Skip to main content
x

पटेल , सरदार मुहंमद

          पी. सरदार हे लौकिक अर्थाने मुसलमानधर्मीय; पण कृतीने ते पूर्णपणे भारतीय परंपरेशी समरस होते. भारतीयांच्या सनातन सहिष्णुतेचा जागरच त्यांंनी आपल्या जीवनात जागवला. ते उपयोजित कलेचे कलावंत होते, पण त्यातील कलागुण मात्र अभिजात कलेला जवळचे असायचे. त्यामुळे त्यांनी दिनदर्शिकांचे क्षेत्र निवडले व त्या क्षेत्रात ते अत्यंत यशस्वी व लोकप्रिय ठरले. सरदार मुहंमद पटेल ऊर्फ पी.सरदार यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या गावी झाला. कोल्हापूरच्या कलापरंपरेने भारावलेल्या अवस्थेतच ते उपयोजित कला शिकले. व्यवसायात नशीब अजमावण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. इतर चित्रकारांच्या स्टूडिओत नोकरी करत असतानाच ते दिनदर्शिकांच्या क्षेत्रात शिरले. जलरंग व अपारदर्शक जलरंग माध्यमातील भारतीय पौराणिक विषय व देवदेवतांची त्यांची चित्रे सर्वसामान्य माणसाला आकर्षित करणारी होती. याशिवाय त्यांनी प्लायवुडसारख्या माध्यमाच्या मूळ रंगाचा वापर करून घेत अनेक चित्रे रंगविली व तीदेखील दिनदर्शिकांवर छापली गेली.

        त्यांची रंगसंगती विलोभनीय असे. त्यांचे चित्र रेखाटन सामान्य माणसालाही आकर्षित करणारे असे. त्यांच्या चित्रांत रंगांचे झळझळीतपण असूनही त्यांचा तोल कुठेही जात नसे. दिनदर्शिकेमध्ये विषय सोपा करून आकर्षकपणे मांडण्याची जबाबदारी चित्रकारावर असते. पी. सरदार त्यात यशस्वी ठरले.

        कलाकाराला यशाबरोबर सुख आणि समृद्धी लाभावी यासाठी शरीर आणि मन निरोगी पाहिजे. म्हणून माणसाने शरीरासोबतच मनालाही चांगला आहार आणि व्यायाम दिला पाहिजे. ते स्वत: नियमित व्यायाम करीत. त्यांनी त्यांची चित्रशाळा (स्टुडीओ) अद्ययावत केली होती. कोल्हापुरात स्वत:चा सुंदर बंगला बांधला होता. त्यासाठी आर्थिक सुबत्ताही पैदा केली होती. ते हनुमानाचे भक्त होते. आपल्या आरशातील शेकडो मुद्रांवरून त्यांनी हनुमानाची अनेक रूपे आपल्या दिनदर्शिकांमधून सादर केली. त्यांनी आपल्या चित्रांची काही प्रदर्शनेही केली. पोस्टर, दिनदर्शिका, मासिकांची मुखपृष्ठे, लँडस्केप अशा विषयांवरची त्यांची चित्रे सर्वसामान्यांना नेत्रसुखद वाटली.

        सरदार मुहंमद पटेल नावाचा हा मुस्लीमधर्मीय चित्रकार आयुष्यभर पी.सरदार या नावाने वावरला. व्ही.शांताराम या नावापासून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वत:चे नाव पी.सरदार असे ठेवले व दिनदर्शिकेच्या क्षेत्रात सुंदर स्त्रियांच्या चित्रांसोबतच सर्वसामान्य हिंदू धार्मिक मनाला भुलवणारे विषय व देवदेवतांची चित्रे रंगवून त्यांनी आर्थिक यश व लोकप्रियताही मिळविली. त्यांचे व्यक्तिमत्त्व यातच रमणारे होते.

         छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोमांचकारी जीवनावर त्यांना चित्रमालिका सादर करायची होती. केवळ हनुमानाची एक हजार चित्रे रेखाटून विक्रम करायचा होता. कलावंतांसाठी आपल्या गावी कलानगरी अस्तित्वात आणायची होती. आपल्या देशाबद्दल ते अत्यंत अभिमानी होते. भारतात राहणारा कोणत्याही धर्माचा नागरिक हा भारतीयच असतो; भारतीय हाच त्याचा धर्म होय, हे त्यांचे विचार होते.

- श्यामकांत जाधव

पटेल , सरदार मुहंमद