सरदेशमुख, विठ्ठल रामचंद्र
विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील ब्रह्मगाव येथे झाला. त्यांचे घराणे मुळात कीर्तनकारांचे; पण पेशवाईत त्यांस सरदेशमुखीचे वतन मिळाले होते. संगीताचे बाळकडू त्यांना आईकडूनच मिळाले व तिच्या प्रोत्साहनाने हार्मोनिअम वादनाला सुरुवात झाली. मिरजेचे राजारामपंत मुंडे यांच्याकडे त्यांचे आरंभीचे संगीत शिक्षण झाले. पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात आले. शालेय शिक्षण घेत असताना हरिभाऊ वाटवे या पुण्यातील हार्मोनिअम शिक्षकांकडूनही त्यांना मार्गदर्शन मिळाले. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेशबाबू माने यांच्या सान्निध्यात या सुरेल गायकीच्या अंतरंगाशी विठ्ठलरावांचा परिचय झाला. काही काळ त्यांना पं. सवाई गंधर्व यांचीही तालीम मिळाली. त्यांनी एक गायक म्हणून किराणा गायकीची निष्ठेने जोपासना केली. सुरेल गायनाइतकाच तानपुरे अतिशय सुरेल जुळविण्याबद्दलही त्यांचा लौकिक होता.
विठ्ठलराव सरदेशमुखांनी पुण्यातील स.प.महाविद्यालयातून संस्कृत या विषयात पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण करून, बी.ए.बी.टी. ही पदवी मिळवून ते अहमदनगरला परतले. तेथे त्यांनी ‘सुरेश संगीत विद्यालय’ सुरू केले, तसेच शाळेत शिक्षक म्हणूनही ते काम करू लागले. पुण्यातल्या मुलींच्या भावे शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. लवकरच पुण्यातील संगीतविश्वाशी त्यांचा परिचय होऊन जम बसला. आयुर्वेदाचार्य पांडुरंगशास्त्री व वामनराव देशपांडे, बाळासाहेब अत्रे, दत्तोपंत देशपांडे या मंडळींच्या नेहमीच्या बैठकीत ते सामील झाले. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते व ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’च्या आरंभीच्या काळात त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त ते आपल्या गायन व हार्मोनिअम वादनाची हजेरी लावत.
त्या काळातील सर्वच कलाकारांवर ज्यांच्या हार्मोनिअम वादनाचा प्रभाव पडला, त्या गोविंदराव टेंबे व विठ्ठलराव कोरगावकर यांच्याकडूनही त्यांनी हार्मोनिअम वादनातील बारकावे आत्मसात केले. विठ्ठलराव सरदेशमुख हे त्या पिढीतील रसिल्या, ढंगदार अशा ‘गोविंदराव शैली’ने स्वतंत्र हार्मोनिअम वादन करणारे, तसेच अत्यंत पूरक व नेमकी साथसंगत करणारे कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पॅरिस रीडस हार्मोनिअमची व तिच्या ‘स्वरजुळणी’ची ते जिवापाड काळजी घेत असत. विठ्ठलरावांच्या हार्मोनिअम वादनात सुरेलपणा व तयारीचाही सुंदर प्रत्यय येत असे. वादनातूनही त्यांना मिळालेल्या किराणा घराण्याच्या गायकीचेच दर्शन घडत असे. ते खास ‘सुरेशबाबूं’च्या शैलीची ठुमरीही फार नजाकतीने वाजवत.
त्यांनी १९४० ते १९७२-८० या कालावधीत मुलींच्या भावे शाळेत संस्कृत शिक्षक म्हणून काम केले. संस्कृतबरोबरच विशेष गुणवत्तेच्या विद्यार्थिनींना ते गायनही शिकवत असत. भावे शाळेच्या अभ्यासक्रमात संगीत विषय सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. विठ्ठलरावांच्या घरी दर रविवारी मैफल होई व हा उपक्रम त्यांनी तीसेक वर्षे सातत्याने केला. या अनौपचारिक मैफलींमध्ये कलाकारांची परस्परांत सांगीतिक देवाणघेवाण होई. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, लालजी गोखले अशा अनेक कलाकारांची तेथे नित्य ये-जा असे. ‘मॉडेल कॉलनी आर्ट सर्कल’ची स्थापना करून अनेक कलाकारांच्या मैफली त्यांनी घडवून आणल्या.
मुंबई, पुणे व औरंगाबादच्या आकाशवाणी केंद्रांवरून त्यांचे गायन व एकल हार्मोनिअम वादनाचे कार्यक्रम होत असत. एक उत्तम दर्जाचे हार्मोनिअम संगतकार म्हणूनही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, गंगूबाई हनगल व भीमसेन जोशी अशा किराणा घराण्याच्या गायकांना विठ्ठलरावांनी समरसून साथ केलीच, शिवाय कुमार गंधर्व, सिद्धेश्वरी देवी, अझमत हुसेन खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर अशा ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या कलाकारांनाही ते तेवढीच रोचक संगत करत असत.
त्यांनी १९५६ साली हार्मोनिअमची संगत करणे थांबवले. काही प्रसंगीच त्यांनी कुमार गंधर्व, भीमसेन जोशी अशा मोजक्याच, पण उच्च कोटीच्या कलाकारांना हार्मोनिअमची साथ केली. विठ्ठलराव सरदेशमुख यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये प्रभुदेव सरदार, योगिनी जोगळेकर, उषा चिपलकट्टी, पौर्णिमा तळवलकर, लीला सरदेसाई, माधुरी दंडगे, शांता निसळ यांचा उल्लेख करता येईल. अभिनेते व गायक चंद्रकांत गोखले हेही काही चिजा त्यांच्याकडून घेत असत. याशिवाय माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे व पद्मा तळवलकर या सुप्रसिद्ध गायिकांनाही आरंभीच्या काळात विठ्ठलरावांनी मार्गदर्शन केले होते. त्यांचे पुत्र विजय सरदेशमुख यांनाही विठ्ठलरावांनी आपल्या संगीताचा वारसा दिला.
विठ्ठलराव सरदेशमुख हे हरहुन्नरी कलाकार होते. संगीताप्रमाणेच चित्रकला, सुलेखन, रांगोळी, पुष्पसजावट या कलांमध्ये त्यांना रस व गती होती. त्यांचे पुणे येथे निधन झाले. ‘गाथा एका विठ्ठलाची’ हे विठ्ठलराव सरदेशमुख यांचे ललितचरित्र त्यांच्या कन्या नलिनी कुलकर्णी यांनी २००१ साली प्रसिद्ध केले.