Skip to main content
x

कोलते, विष्णू भिकाजी

भाऊसाहेब कोलते

        विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या नरवेल या गावी झाला. त्यांचे वडील कास्तकरी, वाणी होते. ज्ञानार्जनाची, साहित्याची फार मोठी परंपरा त्यांच्या घरामध्ये नव्हती. परंतु, तत्कालीन परिस्थितीची जाणीव, शिक्षणासंबंधी नवीन संधी याची कल्पना भिकाजी कोलते यांना होती.

     विष्णू कोलते स्वत: सत्यशोधक समाजाचे होेते. त्या कार्यकर्त्यांची ये-जा, उठबस त्यांच्या घरी होती. त्यामुळे भिकाजी कोलते यांनी लहानग्या विष्णूला शिकवण्याचे ठरवले होते. त्यांंनी आपले लहानसे खेडे सोडले आणि ते मलकापूर येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी कापडाचे दुकान घातले. पंचक्रोशीतील समाजप्रबोधन करणारी मंडळी येथेही त्यांनी जोडली. उदा. ज्योतिराव फुल्यांचे चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील, ‘आत्मोद्धार’ नियतकालिक काढणारे जळगावचे सीताराम पाटील, एल.एस. भटकर इत्यादी. या काळात विष्णूला वाचनाची गोडी लागली होती. फुल्यांचे चरित्र वाचल्यावर तर विष्णूने शिक्षण घेण्याचे ठरवले. विष्णू मलकापूरच्या शाळेत दाखल झाला. सत्यशोधक चळवळीच्या जोडीला घरात वारकरी संप्रदायाचे वातावरणही होते. त्यामुळे विष्णूच्या बालमनावर संतांचे संस्कार झाले. तुकारामांचे अभंग त्याने मुखोद्गत केले.

     मलकापूरचे शिक्षण संपवून १९२२ साली माध्यमिक शिक्षणासाठी विष्णूची रवानगी खामगाव येथे झाली. तेथील वास्तव्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे ठरले. शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब गणेश मोरेश्वर गोरे यांनी त्याला प्राचीन मराठी कवितेची गोडी लावली. कविता वाचता वाचता विष्णू स्वत: कविता करू लागला. पुढे नामवंत कवी म्हणून तो प्रसिद्ध झाला. मॅट्रिकनंतर नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये त्याने प्रवेश घेतला. १९३१ साली ‘एम.ए. मराठी’ या परीक्षेमध्ये त्याने प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक पटकावला. याच परीक्षेमध्ये त्याला तीन सुवर्णपदके मिळाली.

     पुढे, अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजमध्ये विष्णू कोलते यांना प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. खरा पिंड अध्यापकाचा असल्यामुळे कोलते पाठाची पूर्ण तयारी करूनच वर्गात जात असत. याच काळात महानुभाव पंथियांच्या वाङ्मयाकडे त्यांचे मन आकृष्ट झाले. ते साहित्य मराठी वाङ्मयाच्या प्रमुख प्रवाहात आणावे, असे त्यांना वाटू लागले. त्या दृष्टीने त्या साहित्याचा अभ्यास सुरू झाला. त्यांनी संशोधन, संपादन हेही क्षेत्र स्वीकारले. महानुभाव पंथाचे काही साहित्य कूटलिपींमध्ये बद्ध होते. त्यामुळे सामान्यांपर्यंत ते पोहोचत नसे. त्या पंथाचे महंत त्यातच समाधान मानीत. कोलते यांनी या कूटलिपी अभ्यासल्या. महानुभावांच्या अनेक ग्रंथांचे चिकित्सक संपादन केले. उदा. भास्कर भट्ट बोरीकर विरचित ‘उद्धवगीता’, ‘स्थानपोथी’, नरेंद्र विरचित ‘रुक्मिणी स्वयंवर’, महाई भट्ट संकलित श्री गोविंदप्रभू चरित्र इत्यादी अशा एकूण पंधरा महानुभावीय ग्रंथांचे विष्णू कोलते यांनी संपादन केले.

     या संपादनाचे वैशिष्ट अनेक प्रकारे सांगता येईल. संपादन करताना डॉ. वि.भि. कोलते यांनी कोणताही ग्रह, कल न ठेवता तटस्थवृत्तीने काम केले. पोथ्यांची चिकित्सक प्रत तयार केली. त्या-त्या ग्रंथाचा कर्ता, त्याचा काळ, तत्कालीन सामाजिक, धार्मिक स्थिती इत्यादी अंगांनी ग्रंथांचा अभ्यास केला. महानुभाव तत्त्वज्ञानावर प्रबंध लिहून त्यांनी ‘आचार्य’ ही सन्मानाची उपाधी मिळवली.

