कुळकर्णी, नीना दिलीप
चित्रपट, रंगभूमी, दूरदर्शन मालिका, जाहिरातपट अशा अनेक माध्यमातून एकाचवेळी सहजसुंदर अभिनयातून एक प्रगल्भ उंची गाठणारी अभिनेत्री म्हणून नीना कुळकर्णी हे नाव आदराने घेतले जाते. उपजत अभिनयगुणांना सजगतेने आणि अभ्यासाने पैलू पाडत नीना कुळकर्णी यांनी चित्रपट-नाट्यसृष्टीत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांचा जन्म पुण्याला झाला. त्यांची आई कमल जोशी एम.बी.बी.एस. आणि वडील वसंत जोशी मानोसोपचारतज्ज्ञ असल्यामुळे घरामध्ये अभ्यासाला पूरक वातावरण होते. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असल्या तरी त्यांना मराठी साहित्यामध्येही रूची होती. ‘मकरंद सहनिवास’ या राहत्या कॉलनीमध्ये होणाऱ्या नाटकांमुळे ‘नाटक’ या विषयाशी त्यांचे जवळचे (जिव्हाळ्याचे) नाते निर्माण झाले. दरम्यान मधुकर तोरडमल यांच्या ‘चांदणे शिंपीत जा’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची विचारणा विमलाताई राऊत यांच्याकडून झाली. विमलताईंनी नीना कुळकर्णी यांच्या आईकडून फक्त वीस प्रयोगांपुरती परवानगी मिळवली आणि त्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला. १९७१ साली ‘गुंतता हृदय हे’ या नाटकमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या नाटकाचे साधारणपणे ६०० प्रयोग त्यांनी केले. एकीकडे नाटकांचे प्रयोग आणि दुसरीकडे महाविद्यालयीन शिक्षण सक्षमतेने पार पाडत त्यांनी फ्रेंच भाषेतील पदवी एलफिन्स्टन महाविद्यालयातून घेतली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘क्लिअरअॅसेल’ या सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीसाठी ‘मॉडेल’ म्हणून त्यांची निवड झाली. जाहिरातींमधून प्रत्यक्ष काम केल्याने या क्षेत्राची मागणी, तिथे चालणारे काम आणि एक अभिनेत्री, मॉडेल म्हणून त्या माध्यमाची जाण, बारकावे त्यांनी आत्मसात केले. याच काळात मुंबईमध्ये ‘पर्यटन विकास’ क्षेत्रामध्ये त्यांनी गाईड म्हणून काम केले. महाविद्यालयात असतानाच ‘सत्यदेव दुबे’ यांच्या नाटकात काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. एकाचवेळी निरनिराळ्या स्तरावर अनेक तऱ्हेची काम केल्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध होत होते आणि त्याच वेळी जीव ओतून केलेल्या प्रत्येक कामातून दिसणारी त्यांची अभिनयावरची निष्ठा आणि मेहनत करण्याची तयारी यामुळे एका कामातून दुसरे काम त्यांच्यासमोर नवी संधी म्हणून उभे राहत होते. ‘संभोगसे संन्यासतक’, ‘आधेअधुरे’, ‘अरे मायावी सरोवर’, ‘आह’, ‘अबे बेवकूफ’ ही हिंदी नाटके सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना करता आली. (१९७१-७२) या वर्षी मुंबई परिसरातील ‘मिस वनिता समाज’ हा किताब त्यांनी मिळवला. अशी चौफेर वाटचाल सुरू असताना, सत्यदेव दुबेंच्या नाटकातून अभिनय करताना ‘दिलीप कुळकर्णी’ या अभिनेता-दिग्दर्शकांबरोबर परिचय झाला आणि २५ ऑक्टोबर, १९८० साली ते विवाहबद्ध झाले.
