पाटील, जयंत शामराव
वनवासी सेवेचे अविरत व्रत घेऊन काम करणारे, कृषिसंशोधनामध्ये उपयोजित संशोधन करणारे कृषितज्ज्ञ जयंत शामराव पाटील यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातल्या बोर्डी या गावी, शेतकरी कुटुंबात झाला. वडील स्वातंत्र्यसैनिक होते. शामरावांनी चार वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला होता. त्यामुळे जयंतरावांना लोकसेवेचे बाळकडू सुरुवातीपासून घरातच मिळाले.
बोर्डी गावाचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास स्फूर्तिदायक आहे. या पार्श्वभूमीमुळे जयंतरावांना देशसेवा आणि समाजसेवा खुणावत होती. त्यांचे शालेय शिक्षण गुरुकुल पद्धतीच्या शाळेत झाले. ते पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात शिकत असताना, महात्मा गांधीजींच्या सायंप्रार्थनेला जात असत. प्रार्थनेनंतर गांधीजींचे प्रवचन होत असे. अशाच एका प्रवचनात गांधीजींनी श्री. ठक्करबाप्पा यांच्या वनवासी सेवेचा गौरव केला व युवकांना वनवासींच्या सेवेला वाहून घेण्याचे आवाहन केले. जयंतरावांनी तिथेच वनवासी सेवेचा संकल्प केला. पुणे येथील कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी. (कृषी) ही पदवी प्रथमवर्गात प्राप्त करून ते बोर्डीजवळच्या कोसबाड या वनवासी भागातल्या कृषी संस्थेत दाखल झाले. कोसबाड कृषी संस्थेचे संस्थापक व थोर सर्वोदय सेवक आचार्य भिसे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
कोसबाड येथे काम करत असताना त्यांनी जलसंधारणासाठी पृष्ठभाग विहीर, हिरवळ खते, तीन पिकांचे चक्र, सकस चाऱ्याची पिके, फलोत्पादन, आहार बगिचे आणि कृषी वनीकरण या वनवासींना उपयुक्त तंत्रज्ञानाचा प्रसार केला. यामुळे वनवासींना अन्न कायम मिळत राहण्याची खात्री म्हणजे ‘अन्न-सुरक्षा’ मिळाली. वनवासींच्या जमिनीवर उत्पादक रोजगार निर्माण झाल्यामुळे त्यांच्यातली गरिबी कमी होण्यास मदत झाली. असे तंत्रज्ञान विकसित करत असताना, पर्यावरणाचा समतोल टिकून राहील याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे वनवासींचा शाश्वत विकास होऊ शकला. जयंतरावांच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, अनुभवाचा बोर्डीतल्या शारदाश्रम, सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल, आचार्य भिसे शिक्षण संस्था यांना फायदा होत आला आहे. त्यांनी कृषिसंस्थेत ३४ वर्षे काम केले.
भारत सरकारच्या कृषी संशोधन परिषदेने शेतकरी व मच्छीमार यांना कौशल्य शिक्षण देण्याच्या हेतूने कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्याची एक योजना तयार केली. त्या योजनेअंतर्गत कोसबाड येथे सुरू झालेल्या विज्ञान केंद्राचे पहिले संचालक म्हणून जयंतरावांची नियुक्ती झाली. या केंद्रामार्फत वनवासी शेतकऱ्यांना धान्यपिके, भाजीपाला लागवड, फलोत्पादन, जनावरांचे संगोपन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व मत्स्यपालन यांविषयी कौशल्य शिक्षण दिले जाते. जयंतरावांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत वनवासींनी शेती उत्पादन वाढवले, रोपवाटिका तयार केल्या, फळप्रक्रिया उद्योग सुरू केले आणि आजही ती परंपरा चालू आहे. निवृत्तीनंतरही त्यांना जयंतरावांचे मार्गदर्शन मिळत असते.
