गोविंदवार,आनंद दिनकर
आनंद दिनकर गोविंदवार यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी १९९४ साली अमरावती विद्यापीठाची बी.एस्सी.ची पदवी उत्तीर्ण केली; पण नोकरीच्या मागे न लागता शेती करणे पसंत केले. सन १९९६मध्ये औरंगाबाद येथील वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (वाल्मी) येथे पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्यांनी कृषी खात्यामार्फत आयोजित अभ्यासदौराही केला. त्यांनी आपल्या शेतीचे माती परीक्षण करून घेतले. वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय ते पाहतात. त्यांच्याजवळ एकूण ६५ एकर जमीन आहे. त्यापैकी २० एकर फळबागाईत, २० एकर हंगामानुसार शेती व २५ एकरामध्ये ते ऊस, आले व हळद ही पिके घेत असतात. त्यांनी आपल्या शेतीमध्ये ५ एकर चिकूची लागवड केली. त्यांनी २००२ सालापासून गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. तसेच २००३मध्ये त्यांनी आपल्या शेतीवर आंबा लागवड (केशर जात) केली व क्रॉस पॉलिनेशनसाठी आमराईच्या कडेला दशहरी आंब्याची लागवड केली.
गोविंदवार यांनी २००४ सालापासून आपल्या शेतीवर बीजोत्पादन कार्यक्रमही घेतला आणि त्यामुळे त्यांना शेतीमध्ये पुष्कळ फायदा झाला. डॉ. पं.दे.कृ.वि.चे कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला. त्यांनी २००७मध्ये आपल्या शेतीवर सोयाबीन, तूर, हरभरा, मूग व गहू या पिकांचे बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक नवीन उपक्रम केला. त्याबद्दल मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांचा १५ ऑक्टोबर २००७ रोजी सत्कार केला आणि २००८मध्ये त्यांना कृषिभूषण पुरस्कार मिळाला व राज्यपाल एस.एस. जमीर यांच्या हस्ते ६ डिसेंबर २००८ रोजी हा पुरस्कार नागपूर येथे देण्यात आला.
गोविंदवार यांनी आपल्या शेतीची कंटुर लागवड करून जमिनीतून वाहून जाणारे पाणी अडवण्याचे काम केले. हे अडवलेले पाणी एका तलावामध्ये गोळा करून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन केले. त्यांनी ४४ मी. द ४४ मी. असा एक सामूहिक तलाव आपल्या भागामध्ये तयार केला आणि ५० हजार क्युबिक लीटर पाणी जमा केले. तसेच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन केले. त्यातून दरवर्षी २ ते २॥ टन माशांचे उत्पन्न मिळते.
त्यांनी २००८-२००९ या वर्षामध्ये कपाशी पिकाकरता पर्जन्याश्रयी शेतीचे तंत्र वापरून ही योजना शेतात राबवली आणि कापसाचे उत्पन्न वाढवण्यास मोठी मदत झाली. त्यांच्या या उपक्रमाला डॉ. पं.दे.कृ.वि.चेे कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे यांनी १० ऑक्टोबर २००९ रोजी भेट दिली व त्यांची या कार्यक्रमाबद्दल अॅस्पी पुरस्कारासाठी निवड केली. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मुंबईतील विलेपार्ले येथे १९ डिसेंबर २००९ रोजी १ लाख रुपये व सन्मानपत्र मिळाले.
- प्रा. पद्माकर दत्तात्रय वांगीकर