Skip to main content
x

पिंपळीकर, श्रीरंग रामचंद्र

       ठाणे जिल्ह्यातील रा.स्व. संघ जनकल्याण समितीद्वारा राबविण्यात येणाऱ्या ‘फिरत्या प्रयोगशाळे’चे श्रीरंग रामचंद्र पिंपळीकर यांची आई मंगला पिंपळीकर व वडील रामचंद्र यशवंत पिंपळीकर. वडील रेल्वेच्या सेवेत होते. परंतु वयाच्या ६ व्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरवले. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण नागपूरला व पुढे चाळीसगावला झाले. तेथूनच (चाळीसगाव) त्यांनी बी.एस्सी. ची पदवी घेतली.

       त्यांचा रा. स्व. संघाशी बालपणापासून संबंध होता व चाळीसगाव येथील वास्तव्यात तो अधिक दृढ झाला. बी.एस्सी. झाल्यावर त्यांनी आधी धुळे व नंतर नाशिकला (८६ पासून) सुप्रीम इंजिनियर्स या कंपनीत सुमारे ३-३॥ वर्षे नोकरी केली. परंतु त्या आधी ८४-८५ मध्ये ते रा. स्व. संघाचे विस्तारक म्हणून अंमळनेरला कार्यरत होते.

      याच सुमारास १९८९ मध्ये संघ संस्थापक डॉ. के. ब. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व वनवासी विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘फिरती प्रयोगशाळा’ या प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. या भागातील शाळांतील विद्यार्थी अभ्यासक्रमातील वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पूर्ण अभावामुळे-वैज्ञानिक शिक्षणापासून वंचित राहतो. या अभावाची अंशत: पूर्ती करावी म्हणून शहापूर व मुरबाड या तालुक्यातील दहा-दहा गावे निवडून तेथील शाळांमध्ये ‘फिरती प्रयोगशाळा’ जाऊन अभ्यासक्रमातील प्रयोग इयत्ता ४ थी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवेल अशी योजना होती. यासाठी अशा भागात जाऊन, तेथील विद्यार्थ्यांशी व शिक्षक वर्गाशी समन्वय साधून हे काम पार पडू शकेल अशा शिक्षक-कार्यकर्त्याची आवश्यकता होती. या कामासाठी श्रीरंग पिंपळीकरांची निवड केली गेली. ते दि. ८ डिसेंबर १९९० ला या कामी रुजू झाले.

      प्रयोगशाळेबरोबर रोजचा प्रवास हा आधीच निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होत असे. प्रयोगासाठी लागणारे साहित्य व उपकरणे घेऊन जनकल्याण समितीचे वाहन ठरलेल्या गावच्या शाळेत दाखल होई. यासाठी लागणाऱ्या सर्व व्यवस्था झाल्या असल्या तरी या प्रकल्पाचे प्रत्यक्ष यश हे त्या शिक्षकाच्या शिकवण्याच्या हातोटीवरच अवलंबून होते. शाळेबरोबरच त्या गावातील विद्यार्थ्यांचे पालक व इतर ग्रामस्थ यांच्याशी स्नेहाचे संबंध प्रस्थापित करणे आवश्यक होते.

      श्रीरंग पिंपळीकर यांनी अल्पावधीतच हे सर्व साध्य केले. प्रत्यक्ष विद्यार्थ्याबद्दलचे प्रेम व संघाचा ध्येयवाद या प्रेरणेतून त्यांनी लवकरच स्वत:ची एक शैली विकसित केली. त्यात संघ शाखेवरील खेळ, गोष्टी यातून संस्कार ही कार्यपद्धती त्यांनी आपल्या कामातही वापरली व त्यामुळे निव्वळ शिक्षक- विद्यार्थी अशा कृत्रिम नात्यापेक्षा एक जिव्हाळ्याचे नाते त्यांच्यात व फिरती प्रयोगशाळा जाईल त्या गावात निर्माण झाले. त्यामुळे ‘फिरती प्रयोगशाळा’ हा ‘फिरता संस्कारवर्ग’ ही झाला.

