कर्णिक, अशोक वसंत
अशोक वसंत कर्णिक यांचा जन्म गिरगावातला. त्यांच्या वडिलांचे नाव वसंत भगवंत कर्णिक, तर आईचे नाव विमलाबाई. कर्णिक यांचे आजोळ बडोदा येथील सरदार आंबेगावकर यांच्याकडील, तर वडील मात्र मानवेंद्रनाथ रॉय यांचे अत्यंत निकटचे सहकारी. कर्णिकांचे बालपण हे अशा वातावरणात, मुंबईमध्येच घडले. त्यांचे प्राथमिक शिक्षण आर्यन हायस्कूल या शाळेत, तर गिरगावातील विल्सन महाविद्यालयात कर्णिक यांचे शिक्षण झाले. एकीकडे शालेय शिक्षण सुरू असतानाच, घरामध्ये प्रत्यक्ष एम.एन.रॉय यांच्यासह अनेक कम्युनिस्ट विचारवंतांचे, अभ्यासकांचे, कामगार चळवळीतील नेत्यांचे, महाराष्ट्र टाइम्सचे संस्थापक-संपादक असणाऱ्या डी.व्ही.कर्णिकांसारख्या लेखकांचे सहवास लाभल्याने वैचारिक बैठक घडत होती.
१९५२ मध्ये रसायनशास्त्र हा मुख्य विषय घेऊन, मुंबई विद्यापीठामधून, कर्णिक यांनी बी.एस्सी. ही पदवी संपादन केली. अशोक कर्णिक १९५३मध्ये भारताच्या केंद्रीय गुप्तचर विभागात निवडले गेले. १९५३ ते १९५६ या तीन वर्षांच्या काळात माउंट अबू येथील इंडियन पोलीस अकॅडमी येथे कर्णिक यांचे प्रशिक्षण झाले. या दरम्यानच कायदे, वैद्यकीय न्यायशास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) अशा विविध विषयांचा त्यांनी अभ्यास केला. १९५६ ते १९६२ या काळात त्यांनी दिल्ली येथे गुप्तचर खात्याशी संलग्न अशी अनेक महत्त्वाची कामे केली. भारताच्या अंतर्गत, तसेच बाह्य सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींना ‘निष्क्रिय’ करणे, त्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती गोळा करणे, तिचे पृथ:क्करण करणे असे या कालावधीमधील कामाचे मुख्य स्वरूप होते.
१९६२मध्ये तत्कालीन गुप्तचर खात्याचे प्रमुख श्री.मलिक यांनी भारताचा ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रशासकीय दाव्यांबरोबरच भारताच्या कायदेशीर हक्कही अबाधित राहावा म्हणून गुप्तचर खात्यातील नव्याने भरती झालेल्या युवकांना सीमावर्ती भागात पाठविण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे अशोक कर्णिक यांची ‘फर्नो’ भागात बदली झाली. तवांग येथून काही अंतरावर गुप्तचर खात्याचे ‘कँप’ उभारण्याची अवघड जबाबदारी, सर्व नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या सहकार्याने कर्णिक यांनी पार पाडली.
दरम्यान अरुणाचल प्रदेश आणि अन्य ईशान्य राज्यांमध्ये विकास काम करण्याचे आणि तेथील जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. स्थानिक लोकांना जागृत करणे, प्रशिक्षण देणे, त्यांना सुशिक्षित करणे असे त्यांच्या कामाचे पैलू होते. १९७२ ते १९७७ या काळात कर्णिक यांची नागपुरात बदली झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकाशझोतापासून अलिप्त याहून कार्य करत होता. याच दरम्यान बाळासाहेब देवरस आणि कर्णिक यांची भेट झाली. केंद्रीय पातळीला गुप्तचर खात्याकडून, कर्णिक यांची नागपुरात नियुक्ती होण्यापूर्वी, संघाबद्दल पारदर्शी आणि सत्यान्वेषी अहवाल पाठवले जात नव्हते. मात्र देवरसांचा स्पष्टवक्तेपणा आणि पारदर्शकता यांमुळे कर्णिकांनी संघाबद्दल-संघकार्याबद्दल प्रांजळ आणि पारदर्शी अहवाल पाठवले आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सलोखा राखण्यास मदत केली. विशेष म्हणजे नवनिर्माण आंदोलन, जयप्रकाशजींची संपूर्ण क्रांती, देशातील आणीबाणी या तुलनेने आव्हानात्मक कालखंडात कर्णिक यांनी आपली निष्कलंक प्रतिमा अबाधित राखली.
१९७७ ते १९८७ या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये कर्णिक यांनी पुन्हा एकदा दिल्ली येथे विविध ‘डेस्क’ वर साहाय्यक संचालक या पदावर काम केले. या कालखंडात त्यांनी गुप्त तपास, माहिती संकलन-पृथक्करण, महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा, मनुष्यबळ प्रशिक्षण, विविध मोहिमांची आखणी आणि अंमलबजावणी असे विविध स्वरूपाचे कार्य केले.
१९९०मध्ये अशोक कर्णिक महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचे उपसंचालक या पदावरून निवृत्त झाले. सेवाकाळात असतानाही आपली टेनिसची आवड त्यांनी मनस्वीपणे जोपासली. प्रशासकीय सेवकांच्या कामगिरीनुसार ‘गतिशील बढती’ ‘अॅक्सलरेटेड प्रमोशन’ राबविण्याची संकल्पना कर्णिक यांनी मांडली. त्यांच्या या अत्युत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना १९७८मध्ये भारतीय पोलीस पदक आणि १९८७मध्ये सन्मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक हे प्रशासकीय सेवांमधील सर्वोच्च पुरस्कारही मिळाले.
निवृत्तीनंतरही आज ते संरक्षण क्षेत्राबाबत सक्रिय आहेत. दहशतवाद हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध शाळा-विद्यालये- फोरम यांमध्ये ते या संदर्भात व्याख्याने देतात. ‘फ्रिडम फर्स्ट’ या मासिकामध्ये ते नियंत्रित संरक्षणविषयक लेख प्रसिद्ध करतात. २००६ ते २०१० या कालावधीत ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ या संस्थेच्या महाराष्ट्र विभागाचे ते प्रमुख होते. तसेच निवृत्तीनंतर गोदरेज आणि फिलिप्स यांसारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी संरक्षणविषयक सल्लागार म्हणून काम केले.