Skip to main content
x

मशे, जिव्या सोम्या

         हाराष्ट्रातील वारली चित्रकला परदेशात लोकप्रिय करणारे आणि तिला भारतीय लोककलांच्या प्रकारात मानाचे स्थान मिळवून देणारे जिव्या सोम्या मशे यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जिव्या यांचे आयुष्य डहाणूजवळच्या गंजाड येथे गेले.

जिव्या सोम्या मशे यांची आई ते लहान असतानाच निवर्तली. आई-वडिलांशिवाय वाढलेले जिव्या आजूबाजूच्या स्त्रियांना त्यांच्या कामांत मदत करत असत. विशेषतः भिंतीवर रेखाटल्या जाणाऱ्या चित्रांमध्ये मदत करताना त्यांना खूपच रस वाटे. स्त्रियाही त्यांना प्रोत्साहन देत. हे काम करताना जिव्या त्यांच्या कल्पनाशक्तीने त्यात आजूबाजूचे विविध प्राणी, पक्षी, झाडे यांचा समावेश करू लागले व चौकाची शोभा वाढू लागली. कुणाकडे लग्नकार्य असले की त्यांना आवर्जून बोलावले जाई आणि ते घरातील स्त्रियांबरोबर ‘चौक’ चित्र बनवीत.

शेणाने सारविलेल्या कुडाच्या भिंतींवर तांदळाच्या पिठीचा रंगाप्रमाणे उपयोग करून आदिवासींच्या जीवनातील रेखाटलेले विविध प्रसंग म्हणजेच ‘वारली’ चित्रकला. पूर्वापार परंपरेतून चालत आलेली ही कला म्हणजे आदिवासींच्या जीवनाचा एक भाग होती. मुख्यत्वे स्त्रिया, घरामध्ये एखादे लग्न असे तेव्हा ही चित्रे घरांच्या भिंतींवर रेखाटत. त्याला ‘चौक’ असे म्हणत. या रेखाटनामध्ये एक चौकोन काढून त्यामध्ये देवीची प्रतीके व दैनंदिन वापराच्या काही वस्तूंचे चित्रण असे. लग्नघर रंगवण्याचे काम जिव्यासारखा पुरुष करतोय हे समाजाला रुचले नाही. समाजाने त्याला वाळीत टाकले. पण ते चित्र रंगवत राहिले. अशातच त्यांचे लग्न झाले.

दिल्लीत ‘अपना उत्सव’- मध्ये समाविष्ट करता येतील अशा लोककलांचा १९७० च्या दशकामध्ये शोध घेतला जात होता. ‘वीव्हर्स सर्व्हिस सेंटर’मध्ये कार्यरत असलेले भास्कर कुलकर्णी हे ठाणे जिल्ह्यातील काही पाड्यांवर भटकंती करत असताना त्यांच्या दृष्टीला काही झोपड्यांमध्ये हा ‘चौक’ प्रकार आढळून आला. त्यांच्या मनाला तो खूप भावला. ‘जर हा चित्रप्रकार कागदावर उतरवता आला तर?’, या कल्पनेतून त्यांनी या पाड्यांमध्ये चौकशी केली असता काही स्त्रिया हे काम करण्यास तयार झाल्या. त्यांना कागद व इतर साहित्य पुरवले गेले. परंतु ही चित्रे भिंतीवरील चित्रांशी ताडून बघितल्यावर त्यांमध्ये प्राणी, पक्षी व झाडे वगैरे नसल्याचे आढळून आले. हे सर्व जिव्याने काढले असल्याचे कुलकर्णी यांना समजले, तेव्हा कुलकर्ण्यांनी जिव्याकडून चित्रे काढून घेतली आणि त्यांना हवे ते साध्य झालेे. जिव्याच्या चित्रांना मागणी येऊ लागल्यावर बांबूच्या काड्या जाऊन जिव्या ब्रशने कागदावर काम करू लागला

