Skip to main content
x

राव, क्षमा

     क्षमा राव यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील शंकर पांडुरंग पंडित हे महान व्यासंगी, भाषाशास्त्रज्ञ आणि संस्कृतचे गाढे विद्वान होते. बुद्धिमत्तेचा आणि भाषाज्ञानाचा वारसा त्यांना पित्याकडून मिळाला. वडिलांचा सहवास त्यांना फार थोडा काळ मिळाला, पण बालवयातच त्यांना आपल्या पित्याची थोरवी कळून आली होती. त्यांच्या व्यक्तित्वाचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. बालपण काहीसे हालात गेले, पण वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि मृत्यूपूर्वी एक आठवडा त्यांचे ‘ज्ञानेश्वरचरितम्’ पूर्ण झाले. जवळजवळ पन्नास वर्षे त्या लिहीत होत्या.

     मुंबईतील विख्यात डॉक्टर राव यांच्याशी विवाह झाल्यावर क्षमाबाईंचे आयुष्य पार बदलून गेले. वडिलांप्रमाणेच त्यांना अनेक भारतीय व विदेशी भाषा अवगत होत्या. इंग्लिश, फ्रेंच आणि इटालियन या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इंग्लिशमधील आणि इतर भाषांमधील त्यांचे लेखन भारताबाहेरच जास्त प्रसिद्ध झाले व लोकांना आवडलेही, पण आज भारतात ते फारसे उपलब्ध नाही. भारतातील अनेक प्रांतांत आणि जगातील अनेक देशांमध्ये जाऊन राहण्याची आणि तेथील जनजीवन समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या अनुभवाचे, निरीक्षणाचे प्रतिबिंब बाईंच्या साहित्यात दिसून येते. इंग्लिश लेखनातील त्यांच्या प्रभुत्वामुळे त्यांना प्रतिसरोजिनीदेवी म्हणत असत. संस्कृत भाषेवरील त्यांचे नितांत प्रेम आणि निष्ठापूर्वक केलेले अध्ययन यांच्या जोरावर त्यांनी संस्कृतमध्येही विपुल रचना केली. गद्य आणि काव्य या दोन्ही प्रकारांत त्यांनी आपली नाममोहोर उमटवली.

     औंधच्या संस्कृत-कार्यालयाने १९३८मध्ये त्यांना ‘पंडिता’ ही पदवी दिली, तर चारच वर्षांनंतर ‘साहित्यचंद्रिका’ ही उपाधी बहाल केली. त्यांच्या लेखनावर अनेक मान्यवर वृत्तपत्रे, मासिके यांमधून भारतात व भारताबाहेरही उत्तम अभिप्राय प्रसिद्ध झाले आहेत. त्यात फ्रेंच रिव्हू, टाइम्स ऑफ इंडिया, सर्च लाइट (पटना), द हिंदू (मद्रास), चित्रमय जगत्, भारतज्योती, दि इव्हिनिंग न्यूज, प्रेरणा इत्यादींचा समावेश आहे. क्षमाबाईंवर जसा पित्याचा प्रभाव होता, तसाच कन्या लीला दयाळ यांच्यावर आईचा प्रभाव होता. क्षमाबाईंच्या साहित्यकृतींवर आधारित संस्कृतनाट्यलेखन लीला दयाळ यांनीही केले. आपल्या आईचे एक  लघुचरित्र क्षमा राव यांनी लिहिले असे समजते.

     क्षमाबाईंच्या उमेदीच्या काळात स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न देशभर मोठ्या प्रमाणावर चालू होते. महात्मा गांधी देशाचे नेतृत्व करत होते. भारतीय तत्त्वज्ञानावर आधारलेले स्वातंत्र्यप्राप्तीचे नवीन मार्ग शोधून काढून महात्माजी प्रचारात आणत होते. महात्माजींच्या जीवनकार्याने क्षमाबाई भारावून गेल्या होत्या. त्यांच्यावर भगवद्गीतेचा मोठाच प्रभाव होता. स्वातंत्र्ययुद्धात प्रत्यक्ष भाग घेणे त्यांना शक्य नव्हते, पण त्या प्रयत्नांची संपूर्ण माहिती त्या सतत घेत होत्या. त्यातूनच स्वातंत्र्यप्राप्तीतील महात्मा गांधींचे योगदान आणि त्या काळातल्या घटना यांंवर आधारित दोन काव्ये त्यांनी गीतेप्रमाणे अठरा अध्याय आणि मुख्यत: अनुष्टुप् छंदात लिहिली.

