Skip to main content
x

परांजपे, राजाराम दत्तात्रेय

राजा परांजपे

     स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी चित्रसृष्टीचे शिल्पकार म्हणून विख्यात चित्रकर्ते राजाराम दत्तात्रेय परांजपे यांचा नेहमीच उल्लेख करण्यात आला आहे. जवळपास चाळीस वर्षांची चित्रसंपदा, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक तसेच क्वचित प्रसंगी गायक - अशा विविध क्षेत्रात ऐंशी मराठी आणि हिंदी चित्रपटांशी आलेला संबंध अशी त्यामागची परंपरा होती. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लहानसहान भूमिका करीत राजाभाऊंनी स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये एक महत्त्वाचा चित्रकर्ता म्हणून मान्यता मिळवली. या काळामध्ये राजा परांजपे यांनी मराठी चित्रपटांना आवश्यक असलेले नावीन्य तर दिलेच, पण त्याचबरोबर विषय आणि सादरीकरण यातही ताजेपणा आणला. रेखीव पात्ररचना आणि कल्पनापूर्ण दिग्दर्शन यांनी त्यांचे चित्रपट समृद्ध असत.

     राजाभाऊंना मास्टर विनायकांच्या विनोदपटांची परंपरा पुढे चालविल्याचे श्रेय दिले जाते. पण परांजपे यांचा विनोद हा चार्ली चॅप्लीनच्या शैलीशी अधिक मिळताजुळता आहे. रहस्य, उपहास, मनोविश्‍लेषण अशा अनेक कथाविषयांवर त्यांनी चित्रपट केले आणि त्यांपैकी काही तर मराठीमध्ये प्रथमच निर्माण झाले होते. आपल्या चित्रपटांबद्दल कमीत कमी व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या मोजक्या भारतीय चित्रकर्त्यांपैकी ते एक होत. कामुक, हिंसक आणि अश्‍लील दृश्ये दाखवून प्रेक्षकांची मने चाळवण्यापेक्षा विनोद, उपहास, कल्पनारम्यता, तसेच मौज यांतून त्यांचे मृदू मनोरंजन करणे त्यांनी पसंत केले.

     मिरज येथे जन्मलेल्या राजा परांजपे यांचे बालपण पुण्यात गेले. शालेय शिक्षणात अजिबात रस नसलेले परांजपे, त्याच वयात रंगभूमीकडे आकर्षित झाले होते. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बसवलेल्या माधवराव जोशी यांच्या ‘विश्‍ववैचित्र्य’ नाटकात त्यांनी एक विनोदी भूमिका केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

     राजाभाऊ तारुण्यात आले, तो मूकपटांचा काळ होता. अशा मूकपटांना पार्श्‍वसंगीत देण्याच्या इराद्याने त्यांनी चित्रपटगृहामध्ये प्रवेश मिळवला आणि तेथून या माध्यमाशी त्यांचा संबंध जुळून आला. पडद्यावर पाहिलेली उत्तमोत्तम चित्रपटांतील पात्रे पाहून ते भारावून जात आणि त्यातून त्यांची अभिनयाची आवड अधिकच वाढत गेली. या काळात त्यांनी एस.व्ही. वर्तक यांच्या ‘लपंडाव’ नाटकात ‘वाटाणे’ नावाचे विनोदी पात्र रंगवले. यानंतर जोमाने पुढे येणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीकडे ते आकर्षित झाले आणि त्यांनी बाबूराव पेंटर यांच्या ‘सावकारी पाश’ (१९३५)मध्ये पहिली भूमिका केली. या यशस्वी पदार्पणानंतर राजाभाऊंनी पेंटर यांच्याच ‘प्रतिभा’ (१९३७) मध्ये चकण्या मंडूकचे काम केले. यामध्ये केशवराव दाते आणि दुर्गा खोटे यांच्याही भूमिका होत्या. भालजी पेंढारकरांच्या ‘गोरखनाथ’ (१९४०) मधील परांजपे यांचा विनोदी भोलेनाथ चांगलाच गाजला. यामध्ये त्यांनी दोन गाणीही गायली.