नीना कुळकर्णी यांनी १९८१ च्या सुमारास दूरदर्शन केंद्रामध्ये निवेदक म्हणून काम केले. नीना कुळकर्णी यांच्या रंगभूमीवरील प्रवासात १९७७ साली ‘हमीदबाईची कोठी’ या अनिल बर्वेलिखित आणि विजय मेहता दिग्दर्शित नाटकात ‘शब्बो’ची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी केली. ‘महासागर’मधील (१९७८) ‘चंपू’, ‘सावित्री’ (१९८५), ‘सवाल अंधाराचा’, ‘ध्यानीमनी’मधील ‘शालन’, ‘नागमंडल’मधील ‘राणी’, ‘अकस्मात’, ‘नातीगोती’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘प्रेमपत्र’मधील ‘गुलमोहर’ अशा आशयघन आणि निरनिराळ्या कौटुंबिक, सामाजिक विषयांचा सखोल वेध घेणाऱ्या नाटकांमधून नीना कुळकर्णी या गुणी अभिनेत्रीने निरनिराळ्या ढंगांच्या भूमिकांना न्याय दिला आणि त्या भूमिका अजरामर केल्या. विजया मेहता यांच्या मार्गदर्शनाने ‘महासागर’ या नाटकाच्या दिग्दर्शनाचा अनुभवही नीना कुळकर्णी यांनी घेतला. रंगभूमीवर विशेष प्रेम असलेल्या नीना कुळकर्णी यांना प्रेक्षकांची, रसिकांची थेट मिळणारी दाद, प्रतिसाद अधिक भावतो. त्यांचे रंगभूमीशी असलेले नायिका, चरित्रनायिका, खलनायिका अशा रूपातील नाते २९ वर्षे दृढ होते.
मराठी नाटकांखेरीज ‘डॉक्टर आपभी’ या हिंदी आणि ‘महात्मा व्हर्सेस गांधी’ या इंग्रजी नाटकात ‘कस्तुरबां’ची भूमिका त्यांनी साकारली. देहबोली, संवादाची फेक, शब्दोच्चार, भाषा आणि नाटकाच्या संवादात कलाकार म्हणून अभिनयाने घातलेली भर या बळावर त्यांनी स्वतःची अभिनयक्षमता वारंवार सिद्ध केली आहे. ‘रंगभूमी म्हणजे सतत शिकणं’ असे मानणाऱ्या नीना कुळकर्णी यांनी मराठी चित्रपटांमधूनही काम केले. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘सूनबाईचा भाऊ’ या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेने त्यांची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली असली तरी ‘ताईच्या बांगड्या’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी ‘सवत माझी लाडकी’ (१९९३), ‘हसरी’, ‘आई’, ‘पछाडलेला’, ‘सातच्या आत घरात’, ‘उत्तरायण’ (२००४), ‘नितळ’ (२००९), ‘गंध’ अशा वैविध्यपूर्ण कथानक असलेल्या चित्रपटातून भूमिका केल्या. २००६ साली त्यांनी ‘शेवरी’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील ‘विद्या’ची व्यक्तिरेखा त्यांनी समर्थपणे मांडली. विद्याच्या दिशाहीन झालेल्या आयुष्याला एका रात्रीत मिळालेले वळण आणि या दरम्यान मनाच्या पातळीवरची आंदोलने नीना कुळकर्णी यांनी अभिनय सामर्थ्याने जिवंत केली आहेत. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच याशिवाय ‘पिस’चा तुकाराम पुरस्कारही मिळाला. फेस्टिव्हल ऑफ केरळसाठी या चित्रपटाची निवड झाली होती. ‘अनुमती’ या २०१३ साली आलेल्या चित्रपटात छोटी पण आशयदृष्ट्या महत्त्वपूर्ण भूमिका नीना यांनी केली.
