Skip to main content
x

कर्वे, धोंडो केशव

      धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली गावी त्यांच्या आजोळी झाला. स्वाभिमान आणि परिश्रम यांची दीक्षा आईकडूनच त्यांना मिळाली होती. खणखणीत शुद्ध वाणी, उत्तम उच्चार, गोड गळा यांची देणगी असलेले धोंडोपंत कर्वे मुरुडच्या सरकारी शाळेत शिकले. तेथे सोमण गुरुजींनी स्वावलंबनाचे धडे दिले. सातारा येथे सहाव्या इयत्तेची परीक्षा देण्यासाठी आपल्या सहाध्यायांबरोबर धोंडोपंत पायी चालत गेले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले.

      १८८४ मध्ये गणित विषय घेऊन कर्वे बी. ए. झाले. कर्वे यांचा विवाह राधाबाईंशी झाला होता. पुत्र रघुनाथ आणि राधाबाई यांच्यासह कर्वे मुंबईला आले. तिथे राधाबाईही शिकू लागल्या. १८९१ मध्ये पत्नी राधाबाई यांचा मृत्यू झाला. याचवेळी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निमंत्रणावरून कर्वे १५ नोव्हेंबर १८९१ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीत दाखल झाले आणि पुण्याला फर्गसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक झाले. याच काळात त्यांच्या भावी कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांचे मित्र नरहरपंत जोशी यांची विधवा भगिनी गोदूताई यांच्याशी अण्णांनी पुनर्विवाह केला. ११ मार्च १८९७ रोजी गोदूताई आनंदीबाई कर्वे झाल्या.

     या क्रांतिकारी निर्णयामुळे कर्वे यांना घरीदारी बरीच उपेक्षा सहन करावी लागली. बहिष्कार व वाळीत टाकले जाणे यांचाही सामना करावा लागला. या काळात अण्णांनी नागपूरच्या वामनराव कोल्हटकरांना पुनर्विवाहोत्तेजक मंडळ स्थापन करण्यासाठी खूप सहकार्य केले.

     १४ जून १८९६ रोजी पुण्याला पेरूगेटजवळील गोरे वाड्यात अनाथ बालिकाश्रम या संस्थेची अण्णांनी स्थापना केली. खर्चासाठी आपली विम्याची पॉलिसी गहाण ठेवली. प्लेगच्या साथीमुळे १८९९ मध्ये आश्रम हिंगण्याला हलवला. १९०० मध्ये या जागेत ५०० रु. खर्च करून एक पर्णकुटी बांधण्यात आली. तिथे आठ विधवा राहत होत्या. आश्रमाच्या वर्गणीसाठी पुणे ते हिंगणे अशी ६ कि. मी. ची पायपीट अण्णांनी अनेक वेळा केली.

      १९०५ पासून संस्थेला चांगले दिवस आले. धनिकांनी व समाजकार्याची आस्था असणाऱ्यांनी संस्थेला मदत केली.

     १९०७ या रंगपंचमीला सहा विद्यार्थिनींचे महिला विद्यालय सुरू झाले. त्यासाठी मुष्टिफंडाची मदत झाली. १९११ मध्ये महिला विद्यालयाची नवी इमारत झाली. विधवाश्रम आकारास आला. महिला विद्यालयाचा वृक्ष बहरला. आपल्या  सामाजिक कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान मिळाले पाहिजे. म्हणून अण्णांनी निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना केली. आणि त्या द्वारा निःस्पृह, निःस्वार्थी कार्यकर्ते समाजाला दिले. साधेपणा, निरपेक्ष वृत्ती, भिक्षान्नावर गुजराण, अहर्निश सेवावृत्ती ही निष्काम मठ कार्यकर्त्यांची व्रते होती. अण्णासाहेबही तसेच निष्काम राहिले. निष्काम कर्म मठाच्या रूपाने संस्थेला चांगले कार्यकर्ते मिळाले. पार्वतीबाई आठवले, ह. रा. दिवेकर, ना.म.आठवले, वा.गो. मायदेव, गो.म.चिपळूणकर, वारुताई शेवडे, प्रा. वा. म. जोशी, डॉ. कमलाबाई देशपांडे, सीताबाई अण्णेगिरी, मालतीबाई बेडेकर अशा अनेक कार्यकर्त्यांची व आजन्म सेवकांची फळी तयार झाली.

