Skip to main content
x

मंगेशकर, हृदयनाथ दीनानाथ

पं.हृदयनाथ दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म सांगली येथे झाला. मराठी संगीत रंगभूमीवरचे असामान्य गायक-नट, मा. दीनानाथ व श्रीमती माई मंगेशकर यांचे लता, मीना, आशा, उषा या मुलींनंतर जन्मलेले हे पाचवे अपत्य होय. जन्मानंतर अल्पावधीतच झालेल्या बोन टी.बी.मुळे दुखावलेल्या व्याधिग्रस्त पायामुळे सामान्य मुलाला लाभणारे बालपण त्यांच्या वाट्याला आले नाही.

मा.दीनानाथ यांचे २४ एप्रिल १९४२ रोजी अकाली निधन झाले. त्यावेळी हृदयनाथ अवघे साडेचार वर्षांचे होते. छोट्या लतादीदींनी चरितार्थासाठी ‘नवयुग’मध्ये बालकलाकार म्हणून नोकरी धरली आणि तिथून १९४३ सालापासून मंगेशकर कुटुंब पुणे, कोल्हापूर, खानदेशातले थाळणेर व अखेर १९४५ मध्ये मुंबई येथे स्थिरावले. या वेळी हृदयनाथांच्या आई म्हणजे माई मंगेशकर यांनी हृदयनाथांना घरातच शिक्षणाचे धडे दिले. संग्रहातली राम गणेश गडकरी, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नाटकाची पुस्तके वाचून दाखवली. त्यामुळे त्यांच्यावर तेजस्वी, प्रभावी भाषेचा खोल संस्कार झाला व त्यांना साहित्याची गोडी लागली. मुंबईत शाळेत गेल्यावर प्राथमिक शाळेतला अभ्यासक्रम फारच बाळबोध वाटू लागला व शाळेत जाण्यात त्यांना रस वाटत नव्हता.

लतादीदींनी १९४७ साली मुंबईच्या चित्रपटक्षेत्रात पार्श्वगायनात पाऊल टाकले व पुढे वैभवाचे दिवस पुन्हा आले. मंगेशकरांच्या घरात साहित्यिक, संगीतकार, कवी यांचा ओघ सुरू झाला. आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, गो.नी. दांडेकर, मजरूह, साहिर यांच्यासारख्यांच्या सहवासातून, देशोदेशीच्या कलाकारांच्या गायन-वादनाच्या श्रवणातून, इतिहास व साहित्याच्या प्रचंड वाचनातून हृदयनाथ मंगेशकर हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व घडत गेले. ‘ये दुनिया कैसी है भगवान’ हे ‘दीवाना’ (१९५२) व ‘छडी लागे छम छम’ हे ‘श्यामची आई’ (१९५३) या चित्रपटांतील अशी गाणी ऐकली तर लहान वयातल्या हृदयनाथांच्या सुरेल गळ्याची झलक दिसते.

‘सुरेल कला केंद्र’ येथे उषा, मीना या बहिणी व प्यारेलाल, अरविंद मयेकर इत्यादी यांच्याबरोबर किशोरावस्थेत असताना त्यांनी कलापथक चालवले व  रंगमंचावरील अनेक कार्यक्रम केले. विख्यात गायक उस्ताद अमीरखाँ साहेब यांची शागिर्दी पत्करून त्यांनी संगीताची रीतसर तालीम घेतली. संगीतकार सलील चौधरी यांनी केलेला पाश्चात्त्य संगीतातला कॉर्ड्सचा वापर आणि अभिजात पाश्चात्त्य संगीताचे श्रवण आणि खुद्द सलीलदांचे मार्गदर्शन यांचा प्रभाव हृदयनाथांवर झालाच; शिवाय वडिलांच्या म्हणजे मा. दीनानाथांच्या बंदिशींचा अभ्यास, जुन्या-नव्या कवितांचे वाचन या रसायनातून हृदयनाथांची आगळीवेगळी शैली समोर आली.

वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी आपल्याला संगीत द्यायची इच्छा आहे असे सांगितले आणि लतादीदींच्या आवाजात भा.रा.तांबे यांच्या दोन रचना, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ व ‘कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी’, त्यांनी १९५६ च्या सुमारास ध्वनिमुद्रित केल्या. त्याच वेळी एच.एम.व्ही.साठी लतादीदींच्या आवाजात संगीतबद्ध केलेली सुरदासांची रचना, ‘निसदिन बरसत नैन हमारे’ व मीराबाईंची ‘बरसे बुंदियाँ सावन की’ व मुंबई आकाशवाणीसाठी केलेले राजा बढे यांचे ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे आशाताईंनी गायलेले गीत श्रोत्यांसमोर आले आणि जाणकारांचे लक्ष वेधले गेले.

हृदयनाथांनी १९५९ साली ‘आकाशगंगा’ या चित्रपटाला प्रथम संगीत दिले होते. ‘पवनाकाठचा धोंडी’ (१९६६), ‘धर्मकन्या’ (१९६८), ‘जैत रे जैत’ (१९७७), ‘जानकी’ (१९७९), ‘उंबरठा’ (१९८१), ‘निवडुंग’ (१९८९), तर ‘प्रार्थना’, ‘मशाल’, ‘धनवान’, ‘माया मेमसाब’, ‘लेकिन’ असा मराठी-हिंदी निवडक चित्रपटांचा आलेख वैशिष्ट्यपूर्ण संगीताची साक्ष देतो.

गोड भावगीत आणि विशिष्ट धाटणीचे, वळणाचे चित्रपट संगीत ऐकणार्‍या श्रोत्यांना हृदयनाथांच्या ‘येरे घना’, ‘जिवलगा राहिले हे दूर घर माझे’, ‘ही वाट दूर जाते’, ‘समईच्या शुभ्र कळ्या’, ‘दे मला गे चंद्रिके’, ‘मावळत्या दिनकरा’ या व अशा गीताबद्दल औत्सुक्य वाटले. साठ व सत्तरच्या दशकांतल्या हृदयनाथांच्या रचनांकडे तरुण श्रोते आकर्षित झाले. काहीशा अवघड, दुर्बोध वाटणार्‍या चाली नव्या पिढीने डोक्यावर घेतल्या.

संत ज्ञानेश्वरांच्या विराण्या, ‘पैल तो गे काऊ कोकताहे’, ‘मोगरा फुलला’, ‘अवचिता परिमळु’, ‘पांडुरंगकांती’, ‘पसायदान’, लतादीदींच्या स्वरातला भगवद्गीतेचा चौथा व नववा अध्याय, मीरेची भजने, गालिबच्या गझला, ना.धों. महानोर, आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस यांच्या रचनांनी जाणकारही आकर्षित झाले. शांता शेळके यांच्याबरोबर केलेली कोळीगीते, गणपतीची गाणी आजही वारंवार ऐकली जातात.

१९६९ पासून हृदयनाथ ‘भावसरगम’या कार्यक्रमातून स्वतःची गीते सादर करू लागले. लता मंगेशकर, आशा भोसले हे अद्वितीय भगिनीद्वय त्यांच्या संगीताचा प्राणाधार असला तरी किशोरी आमोणकर, अरुण दाते, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल हे कलावंतदेखील त्यांच्या रचना गायले आहेत.

‘मानसीचा चित्रकार तो’, ‘लाजून हासणे’, ‘वेगवेगळी फुले उमलली’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘नको देवराया अंत आता पाहू’ ही त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रिय आहेत. हृदयनाथांनी वैजनाथ व राधा या मुलांना, तसेच अनुराधा पौडवाल, सोनाली राठोड या शिष्यवर्गाला तयार केले आहे. राधा मंगेशकरचा अल्बम ‘नाव माझं शामी’ (२००९) तसेच ‘कस’ व ‘खेळ सातबाराचा’ (२००९) या चित्रपटांचे संगीत हे त्यांचे अलीकडच्या काळातील संगीत दिग्दर्शन होय.

हृदयनाथ ‘लेकिन’ (१९९०) च्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले. संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना २००३ साली ‘भावगंधर्व’ ही पदवी दिली. भारत सरकारने हृदयनाथांना २००९ साली ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले, तर रसिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘पंडित’ म्हणून गौरविले.२०१४ साली आचार्य अत्रे मानचिन्ह त्यांना मिळाले. हृदयनाथ मंगेशकर यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील गुणी कलाकाराला पुरस्कार दिला जातो.

सुलभा तेरणीकर

मंगेशकर, हृदयनाथ दीनानाथ