Skip to main content
x

जीवतोडे, श्रीहरी बळीराम

       श्रीहरी बळीराम जीवतोडे यांचा जन्म नंदोरी ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. गुरुजींचे प्राथमिक शिक्षण नंदोरीत तर पूर्व माध्यमिक शिक्षण वरोरा येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर येथे प्रवेश घेतला. शिष्यवृत्त्या मिळवत त्यांचे शिक्षण झाले. विशेषत: पाचव्या, नवव्या आणि इंटरच्या वर्गात ज्या शिष्यवृत्ती परीक्षा झाल्या त्या तिन्ही परीक्षात जिल्ह्यात आणि प्रांतात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९५० मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठाची बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली आणि १२ जून १९५० रोजी ते सिटी हायस्कूल, चंद्रपूर या शाळेवर माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. अल्पावधीतच गणिताचे उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. ते सर्वत्र ‘जीवतोडे गुरुजी’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

      ५ मे १९५१ ला ते आनंदरावजी खामनकर यांची कन्या लीलाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. १९५१ मध्ये त्यांची समाजसेवक, राजकारणी यांच्यामध्ये उठबस सुरू झाली. ते हरिजन सेवक संघाचे जिल्हा सचिव म्हणून एकमताने निवडले गेले आणि त्यांच्या प्रगतीला धुमारे फुटू लागले.

      तत्कालीन द्विभाषिक मुंबई राज्यात चंद्रपूर हा दक्षिण पूर्वेकडील कोपर्‍यातील, क्षेत्रफळाने मोठा, जंगलांनी वेढलेला, खनिज द्रव्यांनी नटलेला परंतु शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागासलेला वनवासी जिल्हा आणि म्हणूनच चंद्रपूर जिल्हा म्हणजे तरुण कार्यकर्त्यांसाठी एक आव्हानच! जिल्ह्याच्या ठिकाणीच तेवढ्या मोजक्या आणि मर्यादित शाळा, खेड्यात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. सर्वत्र अज्ञानाचा अंधकार पसरला होता.

       सिटी हायस्कूलमध्ये शिक्षक असताना ग्रामीण भागातील जनतेशी, त्यांच्या सुखदु:खाशी त्यांची नाळ जुळू लागली होती. हरिजन सेवक संघाच्या प्रचार दौऱ्यानिमित्ताने जिल्हाभर आणि जिल्ह्यालगतच्या तालुक्यांत अस्पृश्यता निवारणासाठी त्यांचे दौरे वारंवार होऊ लागले. त्यांचा जनसंपर्क वाढू लागला. या प्रचार मोहिमेत गोंडवनच्या झोपड्यातून नांदणारे शतकानुशतकाचे दैन्य आणि अंधार त्यांनी पाहिला. काळ बदलत होता पण ही माणसे बदलत नव्हती. त्यांच्या सुधारणेसाठी खूप कार्य करायला हवे होते. आणि ते करण्याचा निश्‍चय, अशाच परिस्थितीचे चटके सोसून आलेल्या श्रीहरी जीवतोडे गुरुजींनी केला होता.

       मे १९५३ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि जून १९५३ मध्ये त्यांनी ‘जनता माध्यमिक विद्यालया’ची मुहूर्तमेढ रोवली. खेड्यातल्या लोकांचा अपार विश्‍वास आणि प्रेम त्यांनी संपादन केले होते. त्यामुळेच जीवतोडे गुरुजींनी शाळा काढली ही वार्ता प्रसृत होताच जुलै महिन्यात हजेरी पटावर तीनशे मुले दाखल झाली आणि गुरुजींना त्यांचे जीवनध्येय गवसले.

      जून १९५६ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली माध्यमिक शाळा कोठारी येथे सुरू झाली. अल्पावधीतच दानरूपात मिळालेल्या पाऊण एकर जागेवर पंचवीस हजार रुपयांची दिमाखदार इमारत उभी झाली. सततच्या ग्रामीण भागातील दौऱ्यांमुळे विविध भागातील शैक्षणिक अडचणींकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. जनपदद्वारा संचालित प्राथमिक शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक हे प्रशिक्षित नाहीत. एकुलत्या एक शासकीय शिक्षक प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षित होणाऱ्या शिक्षकांची संख्या अपुरी आहे. ही समाजाची गरज त्यांनी ओळखली. परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन केले. जून १९५७ मध्ये त्यांनी “जनता प्राथमिक प्रशिक्षण विद्यालया” ची स्थापना केली. याच दरम्यान बल्लारपूर आणि वणी येथे जनता विद्यालयाच्या शाखा उघडण्याचे धाडसही त्यांनी केले.

