Skip to main content
x

कुळकर्णी, नारायण विनायक

गोविंदानुज

     नारायण विनायक कुळकर्णी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील सुरली या गावी झाला.कुळकर्णी हे गरीब कुटुंबातले होते. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी मॅट्रिकपर्यंत मजल मारली; परंतु ती परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्या काळात तशा परिस्थितीतही त्यांनी ‘लेखन’ हेच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असावे, असे ठरविले.

     कुळकर्णी हे कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवीही होते. ‘गोविंदानुज’ या नावाने त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून कविता लिहायला सुरुवात केली.

     गद्यलेखनाच्या सुरुवातीला कुळकर्णी यांनी नाटके लिहिली. त्यांची एकूण सात नाटके रंगभूमीवर आली. नाटकांच्या चलतीच्या काळात त्यांपैकी ‘संगीतपार्थप्रतिज्ञा’ हे नाटक १९१७ साली रंगभूमीवर आले. ‘माईसाहेब’ हे १९२९ साली सादर झालेले नाटक प्रेक्षकांनी अतिशय उचलून धरल्यामुळे गाजले. ‘माईसाहेब’चा विषय कौटुंबिक असा, सर्वसामान्य प्रेक्षकांना भावणारा होता. सावत्रपणासारखा प्रेक्षकांच्या मनाला हात घालणारा विषय, त्याला साजून दिसतील असे समर्पक संवाद आणि नाटकातील पात्रांचे वास्तव चित्रण यांमुळे नाटकाने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली.

     कुळकर्णी यांनी ‘शाहूनगरवासी’ या नाटकमंडळीसाठी ‘डाव जिंकला’ (१९२२) आणि गंधर्व नाटकमंडळीसाठी ‘संत कान्होपात्रा’ (१९३१) अशी दोन पौराणिक नाटके लिहिली. या दोन्ही नाटककंपन्या त्या काळी खूप नावाजलेल्या होत्या. तरीही ही दोन्ही नाटके व्यावसायिक दृष्टीने फारशी यशस्वी ठरली नाहीत.

     याच काळात चित्रपटांचे युग हळूहळू सुरू होत होते. नाट्यव्यवसायावर त्याचा परिणाम होणे अपरिहार्य होते. नाटककंपन्या मोडकळीस येऊ लागल्या आणि केवळ लेखणीवर उदरनिर्वाह करणार्‍या ना.वि.कुळकर्णी यांना लेखनाचा अन्य मार्ग शोधावा लागला. १९२४ साली त्यांनी  ‘महाराष्ट्र कुटुंबमाला’ चालू केली. ‘कसे दिवस जातील’ (१९२५), ‘न्याय’ (१९२६), ‘मजूर’ (१९२५), नयनबाण (१९३८) अशा सुमारे बारा कादंबर्‍या आणि कथाही लिहिल्या.

     ‘महाराष्ट्र कुटुंबमाले’तील त्यांच्या कथांचे नंतर दोन संग्रहही निघाले.

     काळाबरोबर चालणार्‍या कुळकर्णी यांनी नंतर चित्रपट लेखनाचाही यशस्वी प्रयत्न केला. ‘अयोध्येचा राजा’ (१९३१), ‘मायामच्छिंद्र’ (१९३२) यांच्या कथा त्यांनी लिहिल्या. याशिवाय ‘कर्ण’, ‘मेनका’, ‘कान्होपात्रा’, ‘मायाबाजार’, अशा बोलपटांच्या श्रेयनामावलीत पटकथाकार म्हणूनही त्यांचे नाव झळकले.

     सांगली येथे १९४३ साली भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. जीवनभर केवळ लेखनाचेच व्रत घेतलेल्या ना.वि.कुळकर्णी यांचा तो यथोचित गौरव म्हणावा लागेल.

- मंदाकिनी भारद्वाज

कुळकर्णी, नारायण विनायक