Skip to main content
x

राऊळ, विष्णू गणपत

           विष्णू गणपत राऊळ हे नाव कोरडवाहू शेती विभागातील कृषी ज्ञानप्रसारक म्हणून सर्वांना परिचित आहे. विष्णू गणपत राऊळ यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावी झाला. त्यांचे वडील शेतकरीच होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जन्मगावीच झाले. १९५१मध्ये राऊळ पंढरपूर येथून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी त्यांना महसूल विभागात तलाठी म्हणून नोकरी लागली. त्या काळी काही तलाठ्यांना ग्रामसेवक म्हणून काम करावे लागे. त्याप्रमाणे राऊळ यांनी ग्रामसेवक म्हणून काम करताना ‘ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर’मधून प्रशिक्षण घ्यावे लागले (१९५७). पुढील काळात ग्रामसेवक म्हणून काम करताना १९६१-६२मध्ये उत्कृष्ट कामाबद्दल सलग दोन वर्षे राष्ट्रपती पदक मिळाले.

          त्यानंतर १९६४मध्ये राऊळ यांना कृषी महविद्यालय, अकोला येथे प्रतिनियुक्तीवर बी.एस्सी. (कृषी) पदवी शिक्षणासाठी पाठवण्यात आले. १९६७मध्ये नागपूर विद्यापीठाच्या बी.एस्सी. (कृषी) पदवी परीक्षेत राऊळ हे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांना कांस्य पदक मिळाले. त्यांची नेमणूक करमाळा (जि. सोलापूर) येथे कृषि-पर्यवेक्षक म्हणून झाली. ते या पदावर १९७२पर्यंत कार्यरत होते. त्यांना पदोन्नती मिळून कृषि-अधिकारी या पदावर जिल्हा परिषद सोलापूर येथे नेमणूक झाली. १९७२च्या दुष्काळात हतरसंग (जि.सोलापूर) येथे गुरांची छावणी निर्माण केली होती. त्यात राऊळ हे कार्यरत होते. त्या छावणीस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती. त्या छावणीतील व्यवस्थापन पाहून त्या प्रभावित झाल्या. त्यामुळे तेथे काम करणार्‍या अधिकार्‍यांना प्रोत्साहनात्मक बढती मिळून राऊळ हे राजपत्रित अधिकारी वर्ग २ म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्हा कृषि-अधिकारी म्हणून रुजू झाले (१९७८). त्या वेळेपासून कोरडवाहू फळबागा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. १९८२मध्ये कृषी विकास अधिकारी (वर्ग-१) म्हणून राऊळ यांची नेमणूक जि.प. सोलापूर येथे झाली. १९८४मध्ये कृषी विभागाने प्रशिक्षण व भेट योजना राबवल्यामुळे विस्तार कार्यकर्ते व शेतकरी यांचा निकटचा संबंध आला.

          राऊळ यांची कार्यपद्धती पाहून त्यांची १९८५मध्ये उपविभागीय कृषि-संचालक या पदावर नेमणूक झाली. उस्मानाबाद जिल्हा हे राऊळ यांच्या कार्यक्षेत्रात होते. १९८७मध्ये एका वर्षात १ लाख बेचाळीस हजार कोरडवाहू फळबागांची कलमे करून त्यांनी उच्चांक गाठला. राऊळ यांच्या या कामाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली. दरम्यानच्या काळात राऊळ यांना कृषिभूषण पुरस्कार मिळाला. कृषी विभागात कार्यरत असताना असा सन्मान मिळवणारे राऊळ हे एकमेव उदाहरण आहे. १९८८-८९ काळात राऊळ यांनी कृषी विभागात माहिती अधिकारी म्हणून काम केले. १९९२मध्ये राऊळ कृषी विभागातून निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बोर, डाळिंब संघ स्थापन करण्यात पुढाकार घेतला, तर सीताफळ संघ स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे कोरडवाहू फळाचे विपणन करणे सुलभ झाले.

          निवृत्तीनंतर राऊळ यांनी खासगी संस्थामध्ये सल्लागार म्हणून काम केले. १९९२-९६ या काळात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कोरडवाहू फळ पिकासंबंधीचा अभ्यासक्रम तयार करून राबवण्याची महत्त्वाची कामगिरी केली. या कामाची दखल घेऊन न्यूयॉर्क (अमेरिका) येथील इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी या संस्थेने य.च.मु.वि., नाशिक या संस्थेचा सत्कार करून दहा हजार डॉलर्सचे बक्षीस दिले. या उपक्रमात राऊळ यांचा सिंहाचा वाटा होता. २००० साली राऊळ अष्टी (जि. बीड) येथील हरकत कृषी विज्ञान संस्था येथे कार्यरत होते. कृषी विद्यापीठाचा शेतकर्‍यांत प्रसार करणे हे या संस्थेचे काम होते. या कामामुळे प्रभावित होऊन एफ.ए.ओ. या संस्थेने पारितोषिक दिले. राऊळ यांनी ७०हून अधिक शेतीसंबंधी पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या ४ पुस्तकांचे हिंदीत भाषांतर झाले आहे. त्यांच्या आवळा पुस्तकाचा (हिंदी) क्रमिक पुस्तक म्हणून उत्तर प्रदेशमध्ये समावेश झाला आहे. त्यांना २ आंतरराष्ट्रीय सन्मान, २ राष्ट्रीय सन्मान, १३हून जास्त विभागीय सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यात कृषिभूषण हा महत्त्वाचा सन्मान आहे.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

राऊळ, विष्णू गणपत