     अशा प्रकारे, चित्रपटसृष्टीशी जवळीक साधलेली असताना त्यांना चित्रनिर्मितीच्या विविध बाबी समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली नसती तरच नवल होते. म्हणून त्यांनी भालजी पेंढारकर आणि मास्टर विनायक, तसेच ‘नजम नक्वी’, ‘शोरी’, ‘वेदी’ या हिंदी चित्रपट दिग्दर्शकांना साहाय्य केले. याचीच परिणती म्हणून राजा परांजपे यांना ‘बलिदान’ (१९४७) या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली. यानंतर पुढच्याच वर्षी आलेल्या ‘जिवाचा सखा’ने एका बाजूला रौप्यमहोत्सव साजरा केला, तर दुसऱ्या बाजूला राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांना एकत्र आणले. या त्रिकुटाने नंतरच्या काळात अनेक महत्त्वाचे चित्रपट दिले.

     ‘पुढचं पाऊल’ (१९५०) चित्रपटाने परांजपे यांच्या कारकिर्दीची पुढची दिशा ठरवली. यामध्ये गदिमा आणि पु.ल. देशपांडे यांनी भूमिका केल्या होत्या, पण त्याहीपेक्षा लोकांच्या लक्षात राहिला तो परांजपे यांनी रंगवलेला कोकणी सुहृद चिपळूणकर.

     यानंतरचा काळ म्हणजे, राजाभाऊंच्या उत्तुंग प्रतिभेचे आणि प्रतिमेचे दर्शन घडवणारा ठरला. ‘पेडगावचे शहाणे’ (१९५२) मध्ये त्यांनी एकाच घरात राहून वेगवेगळ्या जीवनशैलींमुळे कुटुंबप्रमुखाला जेरीस आणणारी पात्रे सादर केली. यामध्ये त्यांना वठणीवर आणणारे वेडे आणि शहाणे काका अशा राजाभाऊंच्या दुहेरी भूमिकांचे आणि कल्पक दिग्दर्शनाचे खूपच कौतुक झाले. या यशाने प्रेरित होऊन त्याच वर्षी राजाभाऊंनी ‘लाखाची गोष्ट’ अधिक आत्मविश्‍वासाने सादर केला. यामध्येही उपहास होता आणि त्याला कारुण्याचीही झालर होती. यातील रेसकोर्स आणि स्वप्नदृश्यांची खूप चर्चा झाली. दरम्यानच्या काळात, करदार स्टुडियोने ‘चाचा चौधरी’ (१९५३) या ‘पेडगावचे शहाणे’च्या हिंदी आवृत्तीची निर्मिती केली आणि अर्थातच यातील दुहेरी भूमिका आणि दिग्दर्शन राजाभाऊंनी केले.

    राजा परांजपे यांच्या ‘ऊनपाऊस’ (१९५४)मध्ये त्यांच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने आणखी मोठी उंची गाठली. आपल्या काळाच्या पुढे जाऊन आईवडील आणि मुले यातील संघर्ष त्यांनी अतिशय उत्कटतेने सादर केला. म्हातारपणी झालेली पती-पत्नीची ताटातूट आणि त्यांची अगतिकता दाखवताना परांजपे यांच्या मानवी स्वभावाच्या जाणिवांचे दर्शन घडले.

     ‘गंगेत घोडं न्हालं’ (१९५५) हा एक मजेदार फार्स होता. त्याचे रसिकांनी आणि समीक्षकांनी चांगले स्वागत केले. याच वर्षी भारतीय चित्रकर्त्यांच्या अधिकृत शिष्टमंडळासहित राजाभाऊ चीनला गेले आणि तेथील चित्रसृष्टीची माहिती घेतली. त्यांच्यासमवेत बलराज साहनी, बिमल रॉय, चेतन आनंद, पृथ्वीराज कपूर असे मातब्बर कलाकारही होते. यानंतर यशस्वी दाक्षिणात्य निर्माते ए. व्ही. मैयप्पन यांच्यासाठी राजभाऊंनी ‘बाप बेटे’ (१९५९) चे दिग्दर्शन केले.