      श्रीरंग पिंपळीकरांच्या शिकवण्याच्या व वागण्याच्या पद्धतीमुळे ‘फिरती प्रयोगशाळा’ सुरुवातीच्या काही वर्षांतच या तालुक्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनाचा भाग बनली. नंतर-नंतर श्रीरंग पिंपळीकरांच्या असे लक्षात आले की विद्यार्थ्यांना वर्षभराच्या प्रयोगशाळेच्या ६ भेटीत ‘जे द्यायचे ते’ पूर्ण होत नाही व यातूनच पुढे वार्षिक शिबिराची कल्पना पुढे आली.

      उन्हाळी शिबीर भरवताना प्रथम शिबिराच्या वेळी या तालुक्यातला विद्यार्थी  शिबिराचे रु. २०/- हे शुल्क सुद्धा भरू शकेल की नाही असा प्रश्‍न होता. पण पहिल्याच शिबिराला विद्यार्थी व विशेषत: विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर आल्या व पुढची अनेक वर्षे आजपर्यंत नियमाने येत आहेत.

      अशा शिबिरात विविध बैठे व मैदानी खेळ, वक्त्यांकडून प्रबोधन, भारतमाता पूजन व आनंदासाठी इतर उपक्रम या सगळ्याची आखणी करण्यात श्रीरंग पिंपळीकरांचा प्रमुख वाटा होता.

      प्रयोगशाळेचा पुढचा प्रवास हा नियमित व समाधानकारक होता. ४-५ वर्षांनंतर श्रीरंगच्या साथीला तळेले हे सहाय्यक शिक्षक म्हणून आले. एव्हाना ‘फिरती प्रयोगशाळा’ या प्रकल्पाची प्रसिद्धी दूरवर पसरली होती. ठाणे जिल्ह्यातील वीस गावातून आजपर्यंत सुमारे १५-१६ हजार विद्यार्थ्यांना गेल्या १९ वर्षांत याचा लाभ मिळाला. नंतर असे प्रकल्प इतर जिल्ह्यातून सुरू झाले व त्यासाठी श्रीरंगांनी या कामात पूर्णपणे लक्ष घालावे व अशा प्रयोगांना प्रकल्प म्हणून पूर्ण मार्गदर्शन करावे म्हणून रा. स्व.संघ जनकल्याण समितीने त्यांची प्रांतावर नियुक्ती केली. तसेच १९९६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांचे वैज्ञानिक सल्लागार असलेले डॉ. वसंत गोवारीकर यांनीही पिंपळीकरांना बोलावून या प्रकल्पाची माहिती घेतली. अनेक वैज्ञानिक-शास्त्रज्ञ यांनी या प्रकल्पाला भेट देऊन व माहिती घेऊन या वेगळ्या कार्याची प्रशंसा केली आहे.

      डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, आकाशवाणी, डॉ. होमी भाभा विज्ञान संस्था व इतर अनेक संस्थांनी या कार्याची दखल घेतली आहे.

     श्रीरंग पिंपळीकर यांनी या कार्यातील इतर अनेक पैलू ओळखून त्याचा फायदा परत प्रयोगशाळेस मिळेल अशा व्यवस्था केल्या. उदा. फिरत्या प्रयोग शाळेच्या शिक्षणाचा लाभ मिळालेले अनेक विद्यार्थी पुढे महाविद्यायलयीन शिक्षण व नोकरीनंतरही या प्रयोगशाळेशी निगडीत राहतात व प्रत्यक्ष फिरत्या प्रयोगशाळेच्या कामात उत्स्फूर्त भाग घेतात.

     या फिरत्या प्रयोगशाळेच्या कार्यामुळे श्रीरंग पिंपळीकर यांना दि. वि. गोखले पुरस्कार, मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार, रोटरी क्लब कल्याण, सी-डॅक राष्ट्रीय पुरस्कार, कै. अप्पा सोहनी पुरस्कार व गावागावातून त्यांचे उत्स्फूर्त सत्कार झाले. त्यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र व इतर प्रांतातही फिरत्या प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत.

     -  जयंत कुळकर्णी

पिंपळीकर, श्रीरंग रामचंद्र