Skip to main content
x

कुलकर्णी, मदन पांडुरंग

     डॉ. मदन कुलकर्णी यांचा जन्म महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यातल्या कर्‍हाड तालुक्यातील कापील गावी झाला. त्यांचे शिक्षण भिवापूर (जि. नागपूर) व नागपूर येथे झाले. बिंझाणी नगर महाविद्यालयातून ते १९६२ साली बी.ए. झाले. बहिःशाल विद्यार्थी म्हणून त्यांनी मराठी विषय व राज्यशास्त्र विषय घेऊन अनुक्रमे १९६५ व १९६७ मध्ये एम. ए. पदवी संपादन केली.

     ज्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले, त्याच भिवापूर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत तीन वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले व नंतर श्री. बिंझाणी नगर महाविद्यालयात ते प्राध्यापकी करीत असताना १९८० साली मराठी विषयात पीएच. डी. व १९९३ मध्ये त्याच विषयात डी. लिट.चे मानकरी झाले. अध्यापन काळातील ३१ वर्षे पदवी वर्गाचे, २० वर्षे स्नातकोत्तर वर्गाचे व १६ वर्षे एम. फिल.च्या वर्गाचे अध्यापन त्यांनी  केले. श्री. कुलकर्णी  पदव्युत्तर विभाग प्रमुख पदावर नागपूर विद्यापीठात सहा वर्षे कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्राप्त झाली. डॉ. कुलकर्णी यांनी एम.फिल.च्या शोध प्रबंधासाठी ४५ जणांना मार्गदर्शन केले. ३० जून २००२ रोजी ते निवृत्त झाले.

     डॉ. मदन कुलकर्णी यांच्या स्वतंत्र ग्रंथलेखनातील ‘मराठी प्रादेशिक कादंबरी’ (१९८४), ‘मुक्तिबोधाची कविता’ (१९९२), ‘दलित जाणिवेच्या कवितेतील सूर्यप्रतिमा’ (१९९३), ‘यल्लमाच्या जोगतिणी’, ‘श्रीचक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्र: एक अभ्यास’ (१९९४), ‘निवडक पु. ल.: एक आकलन’ (२०००), ‘कविताव्रती’ (२००१), ‘देशीयता ते जागतिकीकरण’ (२००८) यांचा  उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल.

     त्यांच्या संपादित ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरी:अध्याय १ (१९७५), अध्याय ९ (१९९१), अध्याय १६ (१९९३), अध्याय १२ (२००२), संगीत सौभद्र (१९८१), वसंत वैभव (कै. वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे स्मृतिग्रंथ १९९३), महदंबेचे धवळे (१९९८), लीळाचरित्रः एकांक (२००२), अमृतानुभव (२००७), चांगदेवपासष्टी आणि हरिपाठाचे अभंग (२००७), बी. कॉम. साठी पाठ्यपुस्तक आदींचा समावेश आहे.

     डॉ. कुलकर्णी यांनी ‘मराठीतील व हिंदीतील प्रादेशिक कादंबऱ्यांच्या तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर विद्यापीठीय अनुदान आयोगाने मंजूर केलेल्या (२००१ पासून २००४ पर्यंत) प्रमुख प्रकल्पाचे काम पूर्ण केले. त्यांच्या ‘देशीयता ते जागतिकीकरण’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा २००८ चा ‘वा.ल.कुलकर्णी समीक्षा पुरस्कार’ मिळाला. डॉ. मदन कुलकर्णी यांनी संपादित केलेले ग्रंथ केवळ परिचयात्मक नसून त्यांमागे त्यांचा संशोधनविषयक दृष्टिकोन प्रामुख्याने दिसून येतो. कविता आणि कादंबरी यांवरील समीक्षण, दलित साहित्यावरील समीक्षण, महानुभाव पंधाचा अभ्यास यांपासून ते जागतिकीकरणापर्यंतचा प्रवासही त्यांच्या लेखनात दिसून येतो.

- वि. ग. जोशी

 

कुलकर्णी, मदन पांडुरंग