Skip to main content
x

पठाण, युसुफ महंमद

    युसुफ महंमद पठाण यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्याच्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महंमदखान पठाण आणि आईचे नाव फातेमा होय. त्यांचे वडील पुणे विद्यापीठातून इंग्लिश ऑनर्स घेऊन पदवीधर झाले होते. इंग्लिश लिटरेचर हा त्यांच्या आवडीचा विषय होता आणि त्यांना वाचनाचा विलक्षण छंद होता. त्यामुळे डॉ. पठाणांना इंग्रजी साहित्याने बाळकडू घरातच मिळाले. त्यांचे आई-वडील उभयता धार्मिक प्रवृत्तीचे असून अध्यात्माकडे त्यांचा कल होता. महंमदसाहेब यांना लोक रावसाहेब म्हणून ओळखत असत. ते महसूल, खात्यातील बडे अधिकारी होते. त्यांच्या वडिलांच्या सतत बदल्या होत असल्याने त्यांना आपले प्राथमिक व विद्यालयीन शिक्षण बदलीच्या गावांतून व तेथे उपलब्ध असणार्‍या शैक्षणिक संस्थांमधून पूर्ण करावे लागले. शिक्षणासाठी भटकंती आणि अनेक गावांतील वास्तव्य यांनी त्यांचा पूर्वार्ध सांस्कृतिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या संपन्न झालेला आढळतो. त्या निमित्ताने करमाळा, धुळे, नाशिक, रावेर, सांगोला, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी त्यांना वास्तव्य करावे लागले.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात झाले. पठाणांनी मराठी भाषेचा व साहित्याचा अभ्यास हेच आपले उद्दिष्ट निश्चित करून त्यामध्ये पदवी तथा पदव्युत्तर पदवी मिळविली. शिक्षकी पेशाला आवश्यक असणारी अध्यापनातील पदवीही त्यांनी मिळविली आणि दयानंद महाविद्यालयातच मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. प्राध्यापकी चालू असतानाच १९५८मध्ये पुणे विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक डॉ.शं.गो.तुळपुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी बखरीतील फार्सीचे स्वरूप’ या विषयातील पीएच.डी. पदवी संपादन केली. नंतर त्यांनी ‘महाराष्ट्र के महानुभाव साहित्यकारों का हिंदी साहित्य को योगदान’ या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून दुसरी पीएच.डी. पदवी संपादन केली. संशोधनक्षेत्रातील डी.लिट. या अंतिम पदवीसाठी त्यांनी १९७७मध्ये रांची विश्वविद्यालयाला ‘महाराष्ट्रातील धर्मसंप्रदायांचा चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंध सादर केला आणि विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी देऊन त्यांच्या प्रबंधाचा यथोचित गौरव केला.

१९६० मध्ये ते सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. १९७३ मध्ये ते याच विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख झाले. मार्च १९९०मध्ये म्हणजे निवृत्त होईपर्यंत ते त्याच पदावर कार्यरत होते. दरम्यानच्या काळात त्यांना ‘आदर्श शिक्षकाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार’ प्राप्त झाला. सेवेतील प्रदीर्घ काळ म्हणजे ३० वर्षांच्या काळाकरिता ते एकाच विभागात राहिल्याने आणि २७ वर्षांकरिता विभाग प्रमुख या जबाबदारीच्या पदावर असल्याने ते विभागाचा नियोजनबद्ध विकास करू शकले आणि त्यांच्या अथक प्रयत्नांतून विभागाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक झाला.

मराठवाड्यातील तथा महाराष्ट्रातील संतांची भाषा व साहित्य जगभरातील संशोधकांना परिचित व्हावे म्हणून त्यांनी तत्कालीन हस्तलिखितांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले व त्यांच्या विभागात ६००० हस्तलिखिते ते जमा करू शकले. भारतातील कोणत्याच विद्यापीठात हस्तलिखितांचा एवढा प्रचंड संग्रह असल्याचे ऐकिवात नाही. ही हस्तलिखिते जमा करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. त्यामुळे संशोधक म्हणून विशेषतः संतसाहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. आपले हस्तलिखित पठाणांकडे सुरक्षित राहू शकते, असा लोकविश्वास ते निर्माण करू शकले.

हस्तलिखिते जमा करणे सोपे असते, पण ते जतन करणे आणि अभ्यासकाला ते उपलब्ध करून देणे अतिशय कष्टाचे असते. कारण त्याची कालनिहाय, आशयनिहाय विषयसूची करणे, त्याच्या जीर्ण झालेल्या शरीराला नूतन झळाळी प्राप्त करून देणे, त्याची वर्गवारी करून ते अभ्यासकांना विहित नमुन्यात उपलब्ध करून देणे अत्यंत जटिल व वेळखाऊपणाचे काम असते. त्याला चिकाटी तर लागतेच शिवाय दांडगी स्मरणशक्ती लागते. महाराष्ट्राच्या अनेक वस्तुसंग्रहालयांत अशा प्रकारची हस्तलिखिते शेकडोने पडून आहेत; कारण त्यांचे वर्गीकरण राहिले आहे. तथापि या विभागाने त्याचे उत्तम जतन करून ठेवले आहे आणि विशेष अभिमानाची बाब म्हणजे त्याच्या अभ्यासासाठी देश-विदेशांतून अभ्यासक येणारे विभागाला भेटी देत असतात.