     ग्रंथसंपादनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपादनासाठी वापरलेली शोधप्रणाली. चिकित्सक प्रत कशी करावी? कशी असावी? यासंबंधी त्यांनी सखोल विचार केलेला दिसतो. त्यांनी स्वत:चे अनुभव आणि प्रचलित पद्धत यांची योग्य जुळणी करून काम पूर्ण केले. ‘ज्ञातृनिष्ठ पद्धती’ आणि ‘ज्ञेयनिष्ठ पद्धती’ (अनुक्रमे, Subjective आणि Objective पद्धती) यांची त्यांनी आपल्या एका लेखात उत्तम मीमांसा (‘भाषा- साहित्य संशोधन’; म.सा.प.; १९८१) केलेली आहे. त्यांनी चिकित्सक पाठ कसा करावा याचा एक वस्तुपाठ घालून दिला असे म्हणता येईल. कोणत्याही एका पद्धतीच्या आहारी न जाता योग्य चिकित्सक निवडावा हे त्यांचे मत होते. या वैचारिक बैठकीमुळे डॉ. कोलते यांनी संपादित केलेल्या ग्रंथामध्ये ‘पाठनिर्णय’ आणि ‘अर्थनिर्णय’ या दोन्हींची सांगड झालेली दिसते.

     अर्थनिर्णयपर टीपा, पारिभाषिक संज्ञा, महानुभावांचे आचारविचारांचे संकेत, त्यांचा अन्वयार्थ, या सर्वांकडे लक्ष दिलेले दिसते. संपादित ग्रंथाच्या शेवटी शब्दकोश देणे हे तर त्यांचे खास वैशिष्ट्य होय. संपादनशास्त्रालाच त्यांनी एक वैचारिक, सैद्धान्तिक बैठक घालून दिली. पुढील काळातील संपादनाला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली हे नि:संशय.

     यथावकाश डॉ. वि.भि. कोलते प्राचार्य झाले. अमरावती, नागपूर असा त्यांचा हा प्राचार्यपदाचा प्रवास होता. कामाचा उरक, जिद्द, शिस्त, पुरोगामी दृष्टी ही त्यांच्या कारभाराची वैशिष्ट्ये होती. या पदावरून काम करताना उत्तम प्रशासक, सल्लागार म्हणूनही त्यांचे वैशिष्ट जाणवले होते.

    यानंतर नागपूर विद्यापीठाचे पहिले सरकार नियुक्त पूर्णवेळ कुलगुरू म्हणून डॉ. वि.भि. कोलते यांची निवड झाली. शिक्षण क्षेत्राचा भरघोस अनुभव असल्यामुळे नागपूर विद्यापीठाचे कार्य जोरात सुरू झाले. पदव्युत्तर परीक्षेसाठी नागपूर विद्यापीठाने मराठी माध्यमाचा अवलंब केला. विद्यापीठातील शिक्षण हे अधिक प्रयोजनपूर्ण, समाजाभिमुख झाले. विद्यापीठातील प्राध्यापकांचा व्यासंग वाढावा यासाठी वार्षिक परिषदा, उन्हाळी अभ्यासवर्ग, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येऊ लागले.

     महानुभाव साहित्याचे संशोधन, संपादन यांसंबंधी महत्त्वाचे काम झाल्यानंतर विदर्भ संशोधन मंडळाच्या १९५८ सालच्या वार्षिकामध्ये त्यांनी एक वेगळ्या विषयावरील लेख प्रसिद्ध केला. प्राचीन भारतीय इतिहासविषयक संशोधनाचा हा त्यांचा पहिला लेख म्हणता येईल. ‘झरिका दानपत्र’ हा त्या लेखाचा विषय होता.

