Skip to main content
x

शिंदे, विलास जगन्नाथ

       चित्रकार विलास जगन्नाथ शिंदे यांचा जन्म एकंबे या सातारा जिल्ह्यातील लहानशा गावी  झाला. त्यांच्या आईचे नाव द्वारकाबाई. एकंबे हे निसर्गाच्या सान्निध्यातले गाव असल्याने हिरव्या रंगाचे भवताल, निळेभोर आकाश, उडणारे पक्षी, नदीकाठच्या निवांत वेळा, बदलणारे ऋतुचक्र असे निसर्गाचे अनेक विभ्रम अनुभवत विलास शिंदे यांचे बालपण गेले. या निसर्गरम्य बालपणाचा प्रभाव नंतरच्या संपूर्ण आयुष्यावर व्यापून राहिला.

त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथे कोरेगावमधील न्यू सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. शाळेतल्या दिवसांत याच निसर्गाच्या ओढीने केलेली वर्णने कधी रेखाटनातून, तर कधी शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली. या रेखाटनांमधली उत्स्फूर्तता हेरून शाळेतील शिक्षकांनी त्यांना कलाशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी १९७२ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्रवेश घेतला. निसर्गाच्या कुशीतून आलेल्या शिंदे यांना मुंबई शहराच्या जीवनमानाशी आणि जे.जे. सारख्या नावाजलेल्या कलामहा-विद्यालयाशी जोडून घेताना मानसिक संघर्ष करावा लागला. ‘मुंबई’चा सांस्कृतिक धक्का हळूहळू पचवत जे.जे.मधले शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. इथे त्यांना दृश्यकलेचे मूलभूत शिक्षण मिळाले. विविध माध्यमे व तंत्रांचे प्रयोग करता आले. पण जे.जे.तील वास्तववादी चित्रशैलीमध्ये ते रमले नाहीत. मुंबईमध्ये सुरू असलेल्या विविध कलाप्रयोगांमध्ये मात्र त्यांना रस वाटत राहिला. मुंबईतील कलाक्षेत्राचा इतिहास आणि समकालीनता यांचा अभ्यास व विचारमंथन सुरू राहिले.

त्यांना जे.जे.मधून ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेन्टिंगची पदविका १९७८ मध्ये मिळाली आणि त्यापुढील उच्च शिक्षणाकरिता त्यांनी वडोदरा गाठले. त्यांनी १९८० पर्यंत वडोदरा येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठात फाइन आर्ट विभागात उच्च शिक्षण घेतले. या दोन वर्षांच्या काळात प्रथितयश चित्रकार, शिक्षक के.जी. सुब्रह्मण्यन, गुलाम मोहंमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च्या पाळामुळांचा शोध घेत दृश्यनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यानंतरच्या काळात रेषा, आकार, रंग हे त्यांच्या चित्रांमध्ये अमूर्त कलेच्या अंगाने अधिक सशक्तपणे येऊ लागले.

अभिव्यक्तीच्या या शोधप्रक्रियेत त्यांनी बिंदूपर्यंतचा प्रवास केला. बिंदू हा त्यांच्या चित्रातला महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या मते, बिंदू ही चित्राला ऊर्जा प्राप्त करून देणारी त्यांच्या चित्रातील भावनेची अभिव्यक्ती आहे.

त्यांना १९८१ ते १९८३ या काळाकरिता फे्ंरच सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. ते इकोल नॅशनल सुपिरिअर द ब्यू येथे चित्रकला आणि पॅरिसमध्ये एस.डब्ल्यू. हेटर यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्राचित्रण शिकले. पॅरिसमधील वास्तव्यात त्यांना जागतिक दर्जाच्या कलाकृती अभ्यासण्याची संधी मिळाली. दोन्ही माध्यमात त्यांनी सातत्याने काम केले असून अशा कलाकृती अनेक ठिकाणी प्रदर्शित झाल्या आहेत.

निसर्गाकडे असणारा ओढा, अंतर्मुख स्वभाव आणि प्रयोगशील वृत्ती यांतून विलास शिंदे यांची कलानिर्मिती सातत्याने सुरू आहे. पॅरिसहून परत आल्यानंतर त्यांनी विविध कलाप्रदर्शनांमधून भाग घेतला. मुंबई, वडोदरा, दिल्ली, फिनलंड, युगोस्लाव्हिया, पोर्तुगाल, जर्मनी, मॉरिशस, जपान, यु.एस.ए., पॅरिस इत्यादी ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कलाकृतींचा समावेश झाला आहे.

भारत व परदेशांतील अनेक कलाप्रदर्शनांमध्ये विलास शिंदे यांच्या बरोबरीने त्यांच्या चित्रकार पत्नी जिनसुक शिंदे यांचा सक्रिय सहभाग असतो. विलास शिंदे यांना अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले आहेत. ब्रिटिश काउन्सिल व सिमरोझा आर्ट गॅलरी यांच्या माध्यमातून  २००० साली ग्लासगो येथील प्रिन्टिंग स्टूडिओमध्ये काम करण्याकरिता त्यांची निवड करण्यात आली. त्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून २००५—०७ साली सीनियर फेलोशिप प्रदान करण्यात आली. दैनंदिन अनुभवांच्या भौतिक अर्थापलीकडचे जग शोधताना, दृश्यकलेच्या माध्यमातून आणि रंगलेपनाच्या विविध प्रयोगांतून निर्मिती करत चित्रसर्जनाचा आनंद घ्यायचा ही त्यांच्या चित्रनिर्मितीमधील महत्त्वाची प्रक्रिया राहिलेली आहे.

- माणिक वालावलकर

शिंदे, विलास जगन्नाथ