      प्रशिक्षण विद्यालय आणि शाळा व्यवस्थित सुरू असताना एका निराळ्याच प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. चंद्रपूरमध्ये झालेल्या कॉलऱ्यात माणसे पटापट मरताना त्यांनी पाहिली. तेथील क्षयरोगाचे वाढते प्रमाण पाहिले. त्याचे कारण दाटीवाटीने वसलेल्या घाणेरड्या वस्तीमध्ये आहे हे त्यांनी ओळखले. जून १९५७ मध्ये व्यवस्थित योजना आखून त्यांनी चंद्रपूर नगर गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन केली आणि परकोटाबाहेर हवेशीर नगराची रचना सुरू झाली.

      चंद्रपूर जिल्ह्याच्या पंचक्रोशीत महाविद्यालयीन उच्च शिक्षणाची सोय नव्हती. इच्छा असूनही नागपूर येथे उच्च शिक्षण घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता असूनही हजारो मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. म्हणूनच एक अत्यंत धाडसी निर्णय घेत त्यांनी स्वत:चे सोळा एकर शेत विकून १९५८ मध्ये जनता महाविद्यालयाची स्थापना केली. विदर्भ गोंडवनातील क्रांतिकारक घटना, अशीच या घटनेची ऐतिहासिक नोंद घेता येईल. तत्कालीन लोकसभा सदस्य, तथा विदेशातून शिक्षण घेऊन परतलेल्या डॉ. देवराव गोहोकर (माजी कुलगुरू, नागपूर विद्यापीठ) यांना प्राचार्य पदाची धुरा सांभाळायला दिली. गोंडवनात एक नवे पर्व सुरू झाले. याच दरम्यान जंगलांनी वेढलेल्या आदिवासीबहुल भागातील पोंभुर्णा, सिरोंचा, धानोरा, पिपरी येथे जनता विद्यालयाच्या शाखा सुरू झाल्या. १९५९ मध्ये त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट घेतली. बनारस हिंदू विद्यापीठाचे विस्तीर्ण विश्‍व त्यांनी पाहिले आणि ते भारावून गेले. त्या परिसराच्या धर्तीवर ‘जनता नगर’ ची योजना आखून ती कार्यान्वित केली. त्याच वर्षी जनता महाविद्यालयाची वाणिज्य शाखा सुरू करताना त्यांच्या असे लक्षात आले की ठिकठिकाणी सुरू केलेल्या माध्यमिक शाळांना प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होत नाहीत. प्रशिक्षण महाविद्यालयाची अडचण लक्षात घेऊन विदर्भातील पहिले जनता शिक्षण महाविद्यालय सुरू झाले.

      १९६० मध्ये विज्ञान शाखेसोबतच ताडाळी, साखरवाही, गोंडपिपरी, धाबा, पाटणबोरी, नंदोरी, हिरापूर, बोथली येथे जनता विद्यालयाच्या शाखा उघडण्यात आल्या. १९६१ मध्ये कृषी महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, सोबतच नागपूर जिल्ह्यातील सोमलवाडा, दुर्गापूर येथे शाळा सुरू करण्यात आल्या. अवघ्या नऊ वर्षांत बालवाडीपासून उच्च महाविद्यालयापर्यंत संस्थेने ३५ शाळा सुरू केल्या.

      काही काळ त्यांचा राजकारणातही वावर होता. ते जिल्हापरिषदेचे सदस्य आणि पुढे पंचायत समितीचे सभापती होते. राजूरा विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून बहुमतांनी ते निवडले गेले. प्रश्‍नाचे आयुध वापरून विधानसभा त्यांनी दणाणून सोडली. विविध प्रश्‍नांना त्यांनी मार्गी लावले. लोकप्रिय आमदार अशी बिरुदावली त्यांना लाभली.

     सहकार क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी सहकार चळवळीला गती दिली. परंतु तरीही त्यांचा खरा पिंड मात्र शिक्षण प्रसारकाचाच होता. त्यामुळे ते क्षेत्र सोडून ते पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्राकडे वळले आणि त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण प्रसाराच्या कार्यामध्ये स्वत:ला झोकून दिले.

- प्रभाकर पारखी

जीवतोडे, श्रीहरी बळीराम