कुलकर्णी यांनी चित्रे काढणाऱ्या त्या स्त्रिया व जिव्याला दिल्लीला नेले. पुपुल जयकर या ‘अपना उत्सव’च्या सर्वेसर्वा होत्या. त्यांनादेखील ही चित्रे खूप भावली. त्या वर्षीच्या पहिल्याच प्रदर्शनामध्ये परदेशी पर्यटकांनीदेखील या चित्रप्रकाराला उचलून धरले. जिव्या सोम्या मशे यांचे नाव झाले. काही खाजगी गॅलऱ्यांनी या चित्रप्रकाराची प्रदर्शने भरविण्याची तयारी दर्शविली. ‘केमोल्ड’ गॅलरीतर्फे मुंबईत जिव्या सोम्या मशे यांचे प्रथम चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले व ते प्रचंड यशस्वी ठरले. त्यांना आणखी चित्रे पुरविण्याची ऑर्डर मिळाली. त्यामुळे जिव्या ह्यांच्या कल्पनाशक्तीला वेगळीच दिशा मिळाली. त्यांच्या कॅनव्हासवर निसर्ग आणि आदिवासींची जीवनशैली आकार घेऊ लागली. सहज, सोप्या आकारांमधून आदिवासी समाजाची दिवाळी, होळी, मासेमारी, लग्न, शेतीची कामे, लोककथा दाखविल्या जाऊ लागल्या. लोकांच्या मनालादेखील ही चित्रे भावू लागली. जिव्यांची चित्रे सातासमुद्रापार गेली. जिव्या यांचा जसा बाह्य जगाशी संपर्क येत गेला, तशा त्यांच्या चित्रांमध्ये रेल्वे गाडी, हेलिकॉप्टर अशा आधुनिक युगातल्या प्रतिमाही येऊ लागल्या. श्रीमती इंदिरा गांधींच्या हस्ते १९७६ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले. इंदिराजींनी त्यांना या चित्रशैलीला काय नाव द्यायचे याची विचारणा केली. जिव्यांनी लगेचच त्यांना ‘ही आमची आदिवासींची कला आहे, त्यामुळे तिला आमच्या जमातीचे नाव द्यावे, म्हणजेच ‘वारली चित्रकला’ म्हणावे,’ असे सांगितले.

‘स्वतःकरिता काय हवे?’ असे विचारले असता त्यांनी जमीन मागितली व इंदिराजींनी त्यांना दोन एकर जमीन देण्याचे जाहीर केले. पण १९७६ साली देण्यात आलेली ही जमीन जिव्या सोम्या मशे यांच्या ताब्यात पस्तीस वर्षांनतर आली! सरकारने २०११ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर केला आणि त्या निमित्ताने जमिनीचे आश्‍वासन प्रत्यक्षात आले. राहुल गांधींच्या हस्ते त्यांना जमिनीची कागदपत्रे देण्यात आली. आता त्या जागेवर ‘वारली’ चित्रकलेचे एक संग्रहालय बनविण्याचा त्यांचा विचार आहे.

इ.स. २००० मध्ये ‘रिचर्ड लाँग’ नावाचा चित्रकार भारतात येऊन जिव्या सोम्या मशे यांच्याकडे राहिला. त्यांच्या चित्रांशी स्वतःच्या चित्रांचा तुलनात्मक अभ्यास करून त्याने दोघांचे एक संयुक्त चित्रप्रदर्शन २००३ मध्ये जर्मनीत ड्युसेलडॉर्फ येथे आणि २००४ मध्ये इटलीतील मिलानो येथे आयोजित केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

आज ‘वारली’ चित्रकलेचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. या चित्रशैलीतला अलंकरणात्मक भाग तेवढा लक्षात घेतल्यामुळे ती सत्त्वहीन होत चालली आहे. वारली शैलीतला प्रतिमांचा साधेपणा, अवकाशाचा वापर आणि त्याची संस्कृतिसापेक्ष कथनात्मकता यांचा आदिवासी आणि भारतीय व आधुनिक कलेच्या संदर्भात अभ्यास होणे आवश्यक आहे. जिव्या यांच्या कलाकृतींचे महत्त्व या दृष्टीने खूप मोठे आहे.

जिव्या सोम्या मशे यांची वारली चित्रकलेची परंपरा त्यांची दोन मुले, सदाशिव व बाळू, तसेच त्यांचे नातू विजय, किशोर व प्रवीण हे वारली सांभाळताना  दिसतात. सदाशिव यांना गेली अनेक वर्षे जपानच्या म्यूझियम्समध्ये ‘वारली’ चित्रविषय चितारण्यासाठी बोलविले जाते.

१९७६ साली राष्ट्रपती पुरस्काराने तर २०१६ मध्ये मशे ह्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले.

  

               - संदीप प्रभाकर

              .

 

संदर्भ
तारदाळकर, रत्नाकर; ‘आदिम चैत्रशैलीचा उद्गाता’; ‘महाराष्ट्र टाइम्स’, ६ फेब्रुवारी २०११
मशे, जिव्या सोम्या