नीना कुळकर्णी यांनी मराठी चित्रपटांच्या तुलनेत हिंदी चित्रपटही मोठ्या संख्येने केले. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘नायकाची आई’ म्हणून त्यांना ‘वलय’ प्राप्त झाले आहे. ‘दाग-द-फायर’ (१९९६), ‘मिर्चमसाला’ (१९८५), ‘दायराँ’ (१९९६), ‘बादल’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘गुरू’, ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘हंगामा’, ‘पहेली’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील कसदार अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. ‘भूतनाथ’ आणि ‘रण’ या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही त्यांनी काम केलेले आहे.
मुंबईच्या आंतर नाट्यस्पर्धेत रमणाऱ्या, सत्यदेव दुबेंना एक उत्तम शिक्षक मानणाऱ्या आणि विजया मेहता यांच्या नाट्यविषयक दृष्टिकोनाने स्वतःची जाण समृद्ध करणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी नाटक-चित्रपट-दूरदर्शन मालिका या तीनही माध्यमांची ताकद आणि मर्यादा लक्षात घेऊन त्या त्या माध्यमाशी त्या अतिशय सहजपणे एकरूप झाल्या.
‘अधुरी एक कहाणी’ (२००४) ही दूरदर्शन वाहिनीवरील नीना कुळकर्णी यांची पहिली मराठी मालिका होती आणि ‘सारथी’ ही हिंदीतील पहिली मालिका. या मालिका करण्यापूर्वी सई परांजपे यांची ‘अडोसपडोस’, तसेच ‘हिना’ (१९८५) या मालिकांमुळे या क्षेत्राची ओळख त्यांना होतीच, पण २००२ साली दिलीप कुळकर्णी यांच्या अकाली निधनानंतर मात्र नीना कुळकर्णी यांनी आपले कुटुंब सावरण्यासाठी दूरदर्शन मालिकांना प्राधान्य दिले. ‘लज्जा’, ‘उंच माझा झोका’, ‘देवयानी’, ‘स्वामी’, ‘अनुभूती’, ‘दृष्टीदान’ या मराठी आणि ‘हिंदी है हम’ आणि ‘मेरी माँ’ या हिंदी मालिकांमध्येही नीना यांनी भूमिका केल्या आहेत.
ए.आय.सी. मास्टरकार्ड, कॅटबरी, मदर डेअरी, बिस्लेरी या जाहिरातपटांमधूनही नीना कुळकर्णी यांनी आपली मोहोर उमटवली आहे. लेखन हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकसत्ताच्या चतुरा पुरवणीसाठी ‘अंतरंग’ हे सदर लिहिले (१९९४-९५) नंतर ते त्याच शीर्षकाने प्रकाशित झाले आहे.
व्यावसायिक अभिनेत्री म्हणून यश मिळवताना अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. ‘अकस्मात’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नाट्यदर्पण, नाट्यपरिषद आणि नाट्यनिर्माता संघाचा पुरस्कार मिळाला.‘महासागर’ या नाटकातील भूमिकेमुळे विशेष लक्षवेधी अभिनेत्री म्हणून पारितोषिक मिळाले.‘देहभान’ या नाटकाकरिता ‘म.टा.’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.‘सवत माझी लाडकी’ या चित्रपटातील ‘सीमा’च्या भूमिकेसाठी आणि ‘उत्तरायण’मधील भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ म्हणून राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला, तसेच ‘आई’ या चित्रपटातील ‘आई’च्या सक्षम भूमिकेसाठी ‘अप्सरा अॅवॉर्ड’ने त्यांना गौरवण्यात आले.
भूमिका निवडीबाबत चोखंदळ असणाऱ्या नीना कुळकर्णी यांनी साकारलेल्या बहुतांश भूमिका या गंभीर प्रवृत्तीच्या आहेत. थोडक्या पण नेटक्या भूमिका साकारण्यामागे त्यांची भूमिका पडताळून पाहण्याची, त्याचा सखोल अभ्यास करण्याची व भूमिकेच्या मूळाशी जाण्याची प्रवृत्ती असलेली दिसते. भूमिकेची परिणामकारकता त्यांच्या अभिनयातून अपरिहार्यपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहात नाही.