पठाणांच्या संशोधनाची दिशाच मुळात अज्ञात असे संतसाहित्य प्रकाशात आणण्याची असल्याने त्यांनी महानुभाव, वीरशैव, जैन आणि सुफी या काहीशा दुर्लक्षित संप्रदायांच्या साहित्याच्या संशोधनाचा प्रकल्प आपल्या विद्यापीठीय कारकिर्दीमध्ये राबविला आणि अद्यापही त्यावरील संशोधन चालू आहे, ही विशेष कौतुकास्पद बाब आहे. वास्तविक एक कथालेखक म्हणून त्यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाला आरंभ केला. पण नियतीला हे मान्य नसल्याने ते कथा-कादंबरी या लोकप्रिय लेखनापासून दूर गेले आणि संतसाहित्यावर भाष्य करणारे आधुनिक भाष्यकार झाले.

त्यांनी संतसाहित्यावर प्रचंड लिखाण केले, संपादन केले आणि विद्यार्थ्यांवरही याचा भार टाकला. त्यांनी आज पावेतो ३४ ग्रंथांचे लेखन/संपादन केले आहे, पैकी १७ ग्रंथ संतसाहित्यावर आहेत. ‘भाऊसाहेबांची बखर’ (१९५९), ‘मराठवाड्यातील लोककथा’ (१९६२), ‘नवरस नारायणकृत शल्यपर्व’ (१९६४), ‘गोपाळदासकृत शुक्रदेव चरित्र’ (१९६५), ‘कवि डिंभकृत ऋद्धिपूर माहात्म्य’ (१९६७), ‘परमानंदांचे अभंग’ (१९६८), ‘महानुभाव साहित्य संशोधन खंड-१’ (१९७३) इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ‘संतसाहित्यचिंतन’ (१९८३), ‘शोधणी’ (१९७५), ‘आठव ज्ञानदेवांचा...ज्ञानदेवीचा’ (१९९२), ‘अजून आठवतं’ (१९९८) असे लेखसंग्रह प्रकाशित आहेत. शिवाय त्यांचे हिंदी-इंग्रजीमध्ये काही ग्रंथ आहेतच. त्यांचे लेखन विपुल असून साहित्याच्या सर्व घटक अंगांना स्पर्श करणारे आहे. वर्तमानपत्रातील स्तंभलेखनात त्यांनी उच्चांक प्रस्थापित केला आहे. वानगीदाखल काही नोंदी- सत्संग (सकाळ) अर्था-अर्थी (महाराष्ट्र टाइम्स), अभंगवाणी तुकयाची, तथा नामयाची अभंगवाणी (पुढारी), वाणी संत कवयित्रींची (पुढारी), स्पंदन (तरुणभारत), स्मृतिस्थळ (लोकसत्ता). बालभारती मराठीचे ते २० वर्षे संपादक व काही काळ त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांचे ललित लेखनही विस्तृत आहे. त्यामध्ये प्रवासवर्णने, व्यक्तिरेखाटने, कथा, ललित लेख इत्यादींचा अंतर्भाव होतो. राज्यस्तरीय प्रतिष्ठित मंडळांचे ते सदस्य तथा अध्यक्ष राहिले आहेत. राज्य प्रौढ शिक्षण मंडळ, मराठी भाषा उच्चाधिकार समिती, दार्शनिका विभाग, लोकसाहित्य समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले चरित्र साधने संपादन-समिती ही यांपैकी  काही मंडळे होत. सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे (१९८८) ते अध्यक्ष होते. त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (जाने १९९०). अनेक देशांना भेटी देऊन आपले संशोधन लोकाभिमुख केले आहे. १९७२ मध्ये चेकोस्लोव्हाकियास अतिथी प्राध्यापक म्हणून भेट व व्याख्याने, १९८२ मध्ये पश्चिम जर्मनीत संपन्न झालेल्या जागतिक भक्तिसाहित्य परिषदेत सहभाग, तथा कोलन आकाशवाणीवरून परिषदेचे समालोचन, ब्रिटनमध्ये व्हिजिटिंग फेलो या नात्याने लंडन विद्यापीठात संशोधन, लंडनच्या महाराष्ट्र मंडळात संतसाहित्यावर व्याख्याने, बी.बी.सी. वरून दोन मुलाखती ध्वनिक्षेपित, १९८८मध्ये नेदरलँड तर १९८८मध्ये केम्ब्रिज येथे भरलेल्या जागतिक भक्ती संमेलनात सहभाग, १९९५मध्ये झिम्बाब्वेस भेट, २००८मध्ये लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या अमृतमहोत्सवाचे निमंत्रण व जीवन-गौरव पुरस्कार प्रदान असा त्यांचा कार्यपट आहे. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज स्थळावरील संतपरंपरा सदराचे २००८ पासून लेखन करत आहेत. आत्तापर्यंत या स्थळाला १० लाख वाचकांनी भेटी दिल्या. २००४मध्ये राष्ट्रीय भाषा पंडित आणि २००७ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

- डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

पठाण, युसुफ महंमद