    त्यानंतर त्यांनी प्राचीन भारतीय इतिहासासंबंधीचे सुमारे ३०-३२ लेख लिहिले. महाराष्ट्राच्या विविध भागांत सापडलेले शिलालेख, ताम्रपट यांचे त्यांनी वाचन केले. त्यांचे विवरण, स्पष्टीकरण केले. हे लेख संस्कृत, प्राकृत, कानडी, मराठी या भाषांमधील होते. या अभ्यासासाठी त्यांनी आवश्यक त्या संदर्भ ग्रंथांचे वाचन केले. ब्राहमी लिपीचा अभ्यास केला. भाषांचा अभ्यास केला. त्यांनी पुराभिलेख तज्ज्ञाला आवश्यक असे ज्ञान मिळवले. कोरीव लेखांचे विवरण करताना प्रखर न्यायनिष्ठा असावी लागते. हे सर्व गुण डॉ. कोलते यांच्याकडे होते. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा आरंभ मौर्यकाळात आणि शेवट देवगिरीच्या यादवकाळात होतो. सातवाहन, वाकाटक काळ, राष्ट्रकूट, पूर्वकालीन चालुक्य, उत्तरकालीन चालुक्य, शिलाहार, तुघलक अशा राजवंशांचे कोरीव लेख त्यांनी अभ्यासले. त्यामुळे इतिहास लेखनात भर पडलेली दिसते.

     डॉ. वि.भि. कोलते यांचा ‘लव्हाळी’ हा काव्यसंग्रह आणि ‘सोडचिठ्ठी’ नावाचे नाटक हे ललित लेखन त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध झाले होते. वर्‍हाडी बोलीचे शब्द, त्यांची व्युत्पत्ती, महानुभाव पंथाचे साहित्य, संशोधन, संपादन, अन्य विषयांवरचे लेख या साहित्य सेवेमुळे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे १९६७ मध्ये अध्यक्ष झाले. हे संमेलन मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भरले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी मराठी व्याकरण, शुद्धलेखन यांविषयी विचार मांडले. मराठी भाषा जोपासली पाहिजे, टिकवली पाहिजे, मराठी साहित्य वृद्धी झाली पाहिजे असे  विचार मांडले. त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे, हेही त्यांनी सांगितले.

     डॉ. वि.भि. कोलते यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार झाला आणि एक गौरवग्रंथ प्रकाशित झाला. नंतर त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तही गौरव करण्यात आला. त्यासाठी अमृत महोत्सव समिती स्थापन करण्यात आली. त्यांच्याविषयी आदर, स्नेह असलेल्या व्यक्ती त्या समितीमध्ये होत्या. त्यांनी निधी संकलन केले आणि पुढाकार घेऊन ‘अमृत महोत्सव गौरव ग्रंथ’ प्रकाशित केला. त्या ग्रंथाचे नाव ‘संशोधनाची क्षितिजे’ (२२ जून १९८५). याचे संपादक डॉ. भा.ल. भोळे हे होते. अनेक मान्यवर साहित्यिक, मराठीचे अभ्यासक, तसेच पुराभिलेख विद्येचे श्रेष्ठ संशोधक डॉ. वा.वि. मिराशी इत्यादींचे लेख त्यात आहेत. या ग्रंथाचे वैशिष्ट असे, की त्यामध्ये डॉ. वि.भि. कोलते यांच्या अभ्यासाचे जे विषय आहेत, त्या विषयांतील मान्यवरांनी त्यांच्या स्वत:च्या संशोधनाबद्दल लिहिले आहे. या ग्रंथात डॉ. वि.भि. कोलते यांच्या कार्याचा साक्षेपी आढावा घेणारे लेख आहेत.

     अमृत महोत्सवानिमित्ताने जो सत्कार समारंभ झाला, त्या वेळी त्यांंच्या सुविद्य पत्नी उषाताई यांनी डॉ. कोलते यांना आत्मचरित्र लिहिण्याची विनंती केली. ती विनंती स्वीकारून डॉ. कोलते यांनी ‘अजून चालतोचि वाट’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यांचे प्रकाशित साहित्य प्रचंड आहे, ते पुढीलप्रमाण : एकूण ग्रंथ : ३२, संपादित ग्रंथ : १५, लेख : २३७, कविता : १०, प्रस्तावना आणि पुरस्कार : ४५, पुस्तक परीक्षणे : ९, यांशिवाय आकाशवाणीवर १६ भाषणे, अपूर्ण आणि अप्रकाशित लेख : ११. ‘विदर्भ संशोधन पत्रिका’, ‘म.सा.प. पत्रिका’ या नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले. त्यांच्या अमृत महोत्सवी गौरव ग्रंथाची पहिली आवृत्ती निघाली त्या वेळी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी त्यांना मानपत्र दिले. त्याचा अंतर्भाव गौरव ग्रंथात केलेला आहे. अमृत महोत्सवी गौरव ग्रंथाची पहिली आवृत्ती संपल्यावर त्याची दुसरी, सुधारित आवृत्ती काढण्यात आली. २००७ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होते, म्हणून त्या वेळी गौरव ग्रंथाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

 — डॉ. कल्पना रायरीकर

कोलते, विष्णू भिकाजी