कुलकर्णी, विष्णुपंत विठ्ठल
विष्णुपंत विठ्ठल कुलकर्णी यांचा जन्म सोलापूर येथील माळशिरस या गावी सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरमधील हरिभाई देवकरीण प्रशालेमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्याला त्यांनी बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवी शिक्षणाच्या दुसर्या वर्षाला शिकत असताना कुलकर्णी यांचे वडील अत्यंत आजारी पडले. त्यावेळी त्यांना नाईलाजाने शिक्षण सोडून घरातील शेती व्यवसायात लक्ष घालावे लागले.
माळशिरस या आपल्या जन्मगावी शेती करत असतानाच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाला सुरुवात केली व त्या कामात ते अतिशय रमले. संघ कार्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यामध्ये सामाजिक कार्य करण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे पुढे ते ‘आण्णाकाका’ या नावाने ओळखले जाऊ लागले. ते 1970 मध्ये माळशिरसमध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आले. त्यांनी 1979 पर्यंत आपले सरपंचपद निष्ठेने व आस्थेने सांभाळले. त्यांनी सरपंच झाल्यावर गावातील मूलभूत गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कार्यामुळेच माळशिरस ग्राम पंचायतीचे सदस्य म्हणून 11 वर्षे सातत्याने त्यांची निवड झाली.
अण्णाकाका स्वत: शेतकरी होते; त्यामुळे त्यांना शेतकर्यांच्या आर्थिक बिकटतेची जाणीव होती. त्यांनी शेतकरी वर्गाचे आर्थिक प्रश्न कमी करण्यासाठी माळशिरस येथे विकास सेवा सहकारी संघाची स्थापना केली. ते या संघाचे 40 वर्षे अध्यक्ष होते. जिल्हा बँकेचे कर्ज न घेता संस्थेच्या फंडातून शेतकर्यांना कर्ज वाटप करणारी संपूर्ण जिल्ह्यामधील 4 संस्थापैकी ती एक संस्था होती. त्यांनी गावातील शिक्षणाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यानिमित्ताने गावातील विद्यार्थ्यांना बालवाडी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय प्राप्त झाली. ते या संस्थेचे सचिव व 1960 नंतर अध्यक्ष म्हणून सक्रीयपणे काम करत होते. त्यांनी 2011 पर्यंत या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले.
अण्णाकाका यांनी 1986 मध्ये माळशिरस ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेची स्थापना करण्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी 2011 पर्यंत या संस्थेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. तसेच त्यांनी हनुमान सहकारी दूध संघ व विठ्ठल सर्व व्यावसायिक सहकारी ग्राहक भांडार संस्थेची स्थापना करण्यातही पुढाकार घेतला होता. ते या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष म्हणून सलग 25 वर्षे कार्यरत होते.
अण्णाकाकांनी भारतीय किसान संघामध्येही सलग 15 ते 20 वर्ष प्रांत उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. त्याच दरम्यान म्हणजे 1972 मध्ये झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या पंढरपूर अधिवेशनाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या सोबत ग्रामीण भागात सहकार क्षेत्राचे संघटन व प्रसार करण्याचे काम त्यांनी अतिशय जागरुकपणे केले. त्यांनी 1962 मध्ये माळशिरस तालुक्यातील सदाशिव नगर येथे शंकर सहकार साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. या साखर कारखान्याचे ंसंचालकपद त्यांनी 2011 पर्यंत सांभाळले. त्यापैकी 10 वर्षे ते या कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
विजयसिंग मोहिते-पाटील यांच्या सल्ल्यानुसार अण्णाकाकांनी खाजगी पोल्ट्री फार्मची स्थापना केली व यातून बेरोजगार तरुणांना खाजगी पोल्ट्री व्यवसायांना प्रोत्साहन दिले. तसेच अण्णाकाकांना 1988 मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांनी स्थापन केलेल्या शिवकृपा कुक्कुटपालन सहकारी उद्योजक संघाचे अध्यक्ष होण्याचा मानही मिळाला. त्यांचा 1997 मध्ये या संस्थेच्या अद्वितीय कामगिरीबद्दल के. आर. नारायणन यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांना दिल्ली येथील संस्थेमार्फत जीवन ज्योती पुरस्कार दिला. याशिवाय अण्णाकाका शिवरत्न सहकारी दूध संघ अकलूज या संस्थेचे 20 वर्षे - संचालक; विजयरत्न सहकारी पशुपक्षी संघांचे 10 वर्ष - अध्यक्ष; श्रीरामदेव व श्रीमारुती देवस्थानाच्या ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त होते. त्यांनी माळशिरस येथील हनुमान मोफत वाचनालयाचे प्रमुख विश्वस्त म्हणून 30 वर्षे काम पाहिले.
अण्णाकाकांचे वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना पाच मुली व एक मुलगा मिलिंद अण्णाकाकांनी उभे केलेले काम समर्थपणे सांभाळत आहेत.
- संपादित