Skip to main content
x

घुगरदरे, जगन्नाथ सखाराम

         औंध संस्थानाचे संस्थानिक श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या पदरी असलेले बंडोबा चितारी (चित्रकार) यांचा निश्‍चित काळ उपलब्ध नाही. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील कुकूवाड गावाचे रहिवासी होते. त्यांच्या अंगात चितारण्याची (चित्र काढण्याची) कला परंपरागत होती.

         साताऱ्याला औंधच्या संस्थानिकांनी पंतांच्या गोटात नवीन वाडा बांधला. त्याच काळात जगन्नाथ सखाराम घुगरदरे ऊर्फ बंडोबा चितारी हे कोणाच्या तरी ओळखीने काम मागण्यास आले. त्या वेळी त्यांचे वय अंदाजे २०/२२ असावे. त्यांस कामासाठी ठेवून घेण्यात आले व त्यास दिवाणखाना आणि खोली रंगविण्याचे काम दिले गेले. ‘काम चांगले झाल्यास सरकारात चिताऱ्याची असामी (पद) देऊ’ असे संस्थानिकांनी सांगितले. बंडोबा चिताऱ्यांनी दिवाणखाना तर उत्तम रंगविलाच; पण खोलीतील चित्रांचे व वेलबुट्टीचे नाजूक काम एवढे अप्रतिम केले, की संस्थानिकांनी खूष होऊन त्यास चिताऱ्याची  असामी दिली. बंडोबांना पंक्तीस भोजन करून दरमहा तीन रुपये मिळू लागले. बंडोबा चित्रेउत्तम काढीत. पाहिजे तो विषय सांगितला तरी त्याचे डिझाइन तत्काळ, उत्तम करीत (एखाद्या विषयावरील प्रसंगाचे रचनाचित्र). मनुष्य हजर नसतानादेखील त्याचे सादृश चित्र (लाइकनेस) उत्तम काढीत. बंडोबा मातीची चित्रेही फार चांगली करीत. त्यांचे गणपतीचे वळण अतिशय चांगले होते. त्या काळी मुंबई — पुणे या भागात गणपतीचा चेहरा, माणसाचे तोंड व नाकाच्या जागी सोंड लावून करीत असत. त्याऐवजी बंडोबा चितारी यांनी परंपरेत असलेले प्रत्यक्ष हत्तीचे तोंड माणसाच्या धडावर बसवून गणेश प्रतिमा घडवण्यास सुरुवात केली.

         एकदा औंधचे संस्थानिक श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांनी त्यांचे वडील परशुरामराव श्रीनिवासराव (थोटेपंत) यांची तसबीर काढण्याची आपल्या पदरी असलेल्या या चित्रकारास आज्ञा केली. ते निवर्तल्याला वीस-बावीस वर्षे झाली होती व बंडोबा चितारी यांनी अगदी तरुणपणी त्यांस पाहिले होते. पंतप्रतिनिधी यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘‘बंडोबांनी चित्र काढण्यास प्रारंभ केला. बंडोबांची एक खुबी व कौशल्य असे, की एकवार - दोनवार पाहिलेल्या माणसाचेदेखील चित्र बंडोबा ओळखण्यासारखे काढीत. बरीच खटपट करून बंडोबांनी थोरल्या महाराजांची तसबीर तयार केली. ती त्यांच्या काळी तैनातीस असणाऱ्या हुजऱ्या यल्लोबा, शागिर्द गोविंदा चिंचोरे, भाट मानसिंग वगैरे यांस दाखवली. या लोकांना तसबीर दाखविल्याबरोबर थोरले महाराज म्हणून त्यांनी तसबिरीस साष्टांग नमस्कार तर घातलेच; पण त्यांत न्हनी म्हणून एक चाकरीवरील अगदी वृद्ध, सुमारे ७५ वर्षे वयाची दासी होती, ती ‘माझा महाराज ग,’ म्हणून मोठ्याने ओक्साबोक्सी रडली.’’

         बंडोबा चितारी यांची सालस वृत्ती व पापभीरू वागणूक यांमुळे औंध संस्थानिकांच्या घरात त्यांना कुटुंबातील सदस्य मानीत. भवानराव पंतप्रतिनिधींच्या ज्येष्ठ भगिनी अक्कासाहेब यांचे पाय लहानपणी वाकडे होते. त्यांस औषधी तेल चोळून बंडोबांनी ते सरळ केले व त्या चालू लागल्या. म्हणून त्यांच्या मातोश्री राणीसाहेब सगुणाबाई यांनी बंडोबांना आपले बंधू मानले व शेवटपर्यंत बंडोबा चितारी दिवाळीत त्यांच्याकडून ओवाळून घेत. भवानराव पंतप्रतिनिधी लहानपणी आजारी पडत तेव्हा आईकडे बंडोबांनी चित्रे काढून द्यावीत असा ते हट्ट करीत व बंडोबा तो पुरवीत असत. त्यांनी काढलेली चित्रे पाहतच भवानराव पंतप्रतिनिधी लहानाचे मोठे झाले व त्यांना स्वत: चित्र काढण्याचा नाद लागला.

         बंडोबा चितारी यांनी काढलेले परशुरामराव श्रीनिवासराव (थोटेपंत) यांचे चित्र बघता त्यात पाश्‍चिमात्य पद्धतीची शरीरशास्त्राची प्रमाणबद्धता व छायाप्रकाशाचा वापर आदी यथार्थदर्शनाची तत्त्वे दिसत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्या चित्रांत भारतीय लघुचित्र परंपरेची वैशिष्ट्येही आढळत नाहीत. त्यांत या दोनही पद्धतींचा संयोग आढळतो. ही चित्रे म्हणजे दख्खन भागातील व मराठी मुलखातील ‘कंपनी स्कूल’ या प्रकारचा पाश्‍चिमात्य व पौर्वात्य कलांच्या संगमातून निर्माण झालेला कलाविष्कार म्हणावा लागेल. त्यांच्या  काही कलाकृती औंध (सातारा) येथील संग्रहालयात आहेत. सुदैवाने श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांनी त्यांच्याबद्दल आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले असल्यामुळे त्यांची माहिती व छायाचित्र आज उपलब्ध आहे.

- सुहास बहुळकर

घुगरदरे, जगन्नाथ सखाराम