    सत्याग्रह, गीता आणि उत्तरसत्याग्रहगीता या दोन काव्यांत महात्मा गांधींचे चरित्र, तत्त्वज्ञान आणि मिठाच्या सत्याग्रहापर्यंतच्या भारतातील महत्त्वाच्या घटना यांचे प्रत्ययकारी चित्रण आले आहे. आपल्या वडिलांबद्दलचा त्यांचा अपार आदर त्यांनी ‘शंकरजीवनाख्यम्’ या चरित्रकाव्यात व्यक्त केला आहे. या त्यांच्या काव्याला साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांची संस्कृतमध्ये प्रस्तावना आहे. (क्षमाबाईंच्या पुस्तकांना प्रस्तावनाही थोर लोकांच्या आहेत. पां. वा. काणे (भारतरत्न), सरदार पणिक्कर)

    क्षमा राव यांनी लिहिलेली महाराष्ट्रीय संतांची चरित्र हा संस्कृत भाषेचा मोठा अमूल्य अलंकार आहे. तुकारामचरितम्, रामदासचरितम् या दोन्ही काव्यांचे इंग्लिश भाषांतरही बाईंनी केले आहे. संत मीराबाईंच्या जीवनावरील मीरालहरी काव्यात, तर संस्कृतटीकेमधून आपल्या काव्यातला ध्वनीही त्यांनी स्वोपज्ञ टीकेतून दाखवला आहे. त्याचे इंग्लिश भाषांतरही दिले आहे. ‘ज्ञानेश्वरचरितम्’ हे क्षमाबाईंचे परिपक्व वयातले शेवटचे लेखन. या पुस्तकाचा इंग्लिश अनुवाद त्यांची मुलगी लीला दयाळ यांनी केला. क्षमाबाईंनी कथासरित्सागरच्या धर्तीवर पद्यात अनेक कथा लिहिल्या. ‘ग्रमज्योती’ या कथासंग्रहातील ३ कथांना स्वातंत्र्यसंग्रमाची पार्श्वभूमी आहे. ‘कथापञ्चकम्’मध्ये भारतीय स्त्री-जीवनातील कारुण्यधर्म, अगतिकता तरी जिजीविषा यांचे प्रत्ययकारी चित्रण आहे. कथामुक्तावलीमध्ये १५ उत्तम गद्यकथा आहेत. वास्तवाबरोबरच अद्भुतरम्यता, कल्पनाविलास, निसर्गवर्णन आणि वेगवेगळ्या ठिकाणचे समाजजीवन यांचे चित्रण त्या कथांमध्ये पाहावयास मिळते. भाषा प्रौढ आणि प्रसादिक आहे. ‘विचित्रपरिषद यात्रा’ हे १९३८ साली त्रिवेंद्रम येथे आयोजिलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्यापरिषदेच्या अधिवेशनावर आधारित लघुपुस्तिका प्राच्यविद्याभ्यासकांचा विचार करायला लावणारी आहे.

     भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा यांबद्दलचा मनस्वी आदरभाव, अभ्यास, प्रयोगशीलता, उद्यमशीलता, उत्कटता यांचा प्रत्यय पंडिता क्षमाबाईंचे साहित्य वाचताना येतो.

     इंग्लिशवर व इतर भाषांवर प्रभुत्व असूनही त्यांनी संस्कृतमध्ये लिहिले त्याचे कारण त्यांनी एका प्रस्तावनेत दिले आहे. संस्कृतभाषा ही इतर कोणत्याही भाषेइतकीच किंबहुना त्यांच्याहूनही अधिक कोणताही जीवनानुभव व्यक्त करायला समर्थ भाषा आहे, हे त्यांना सिद्ध करावयाचे होते. आधी संस्कृतमध्ये लिहिलेल्या व नंतर संस्कृतमध्ये अनुवादित केलेल्या काही कथा याची साक्ष देतात.

     बाईंनी सात एकांकिका, तीन अंकी तीन नाटके, पस्तीस कथा, अनेक निबंध, पत्रे आणि प्रवासवर्णने लिहिल्याचा उल्लेख सापडतो, पण हे सर्व साहित्य उपलब्ध झालले नाही. संस्कृत साहित्याचा विचार करता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात त्यांच्या तोडीची एकही स्त्री-लेखिका आढळत नाही.

डॉ. आशा गुर्जर

राव, क्षमा