Skip to main content
x

लाखकर, श्रीनिवास वामनराव

    श्रीनिवास वामनराव लाखकर यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपूरमधील महाल भागातील न्यू इंग्लिश शाळेत झाले. नागपुरातील विज्ञान महाविद्यालयातून इंटर सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जानेवारी १९५२मध्ये एम.टी.टी.एस. डफरीनमध्ये कॅडेट म्हणून प्रवेश घेतला. प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन जानेवारी १९५४मध्ये ते डेहराडून येथील नेव्हल विंगमध्ये ते दाखल झाले.

     १९५६मध्ये‘आय.एन.एस.वीर’वरून बेस्ट कॅडेट म्हणून उत्तीर्ण झाल्यावर पुढे १९५७मध्ये त्यांनी बेस्ट 'मिडमनशिप' म्हणून प्रावीण्य मिळवले. १९५६मध्ये भारतीय नौसेनेच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँचमध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यांनी १९६२मध्ये ‘नॅव्हिगेशन अँड डायरेक्शन स्पेशलायझेशन’ हा अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने पूर्ण केला.

     १९६१मधील गोवामुक्तीसाठीची सैनिकी कारवाई, तसेच १९६५मधील भारत-पाक युद्धात लाखकर यांचा सहभाग होता. अर्नाळा, 'आय.एन.एस.दीपक',तसेच भारतातील सर्वाधिक प्रगत आणि  शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक अशा 'आय.एन.एस.रजपूत' ह्या युद्धनौकेचे कमांडर म्हणूनही त्यांनी काम पाहिले.‘आय.एन.एस. रजपूत’साठी लढाईची काही मार्गदर्शक तत्त्वे त्यांच्या कार्यकालात अस्तित्वात आली.

     पाकिस्तान युद्धातील विजयामध्ये नौसेना कार्यवाहीचे उपसंचालक म्हणून बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना ‘विशिष्ट सेवा पदक’ मिळाले आहे. तत्कालीन सोव्हिएट महासंघाकडून ‘आय.एन.एस. अंबा’ ह्या युद्धनौकेचा स्वीकार त्यांनी भारताच्या वतीने केला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या नौकेच्या रक्षणासाठी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना ‘नौसेना पदक’ प्रदान करण्यात आले. 

     भारतीय शांतिसेनेच्या श्रीलंकेतील कारवाईला सहकार्य करण्यासाठी तैनात केलेल्या नौसेनेचे पूर्व विभागाचे कमांडर म्हणून त्यांनी १९८७-८८ दरम्यान चोख कामगिरी बजावली. एल.टी.टी.ई. म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलमच्या ताब्यातून जाफनाचे नियंत्रण घेण्यासाठी पार पाडलेल्या ‘ऑपरेशन पवन’मधील त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

     त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, तसेच नौसेनेच्या नौकानयन विद्यालयात (नॅव्हिगेशन स्कूल) प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांची सर्वांत महत्त्वाची नियुक्ती म्हणजे नौसेना मुख्यालयातील मनुष्यबळ विकासाचे संचालक ही होय. या पदावर असताना नौसेनेला मनुष्यबळ पुरवणे, नौसैनिकांची कारकिर्द घडवणे, तसेच त्यांच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरळीत जावे इत्यादींसाठी लाखकरांनी काही नवीन नियमांची प्रभावीपणे आखणी व मांडणी केली. तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या समुद्रातील विहिरींचे रक्षण करण्यासाठी त्यांनी एका नवीन संस्थेची उभारणी केली. अशा आस्थापनांच्या रक्षणासाठी त्यांनी मांडलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार नंतर नौसेनेकडून करण्यात आला.

     ‘ऑफशोअर डिफेन्स अ‍ॅडव्हायजरी ग्रुप’चे ते पहिले ध्वजाधिकारी (फ्लॅग ऑफिसर) होते. त्याबरोबर ‘मॅरिटाइम स्टेट ऑफ महाराष्ट्रा’चे पहिले ‘ध्वजाधिकारी’ म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात, जानेवारी १९९०पासून त्यांनी तटरक्षक दलाचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या ह्या कार्यकाळात तटरक्षक दलाला खऱ्या अर्थाने लौकिक प्राप्त झाला. भारतीय नौसेनेतील उत्कृष्ट पाणबुडे (डायव्हिंग ऑफिसर), तसेच विमानवाहू नौका व नाविक विद्येचे तज्ज्ञ हीच त्यांची ओळख आहे. ते उत्तम गोल्फपटूसुद्धा आहेत. नौसेनेतील देदीप्यमान कारकिर्दीबद्दल ‘परमविशिष्ट सेवा पदका’ने २६ जानेवारी १९६२ रोजी त्यांचा गौरव करण्यात आला.

- प्रणव पवार

लाखकर, श्रीनिवास वामनराव