     स्त्रियांच्या उच्च शिक्षणासंबंधी कर्वे यांच्या मनात जे स्वप्न होते त्याची पूर्तता ना. दा. ठाकरसी विद्यापीठाच्या रूपाने झाली. ३ जून १९१६ रोजी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन झाले आणि ६ जुलै १९१६ रोजी पहिले महाविद्यालय सुरू झाले. सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या भरघोस देणगीतून हे विद्यापीठ साकार झाले. विद्यापीठाचा वेलविस्तार वाढला आणि डॉ. रा. गो. भांडारकर, सर महादेव चौबळ, रँ. र. पु. परांजपे, चुन्नीलाल मेहता, लल्लुभाई शहा यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींनी त्याचे वैभव वाढविले.

     स्त्रियांची मानसिकता, त्यांच्या कौटुंबिक जबाबदार्‍या यांचा विचार करून विद्यापीठाचे अभ्यासक्रम निश्‍चित करण्यात आले. अनाथ बालिकाश्रम व महिला विद्यापीठ यांच्या प्रसारासाठी युरोप व अमेरिका, जपान इ. ठिकाणी अण्णांनी प्रवास केला आणि विद्यापीठाला जगन्मान्यता मिळवली.

     १९५८ मध्ये पं. नेहरू यांच्या हस्ते अण्णासाहेब कर्वे यांना ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी देण्यात आली. पुण्याला डेक्कन जिमखाना  ते कर्वेनगर या रस्त्याला कर्वे पथ असे नाव देण्यात आले. शंभरी गाठलेले अण्णासाहेब कौटुंबिक जीवनात सुखी होते. शंकरराव, दिनकरराव व भास्करराव या तीन पुत्रांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य केले. भास्कररावांनी तर पुढे संस्थाकार्यालाच वाहून घेतले होते. स्नुषा इरावती कर्वे या ख्यातनाम संशोंधक लेखिका होत्या. पत्नी आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी अण्णांना त्यांच्या स्त्रीशिक्षणकार्यात मोलाची साथ दिली. अण्णांची नात गौरी (देशपांडे) ही ख्यातनाम लेखिका होती.

     आपल्या आत्मवृत्तात महर्षी कर्वे यांनी जे स्त्रीशिक्षणविषयक विचार मांडले आहेत त्यांचा सारांश असा -

-      स्त्रिया म्हणजे मानवजातीचे स्वत्वविशिष्ट घटक आहेत हे ओळखून शिक्षण द्यावे.

-      सुपत्नी व सुमाता होण्यासाठी आवश्यक ते शिक्षण स्त्रियांना द्यावे.

-      प्रापंचिक जीवनाचा राष्ट्राच्या उन्नती - अवनतीशी संबंध असतो हे लक्षात आणून देणारे शिक्षण स्त्रियांना द्यावे.

-      गृहिणी गृहमुच्यते या विधानातील गर्भितार्थानुसार स्त्रियांना शिक्षण द्यावे.

-      कोणत्याही स्त्रीला सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या वाटा खुल्या असाव्यात.

-      स्वसामर्थ्याविषयी आत्मविश्‍वास निर्माण करणारे आणि राष्ट्रकल्याणाची तळमळ जागविणारे शिक्षण स्त्रियांना द्यावे.

      अण्णासाहेब कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ‘ज्ञानसाधक, कृतिशील समाजसुधारक, निष्ठावंत शिक्षक, प्रेमळ कुटुंबवत्सल, प्रयोगशील प्रागतिक, श्रमप्रतिष्ठेचा उपासक आणि स्थितप्रज्ञ शतायुषी जीवनव्रती’ अशा शब्दांत मांडता येतील. शतायुषी अण्णांचे पुणे येथे निधन झाले आणि एका जीवनव्रतीच्या असाधारण यज्ञाची समाप्ती झाली.

- डॉ. न. म. जोशी

कर्वे, धोंडो केशव