Skip to main content
x

जोशी, अनंत नरहर

     प्रा. डॉ. अनंत नरहर जोशी हे अध्यापन व अध्यापक शिक्षणात कार्यरत असणाऱ्या सर्वांना नवनवे प्रयोग करणारे प्राध्यापक म्हणून परिचित आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील शिरगुर गाव हे त्यांचे जन्मगाव. गावातील बहुतांशी जनता कानडी बोलणारी होती. गावाजवळच असलेल्या उगार गावच्या मराठी माध्यमाच्या शाळेत जोशी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले.

     १९६८ मध्ये बी.एस्सी. प्राणिशास्त्राची पदवी त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून संपादन केली. पुण्याच्या ‘टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन’ मधून त्यांनी बी.एड. पदवी मिळविली. त्यानंतर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात अध्यापक म्हणून कार्यास सुरुवात केली. १९७३ मध्ये त्यांनी एम.एड. पूर्ण केले. शिक्षण आणि अध्यापक शिक्षणातील अनेक संशोधन प्रश्न त्यांना खुणावत होते. त्यामुळे त्यांनी पुणे विद्यापीठात डॉ. व. सी. देशपांडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. च्या संशोधन कार्याला सुरुवात केली. सूक्ष्म अध्यापनावर पीएच. डी. करणारे महाराष्ट्रातील ते पहिले विद्यार्थी आहेत. १९८४ मध्ये त्यांना पीएच. डी. मिळाली.

     डॉ. जोशी यांचा शिक्षणक्षेत्रातील अनुभव पस्तीस वर्षांहून अधिक असून त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्याशाखेचे संचालक, शैक्षणिक सेवा विभागाचे संचालक व प्रभारी कुलगुरू म्हणून काम केलेले आहे. त्यांनी पन्नासहून अधिक परिषदांमध्ये तज्ज्ञ म्हणून काम केले असून इंग्रजी व मराठी भाषेत तीसहून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. यांची इंग्रजीतून पाच व मराठीतून पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एम. फिल. च्या अठरा व पीएच. डी.च्या दहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी संपादन केली आहे. नीपा, न्यू दिल्ली, युनेस्को, युजीसीने व विविध विद्यापीठांनी पुरस्कृत केलेले पंधरा मोठे व एकोणीस लहान संशोधन प्रकल्पही यांनी पूर्ण केले आहेत.

     दूरशिक्षण परिषद-दिल्ली, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ, डी.ई. पी.डी.पी. ई.पी. सल्लागार समिती, नवी दिल्ली, अशा विविध उच्च समित्यांचे ते सदस्य होते. मुक्त विद्यापीठात विविध अभ्यासक्रम निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर, गोवा, मुंबई, एस. एन.डी.टी., जामिया मिलिया, कर्नाटक विद्यापीठ, कुरुक्षेत्र विद्यापीठ, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अशा विद्यापीठांतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेचे ते परीक्षक होते. नाशिकच्या मुक्त विद्यापीठातील ‘संवाद’, ‘मुक्तविद्या’, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या ‘शिक्षण-समीक्षा’ च्या संपादक मंडळाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. श्रीलंका मुक्त विद्यापीठ व ओपन युनिव्हर्सिटी- यु. के. ह्या मुक्त विद्यापीठांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे नाशिक येथील शिक्षक गौरव समिती व सार्वजनिक वाचनालय ह्यांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, समाजावर प्रभाव पाडणार्‍या कार्यासाठी ‘श्री रामतीर्थकर पुरस्कार’ आणि ‘असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज, लंडन’चा ‘जीवन गुणवत्ता पुरस्कारानेही’ जोशी यांचा गौरव झालेला आहे.

     कोल्हापूर, तसेच महाराष्ट्र सूक्ष्म कौशल्याची बारा पुस्तके, विशेष अध्यापन पद्धतीची नऊ पुस्तके व अध्यापनाची प्रतिमाने विषयाची आठ स्वतंत्र पुस्तके मराठी भाषेतून देऊन त्यांनी शिक्षणशास्त्र, विद्याशाखा आणि अध्यापक शिक्षणामध्ये मोलाची भर घातलेली आहे. विस्तार कार्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक परिषदेचे अध्यक्ष असताना डॉ. जोशी ह्यांनी २००४ पासून ‘डॉ. एम.बी. बुच कृतज्ञता पुरस्कार’, ‘डॉ. आर. एच. दवे प्रेरणा पुरस्कार’ व ‘डॉ. आनंद वास्कर ग्रंथ पुरस्कार’ सुरू केले. ह्या पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील सर्व अध्यापकांना, आचार्यांना नवी दृष्टी व प्रेरणा मिळाली आहे. २००८ मध्ये जोशी  निवृत्त झाले.

     - प्रा. सुहासिनी पटेल

जोशी, अनंत नरहर