ओंकार, धुंडिराज भास्कर
भय्यासाहेब ओंकार तथा धुंडिराज भास्कर ओंकार यांचा जन्म पुणे येथील शनिवार पेठेतील ओंकारांच्या पेशवेकालीन वाड्यात झाला. त्यांचे वडील काकासाहेब भास्कर ओंकार हे ऑनररी बेंच मॅजिस्ट्रेट होते. त्यांच्या आईचे नाव सावित्री होते. ओंकारांना चित्रकलेचा वारसा आईकडून लाभला व वडिलांनी त्यांच्यात कलागुणांची जोपासना केली.
डॉ.भय्यासाहेब ओंकारांचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. या शाळेतील चित्रकला शिक्षक रा.शं. घोरपडे, दिगंबर सखाराम नाईक यांनी ओंकारांना चित्रकलेचे धडे दिले. व्ही.के.पाटील, वा.गो.रानडे, ज.द.गोंधळेकर, दीनानाथ दलाल अशा मान्यवर चित्रकारांचे ओंकारांना मार्गदर्शन लाभले. ‘स्वानंद सुखासाठी कलेची साधना करा’, हा मंत्र त्यांचे गुरू दीनानाथ दलाल यांनी ओंकारांना दिला होता.
ओंकारांचे पहिले चित्र वयाच्या आठव्या वर्षी ‘शालापत्रक’मध्ये छापले गेले. तसेच, बाराव्या वर्षी त्यांनी ‘स्वभावचित्र’ हे पहिले पुस्तक लिहिले. त्यांचे लेखन व चित्रकलेतील नैपुण्य बघून शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी त्यांना ‘बालकलानिधी’ ही पदवी बहाल केली होती. या निमित्ताने औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनीही त्यांचा गौरव केला.
आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी शालेय शिक्षणानंतर चित्रकला हे क्षेत्र निवडले. ओंकार यांनी जी.डी.आर्ट, डी.टी.सी. व आर्ट मास्टर यांबरोबरच मराठी विषय घेऊन बहिःस्थ विद्यार्थी म्हणून बी.ए. ही पदवी पहिल्या क्रमांकाने संपादन केली. त्यांचा विवाह १९५३ मे मध्ये रजनी यांच्याबरोबर झाला. पुढे एम.ए. केल्यानंतर १९८० मध्ये पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून त्यांनी ‘ग्रंथसजावट’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. मिळविली. पीएच.डी. मिळविणारे ते पहिले चित्रकार होत.
‘कलेचा उपयोग समाजाच्या शिक्षणासाठी व कल्याणासाठी करावा’ हा पंतप्रतिनिधींचा उपदेश ओंकारांनी शिरोधार्य मानला व पुढील आयुष्यात अमलात आणला. चित्रकलेतील पुढील शिक्षण घेतल्यावर ओंकारांनी व्यवसायात पदार्पण केले. विविध पुस्तकांसाठी मुखपृष्ठे, कथाचित्रे, चित्रमालिका, ऐतिहासिक चित्रकथा, चित्रकोडी, दिनदर्शिका यांसाठी त्यांनी चित्रे काढली. व्यक्तिचित्रणात त्यांचा हातखंडा होता. जलरंगासारख्या आव्हानात्मक माध्यमात ‘रामायणा’वरील ४ x ३ फूट आकाराची सहा चित्रे त्यांनी चितारली. त्यांतील काही चित्रे सिद्धबारीच्या आश्रमात लावली आहेत. दोन चित्रे दिल्लीच्या एका आर्ट गॅलरीने विकत घेतली व एक चित्र पुण्याच्या महात्मा फुले संग्रहालयात बघायला मिळते.
डॉ. ओंकारांचा पुण्यातील कला चळवळीतून सक्रिय सहभाग असायचा. महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघटना बांधणीचा पाया भक्कम करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. तसेच, १९६६ मध्ये मोहन धारिया, पी.व्ही. कुलकर्णी व डॉ. ओंकार या तिघांनी रंगावली कलाकारांची ‘महाराष्ट्र कला विकास मंडळ’ नावाची संस्था स्थापन केली. ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या कार्यालयात डॉ. नानासाहेब परुळेकरांच्या मार्गदर्शनाखाली ‘पूना आर्टिस्ट गिल्ड’ या संस्थेची स्थापना झाली. त्याचे डॉ. ओंकार हे चिटणीस होते. पुण्यातील संस्कारभारतीच्या विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. विविध बालकुमार चित्रकला स्पर्धा घेण्यात त्यांचा पुढाकार असे. डॉ. ओंकार हे सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असलेले चित्रकार होते.
१९६१ पासून डॉ. ओंकारांनी पुण्यातील नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात प्रदीर्घ काळ चित्रकलेचे अध्यापन केले. अध्यापनाच्या या प्रदीर्घ कालखंडात ओंकार यांनी विद्यापीठ पातळीवर विभागप्रमुख, प्रपाठक, कला विद्याशाखेचे अधिष्ठाता, कार्यकारी मंडळाचे सभासद अशा अनेक पदांवर काम केले. याशिवाय पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ यांच्या अभ्यास मंडळांवर त्यांची निवड झाली होती. राज्य कला मंडळाचे ते सदस्य होते.
ओंकार हे कलासमीक्षकही होते. त्यांनी एकूण ३० पुस्तकांचे लेखन केले. चित्रकला क्षेत्रातील विविध कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. डॉ. ओंकारांच्या अंगी असलेली गुणग्रहकता व सर्वतोपरी मदत करण्याची त्यांची वृत्ती यांमुळे अनेकांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी एका न्यासाची स्थापना केली आहे व न्यासाच्या माध्यमातून दरवर्षी स्पर्धा, प्रदर्शने असे कलाविषयक उपक्रम करण्यात येतात.