Skip to main content
x

साठे, बळवंत शंकर

            डॉ. बळवंत शंकर साठे यांचे पशुवैद्यकीय पदवी शिक्षण मध्य प्रदेशातील जबलपूर येथे, तर पदव्युत्तर शिक्षण उत्तर प्रदेशातील इज्जतनगर येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत पार पडले. साठे यांनी ऑस्ट्रेलियन कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती अंतर्गत ऑस्ट्रेलियातील न्यू इंग्लंड विद्यापीठातून पशुविज्ञान विषयात पीएच.डी. पदवी मिळवली. तसेच कुक्कुट-आहारशास्त्र या विषयात पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रम व्हँक्युअर येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात पूर्ण केला. जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठात पशुउत्पादन आणि पशुसंगोपन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच साठे यांची राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) येथे पशुविज्ञानविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली. येथेच पदोन्नती होत ते याच संस्थेचे प्रमुख महाव्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले. जागतिक कुक्कुटविज्ञान परिषदेतर्फे १९९८मध्ये नवी दिल्ली येथे भारतात प्रथमच आयोजित कऱण्यात आलेल्या विसाव्या अधिवेशनाचे महासचिव म्हणून डॉ. साठे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय कुक्कुटपालन व्यवसायाची व्याप्ती, स्वरूप आणि त्यातील संधी जागतिक कुक्कुटपालन व्यावसायिकांसमोर मांडण्याची संधी यानिमित्ताने डॉ. साठे यांना मिळाली.

            कुक्कुटपालन क्षेत्रातील संशोधनावर आधारित विज्ञानविषयक लेख प्रसिद्ध करण्यात डॉ. साठे अग्रेसर होते. त्यांचे पन्नास लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘भारतीय कुक्कुटपालन क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी’ आणि ‘दुर्बल गटातील भारतीयांसाठी कुक्कुटपालन क्षेत्रातील बदलती संरचना’ हे जागतिक अन्न व कृषी परिषद (रोम) या संघटनेमार्फत प्रसिद्ध झालेले अहवाल आणि नाबार्डतर्फे प्रकाशित कृषि-प्रकल्प अहवालातील तांत्रिक बाबी या विषयांवरील त्यांच्या लेखांनी भारतीय कुक्कुटपालन व्यवसायाची जगाला ओळख करून दिली. त्यायोगे जागतिक स्तरावरील अनेक कुक्कुटपालन व्यावसायिक आणि संशोधन संस्था भारतीय व्यवसायाकडे आकर्षित होण्यास मदत झाली.

            जबलपूर कृषी विद्यापीठात कार्यरत असताना दुग्ध व्यावसायिक व कुक्कुटपालक यांनी उत्पादनवाढीसाठी अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना डॉ. साठे यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्या व पशुपालकांपर्यंत पोहोचवल्या. यात प्रामुख्याने उन्हाळ्यात अंड्यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर, अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या आहारात चुनखडीचा योग्य प्रमाणात वापर, कोंबड्यांच्या खाद्यान्नातील प्रथिनांचे प्रमाण ओळखण्यासाठी झटपट  आणि सोपी प्रयोगशाळा पद्धत, वैरण पिकावरील बुरशीच्या प्रतिबंधासाठी गोमूत्राचा वापर, अझोला या शेवाळाचा हिरवी वैरण म्हणून दुग्धोत्पादनात वापर यांचा समावेश आहे. डॉ. साठे यांनी शोधलेल्या या उपयुक्त पद्धती आज मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत.

            शैक्षणिक आणि संशोधन कार्यातून बाहेर पडून कृषी व पशुपालन अर्थकारणात प्रवेश केल्यानंतर डॉ.साठे यांनी समाजातील दुर्बल घटकांना बँकाकडून अर्थसाहाय्य मिळण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. यातूनच उत्तरपूर्व राज्ये आणि जम्मू-काश्मीर या अल्पविकसित राज्यांतील जनतेसाठी त्यांनी पशुपालनसंबंधी योजना आखून दिल्या. भारतातील इतर विकसित व अविकसित राज्यांतील शेतमजूर, अल्पभूधारक, भूमिहीन आणि महिला गटांसाठीही त्यांनी पशु-संवर्धन क्षेत्रात नवीन अर्थविषयक योजना राबवल्या.

            समाजातील दुर्बल घटकांना पशुपालन व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी डॉ. साठे यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर इतर राष्ट्रांतील गरीब जनतेचाही विचार केला. या क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि प्रकल्प अहवाल लिहिण्यातील कौशल्य याचा लाभ फिलीपाइन्स, चीन, येमेन, टांझानिया, चाड रिपब्लिक, मोझंबिक आदी गरीब आफ्रो-आशियाई देशांतील जनतेलाही मिळवून दिला. दुर्बल घटकांव्यतिरिक्त पशु-संवर्धन क्षेत्रात प्रगती साधू  इच्छिणाऱ्या पशुपालक व शेतकऱ्यांसाठी डॉ.साठे यांनी अनेक छोटे पण नावीन्यपूर्ण आदर्श प्रकल्प तयार केले व आर्थिक साहाय्यासाठी ते बँकांसमोर सादर केले. गाई-म्हशींच्या कालवडींचे दुग्धोत्पादनासाठी संगोपन, वैरणविकास, खाद्यान्ननिर्मिती, खासगी क्षेत्रात लसनिर्मिती, कृत्रिम रेतन, मांसोत्पादनासाठी म्हशींची नर वासरे आणि करडू संगोपन दूधतपासणी उपकरणे, छोट्या प्रमाणावर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, भाकड जनावरे संगोपन अशा विविध योजना व प्रकल्प डॉ. साठे यांनी तयार केले. कोंबडीपालन क्षेत्रासाठी मांसल कोंबडी उत्पादन, अंडी उबवणी केंद्राची स्थापना, कुक्कुट मांस प्रक्रिया, कुक्कुटलसनिर्मिती, खाद्यान्न मिश्रणे, कोंबड्यांच्या पिसापासून बॅडमिंटन शटलनिर्मिती, बटेर व बदकपालन असे अनेक व्यावसायिक प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबवले. शेळ्या, मेंढ्या, वराह, ससेपालन या क्षेत्रासाठीही त्यांनी अनेक आर्थिक योजना तयार केल्या.

            पशुपालन क्षेत्रउद्धाराचे कार्य डॉ. साठेे यांनी आयुष्यभर पार पाडले. पशुवैद्यकीय वा पशुपालन क्षेेत्रातील पारंपरिक विषयाशीच निगडित न राहता या क्षेत्राच्या आर्थिक बाबींकडेही साकल्याने पाहणारा पशुवैद्य हीच डॉ.बळवंत शंकर साठे यांची खरी ओळख आहे. डॉ.साठे यांचे पशु-संवर्धन क्षेत्रातील अद्वितीय कार्य पाहून ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, पुणे या संस्थेने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार (२००९) देऊन गौरव केला.

- डॉ. रामनाथ सडेकर

साठे, बळवंत शंकर