१९७१ साली जयंतराव ऑस्ट्रेलियात गेले. तिथे त्यांनी चारा पिकांच्या संशोधनाचा अभ्यास केला. भारतात परत आल्यावर कोसबाड येथे त्या संशोधनाचे प्रयोग केले. त्यांपैकी स्टायलो व सिरॅटो ही पिके त्या हवामानात यशस्वी ठरली. या पिकांचा चारा गुरांना दिल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली. कृषितज्ज्ञ डॉ.स्वामिनाथन यांनी ‘या पिकांचा भारतभर प्रसार व्हावा’ असे सांगितले. या चाऱ्यांना गांधीजींचे एक सहकारी स्वामी आनंद यांनी श्रवणघास, सीताघास व दशरथघास अशी नावे दिली. जयंतरावांनी अमेरिकेतून १९६६ साली अॅस्परॅगस हे भाजीपाल्याचे मौल्यवान पीक आणले. ते इथल्या हवामानात रुजवले. त्याचा व्यापारी लागवड म्हणून उपयोग होतो. कृषी विज्ञान केंद्रात काम करत असताना त्यांना अमेरिकेतील फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली. त्यानुसार कॅन्सास विद्यापीठातून त्यांनी कृषिविस्तार या विषयात ‘एम.एस.’ ही पदवी संपादन केली. कोकण कृषी विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली. त्याच सुमारास त्यांनी कॅनडा, इंग्लंड, हॉलंड, इस्त्रायल व फिलिपाइन्स या देशांमधल्या शेती व ग्रामसुधार योजनांविषयी अभ्यास केला.
१९७९ साली सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर दुर्बल वनवासी घटकांच्या विकास कार्याबद्दल जयंतरावांना जमनालाल बजाज पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. सुमारे ५० वर्षे कृषी-औद्योगिक समाजरचनेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने १९९८ साली यशवंतराव चव्हाण पुरस्कार दिला. त्याचप्रमाणे, मदर तेरेसा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कृषिरत्न पुरस्कार, स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर पुरस्कार आणि गांधी राष्ट्रीय समितीचा बापू पुरस्कार, असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
१९८१ साली महाराष्ट्र शासनाने फलोत्पादन हा नवीन विभाग सुरू करून जयंतरावांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या पदावर त्यांनी दहा वर्षे काम केले. फलोद्यानाला लागणाऱ्या पायाभूत सोयी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. १९८२ साली आकाशवाणी मुंबई केंद्राने पहिले आकाशवाणी विज्ञान संमेलन आयोजित केले होते. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना त्यांनी सेंद्रिय खते, पीक संरक्षण, फलोद्यान, कमी कालावधीत अधिक वेळेला पीक उत्पादन यांचा पाठपुरावा केला.
१९८७ साली त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रमोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणून झाली. कॅबिनेट दर्जाच्या या पदावर त्यांनी चार वर्षे काम केले. त्या काळात रेशीम व अन्नप्रक्रिया उद्योग वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९९१ साली ते केंद्रीय योजना आयोगाचे सदस्य झाले. त्यांच्याकडे कृषी, ग्रामविकास, जलसिंचन, पंचायती राज, सहकार व ग्रमीण ऊर्जा या विषयांची जबाबदारी होती. तिथे असताना, त्यांनी राष्ट्रीय पातळीवर फलोद्यान योजना व कृषी विकास कामांना बळकटी दिली.
१९७५ साली पालघर तालुक्यात अस्वली धरणाचे भूमिपूजन पार पडले होते; परंतु या-ना-त्या कारणाने काम रखडले होते. जयंतराव नियोजन आयोगाचे सदस्य झाल्यावर अकरा वर्षांच्या कालहरणानंतर त्या कामाला त्यांनी गती देण्याचे ठरविले. विविध मंत्रालयांमध्ये त्यांनी स्वत: जाऊन विनाकारण प्रलंबित झालेली पर्यावरण व वनमंत्रालयाची धरणाच्या बांधकामाची परवानगी १९९४ साली मिळवली. ही परवानगी मिळवणे, वनविभागाला गावकऱ्यांनी पर्यायी जमीन द्यावी म्हणून गावकऱ्यांना राजी करणे, वनीकरणाची वाढीव रक्कम शासनाकडून मंजूर करवून ती वनविभागाला देणे, इत्यादी सर्व कामे जयंतरावांनी गावकऱ्यांच्या पाठिंब्याने केली. प्रशासनाला लागतील त्या अटींची पूर्तता करण्यासाठी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळवले.
