Skip to main content
x

सोनवणी, पंडित विष्णू

           पंडित विष्णू सोनवणी यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या निफाड येथे झाला. माध्यमिक शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यावर नाशिक शहरात, न्यू हायस्कूलमध्ये कलाशिक्षक व नंतर कलानिकेतन, नाशिक या संस्थेच्या ड्रॉइंग टीचर्स कोर्स या विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. काही काळ औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात ते प्राध्यापक होते.

               परंतु १९५० सालापासून वृत्तपत्रे व विविध नियतकालिकांतून कथाचित्रकार (इलस्ट्रेटर) म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. नाशिकमधील ‘अमृत’, ‘गावकरी’, ‘श्रीयुत’, ‘रसरंग’, ‘देशदूत’, ‘लोकमत’, ‘सकाळ’ या वृत्तपत्रे, साप्ताहिकांसाठी कथाचित्रे  (इलस्ट्रेशन्स), संकल्पना (डिझाइन) व मांडणी (लेआउट) यांत त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला, तसेच मुंबईतील ‘शब्दरंजन’, ‘बहुश्रुत’, ‘लोकसत्ता’, ‘चित्रानंद’ या प्रकाशनांसाठीही त्यांनी काम केले. याखेरीज महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाच्या मराठी, कन्नडमधील  बालभारतीच्या पुस्तकांचे, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , पुणे, मुंबई, कोल्हापूरमधील प्रकाशनांसाठी त्यांनी काम केले.

               अतिशय उत्तम सुलेखन (कॅलिग्रफी) हा सोनवणींचा खास प्रांत होय. त्यांनी त्यात इतके विविध प्रयोग केले; पण त्यांच्या संकोची स्वभावामुळे त्यांची प्रदर्शने, प्रात्यक्षिके झाली नाहीत.

               पेन व ब्रशने केलेल्या चित्रांचा आणि इलस्ट्रेशन्सचा  फार मोठा संग्रह त्यांच्याजवळ आहे. पन्नास वर्षांतील या सर्व निवडक चित्रांचे प्रदर्शन २००१ मध्ये नाशिक, सांगली व मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये झाले. दिल्लीच्या ऑल इंडिया फाइन आर्ट सोसायटीच्या कलादालनात २००५ मध्ये त्यांचे प्रदर्शन झाले. लोकहितवादी मंडळ चित्रकला समिती प्रमुख, दैनिक ‘सकाळ’च्या बालचित्रकला स्पर्धेचे ते गेली अनेक वर्षे परीक्षक व नाशिकमधील तरुण चित्रकारांचे मार्गदर्शक आहेत. त्यांना ‘ऑल इंडिया फाइन आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी, नवी दिल्ली’तर्फे ‘तपस्वी चित्रकार’ (व्हेटरन आर्टिस्ट) हा सन्मान व इतरही पुरस्कार मिळाले आहेत.

               नाशिकसारख्या ठिकाणी कथाचित्रे आणि मांडणी या स्वरूपाचे काम करून त्यांनी दृक्संवादकलेची एक परंपरा मुंबई-पुण्याबाहेर रुजवली.

- शिवाजी तुपे

सोनवणी, पंडित विष्णू