग्रही राहिले. २००० साली महाराष्ट्र शासनाने त्यांची ही मागणी मान्य केली व शिक्षणात तांत्रिक शिक्षणाचा अंतर्भाव केला. सध्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी गोळे यांचा पुण्यात मुक्काम आहे.

- दत्ता कानवटे

गोळे, पद्माकर विश्‍वनाथ