भूमिपूजन ते प्रत्यक्ष कामाची सुरुवात यात फार मोठा कालावधी गेल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला होता. ती वाढीव रक्कम शासनाकडून त्यांनी मंजूर करवून घेतली. शेवटी, १९९६ साली धरण पूर्ण झाले. या धरणामुळे मत्स्य उत्पादन, विंधण विहिरींना पाणीपुरवठा, पेयजल, जलसिंचनामुळे दुबार पीक पद्धत, भूजलाच्या पातळीत वाढ हे फायदे मिळू लागले. मुंबई-अहमदाबाद मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे घोलवड ते उंबरगाव रोड या भागातल्या प्रवाशांची अतिशय गैरसोय होत होती. बोर्डी येथे जयंतराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून नवे रेल्वे स्थानक तयार झाले आणि त्या स्थानकाचे उद्घाटन १९९४ साली झाले.
जयंतराव पाटील यांनी भारतीय ‘स्वातंत्र्यलढ्यात बोर्डीचे योगदान’ ही पुस्तिका भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित केली. त्यांनीच १९९८ साली ‘बोर्डीचे स्वातंत्र्यसैनिक’ या पुस्तकाचे संपादनही केले आहे. त्यांनी कृषी व ग्रमविकासावर भरपूर लेखन केले असून आतापर्यंत २० पुस्तके लिहिली आहेत. त्यांची ‘जग हा त्यांचा बगिचा’, ‘माझे ग्रामपुनर्रचनेचे प्रयोग’, ‘कृषिमहर्षी सॅम हिगीनबॉटम’, ‘आदर्श गाव बोर्डी’, ‘अॅग्रिकल्चरल अँड रूरल रिकन्स्ट्रक्शन’, इत्यादी पुस्तके आहेत. कृषी साहित्याबद्दल त्यांना वसंतराव नाईक पुरस्कारही मिळालेला आहे.
२००६ साली विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. त्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. त्या समितीत सदस्य म्हणून पाटील यांनी काम पाहिले. समितीने अनेक बहुमोल मार्गदर्शक सूचना केल्या.
डॉ.जयंतराव पाटील सध्या वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापरानेच महाराष्ट्रातील शेतीची उत्पादकता वाढवता येईल हा संदेश महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सतत व्याख्याने देत असतात, परिसंवादांतून भाग घेतात, वृत्तपत्र, रेडियो, टेलिव्हिजन या प्रसारमाध्यमांमध्येही त्यांचा सहभाग असतो.
ते एकविसाव्या शतकातल्या आव्हानांचा विचार करून लिहितात. ते म्हणतात, की लोकसंख्या नियंत्रण, अन्नधान्यात स्वयंपूर्णता, जैवविविधता टिकवणे याला अग्रक्रम देणे आवश्यक आहे; पाणलोटक्षेत्राचा विकास करून जमिनीची धूप थांबवावी, भूगर्भातल्या पाण्याची पुनर्भरणी करावी; गावकऱ्यांनी स्वत:च्या जमिनीवर शेत तलावडी करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवावे, वनसंवर्धन करावे, जलद वाढणारी झाडे सरपणासाठी लागतात ती वाढवावीत; कृषिवनीकरणात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, फलोद्यान करावे, फळप्रक्रिया उद्योग व फुलांची शेती वाढवावी, सेंद्रिय खते द्यावीत, कीटकनाशके टाळावीत, शीतगृहे व सौरशक्तीचा वापर करावा; वनवासींच्या शिक्षणाला व आरोग्याला अग्रक्रम द्यावा.