     चेन्नई येथे निर्मिती झालेल्या या चित्रपटात अशोककुमार, श्यामा, कन्हैयालाल यांनी भूमिका केल्या, तर रमेश देव यांचे हिंदी चित्रसृष्टीत पदार्पण झाले.

    चेन्नईहून परत आल्यानंतर राजा परांजपे यांनी श्रीपाद चित्र ही संस्था सुरू करून स्वत:च्याच कथेवर आधारित ‘जगाच्या पाठीवर’ (१९६०) चे निर्मिती-दिग्दर्शन (आणि त्यात अभिनयही) केले. नाव नसलेल्या पात्राविषयीच्या या चित्रपटात राजाभाऊ, गदिमा आणि सुधीर फडके पुन्हा एकत्र आले. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटानंतर राजा परांजपे यांनी ‘सुवासिनी’ (१९६१) या सर्वांगसुंदर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. दरम्यान बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ (१९६३) मध्ये परांजपे यांनी सदाशिवबाबू या उतारवयातील पोस्टमास्तरची भूमिका केली. संगीताची जाण असलेल्या परांजपे यांनी वैष्णव पदे गाऊन स्वावलंबी विचाराची ही प्रतिष्ठित भूमिका अधिकच रंगतदार वठवली. याच वर्षी, चार्ली चॅप्लीनच्या ‘द किड’ (१९२१) वर आधारित ‘हा माझा मार्ग एकला’चे दिग्दर्शन केले. या वेळी राजाभाऊंचे वय ५३ होते आणि त्यांनी केसांचा टोप वापरून नायकाची भूमिका सजीव केली.

     रहस्यपट म्हणजे भीतिदायक वातावरण, एकाकी इमारती, भयावह चेहरे, खून अशा कल्पना मोडीत काढत राजाभाऊंचा हा चित्रपट इतका लोकप्रिय ठरला की, राज खोसला यांनी ‘मेरा साया’ ही त्याची हिंदी आवृत्ती काढली. शिवाय याच्या तमिळ आणि तेलगू भाषेतही आवृत्त्या निघाल्या, त्या वेगळ्याच.

     ‘पडछाया’ (१९६५) द्वारे राजा परांजपे यांनी एक गूढकथा सादर केली. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या पितृत्वाबद्दल शंका असलेल्या एका डॉक्टरचे मनोविश्‍लेषण मांडले. एक वृद्ध माणूस आणि तरुण मुलगी यांच्यातील प्रेमाचा नाजूक दुवा सादर करणारा ‘आधार’ (१९६९) हा राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट. यानंतर त्यांनी काही मराठी तसेच हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या. त्यांचेच शिष्य राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘या सुखांनो या’ (१९७५) मध्ये परांजपे यांनी आपली अखेरची भूमिका केली. परांजपे यांचे पुण्यात निधन झाले.

     व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्ये हे परांजपे यांच्या चित्रपटातील बलस्थान असे. त्यांनी इतर दिग्दर्शकांबरोबर केलेल्या चित्रपटांतूनही ही गोष्ट आवर्जून असे. परांजपे यांना आपली संस्कृती, कुटुंबपद्धती, समाज याबद्दल प्रचंड आदर होता आणि तो त्यांच्या चित्रपटांतून प्रतिबिंबित होत असे. त्यांच्या पात्रांमधील संवाद हा बहुधा ओघवते संभाषण वाटे. त्यामुळे त्यातून एका क्षणाला हासू तर दुसऱ्या क्षणाला आसू, असेही होऊ शके.

     एक यशस्वी चित्रकर्ता म्हणून कारकिर्द असलेल्या राजा परांजपे यांना प्रेक्षक आणि समीक्षक यांनी भरभरून दाद दिली. केवळ मराठीच नव्हे, तर इंग्रजी वृत्तपत्रांतूनही त्यांच्याबद्दल रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध होत असे. आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी दोन राष्ट्रीय आणि चार राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त केले.

      - चंद्रशेखर जोशी

संदर्भ
1) श्रीखंडे शशिकांत, 'मराठी चित्रपटसृष्टीचे अध्वर्यू - राजा परांजपे', मधुश्री प्रकाशन; पुणे, 2004.
परांजपे, राजाराम दत्तात्रेय