Skip to main content
x

सरवटे, वसंत शंकर

          प्रख्यात व्यंगचित्रकार आणि व्यंगचित्रांचे भाष्यकार वसंत शंकर सरवटे यांचा जन्म कोल्हापूरला झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती. त्या वेळचे कोल्हापूर कला आणि साहित्यातील मान्यवरांनी गजबजलेले होते, तरी त्या काळात व्यवसाय म्हणून चित्रकलेला वाव नव्हता. त्यामुळे पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतली आणि एसीसी कंपनीत नोकरी करून मुख्य डिझाइन इंजिनिअर म्हणून ते १९८७ मध्ये निवृत्त झाले. सरवटे यांनी चित्रकला एक हौस म्हणून आयुष्यभर जोपासली. बालवयातील चित्रकार दलालांच्या आणि नंतर पाश्चात्त्य व्यंगचित्रकारांच्या प्रभावामुळे ‘व्यंगचित्र’ हे त्यांच्या कामाचे मुख्य क्षेत्र बनले. त्यांचा विवाह १५ डिसेंबर १९५७ रोजी संजीवनी यांच्याशी झाला.

          मराठी भाषेतले व्यंगचित्रांचे क्षेत्र तसे मर्यादित आहे आणि त्याला जवळपास ऐंशी वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे जनमानसात काही मोजकेच व्यंगचित्रकार रुजलेले दिसतात. वसंत सरवटे यांनी त्यांत आपल्या चिंतनशील, मर्मग्रही आणि प्रयोगशील रेखाटनशैलीमुळे आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. नर्मविनोदी शैलीत सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाहांचा, मूल्यांचा दंभस्फोट करणार्‍या व्यंगचित्रांबरोबरच पुस्तकांची मुखपृष्ठे, कथाचित्रेदेखील त्यांनी तितक्याच ताकदीने केलेली आहेत. त्यांच्या हास्यचित्रांचे सहा संग्रह प्रकाशित झालेले आहेत, त्यांमधून त्यांच्या व्यंगचित्रांच्या विस्तृत पटाचे दर्शन होते.

          लेखक म्हणूनही त्यांची कामगिरी लक्षणीय आहे. ‘व्यंगचित्र : एक संवाद’, ‘सहप्रवासी’ (व्यक्तिचित्रे) आणि ‘व्यंगकला-चित्रकला’ ही तीन पुस्तके सरवटे यांची कलाविषयक भूमिका समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. समकालीन व्यंगचित्रकारांच्या कामाबद्दलची आस्था, चित्रकला आणि व्यंगचित्रकलेच्या बलस्थानांचा शोध आणि जीवनाबद्दलची प्रगल्भ जाण त्यांच्या लेखनातून दिसते.

          उत्तम व्यंगचित्र आयुष्याकडे खेळकर दृष्टीने पाहण्यास शिकवते. स्वत:बद्दलच्या अवास्तव कल्पना न बाळगणे, जगात आपली कोणती जागा आहे याचे भान असणे आणि पराभवही हसत स्वीकारणे ही खेळकर दृष्टीची सरवटे यांनी केलेली व्याख्या आहे.

          जीवनातल्या विसंगती लक्षात यायला ही खेळकर दृष्टी उपयोगी पडते. विसंगतीला विधायक वळण देण्याचे कार्य व्यंगचित्र करत असते. साहित्यात विनोदासाठी बरेचदा अतिशयोक्तीचा वापर केला जातो, तर चित्रात विरूपतेचा वापर होतो. ‘व्यंग चित्रित करणारे ते व्यंगचित्र’, अशी सरवटे यांनी व्यंगचित्राची व्याख्या केली आहे. काव्यात जसा वाच्यार्थ आणि व्यंगार्थ असतो, तसाच तो व्यंगचित्रातही असतो. वाच्यार्थापेक्षा वेगळा असा भावार्थ सूचित करण्याची क्षमता व्यंगचित्रात असते. या अर्थानेही ते व्यंगचित्र ठरते.

          सरवटे यांच्या चित्रांमध्ये निखळ विनोद असतोच; पण त्यांच्या चित्रांना अनेकदा साहित्याचे, सांस्कृतिक घडामोडींचे संदर्भ असतात. शब्दांच्या आधाराने बर्‍याचदा त्यांच्या चित्रांमधला विनोद फुलतो. त्यामुळे वाचक/प्रेक्षकांची अभिरुचीही संस्कारित असणे इथे आवश्यक ठरते. रेषा, चौकटी, अक्षरे, बोटांचे ठसे इत्यादींना व्यक्तिमत्त्व देऊन आपल्या व्यंगचित्रांमधून आशय व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग मराठीत आणि बहुधा भारतीय व्यंगचित्रकलेत सरवटे यांनीच पहिल्यांदा केला. अशा प्रायोगिकतेेचे मर्म समजण्यासाठीदेखील संस्कारित अभिरुची आवश्यक ठरते.

          व्यंगचित्रांचे विविध प्रकार आहेत. वृत्तपत्रांत येणारी राजकीय व्यंगचित्रे हा त्यांतला एक प्रमुख प्रकार होय. सरवटे यांनी या प्रकारची व्यंगचित्रे फारशी काढलेली नाहीत. सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक बदल, साहित्य-कला अशा विविध विषयांवर सरवटे यांनी चित्रे काढलेली आहेत. चित्रमालिका, अर्कचित्रे, संकल्पनात्मक चित्रे, प्रायोगिक चित्रे असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत.

          व्यंगचित्रमालिका हा प्रकार सरवटे यांनीच मराठीत आणला, आणि रूढ केला. ‘माझा संगीत व्यासंग’, ‘खुर्च्या’, ‘गमती-गमतीत’ या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका होत.

          सामाजिक आशयाच्या व्यंगचित्रांमध्ये सरवटे यांनी राजकीय क्षेत्राचे गुन्हेगारीकरण, नोकरशाही, निवडणुका, मोर्चा-निदर्शने, बदलती जीवनशैली, शिक्षणव्यवस्थेची अधोगती अशा अनेक विषयांवर मार्मिक व्यंगचित्रे काढलेली आहेत. गेल्या पन्नास वर्षांचा काळ हा सांस्कृतिकदृष्ट्या संक्रमणाचा काळ होता. मराठी मध्यमवर्गाची मानसिकता आणि जीवनशैली या काळात कशी बदलत गेली, त्याचा एक आलेखच सरवटे यांच्या व्यंगचित्रांमध्ये आढळून येतो. मोठ्या कुटुंबापासून ते आजच्या आई-बाबा आणि एकच मूल अशा त्रिकोणी कुटुंबापर्यंत, तसेच नात्यांच्या गोतावळ्यापासून ते अनिवासी मुलांच्या एकाकी आई-बापांपर्यंत कुटुंबव्यवस्थेचा प्रवास सरवटे यांंच्या व्यंगचित्रांमधून येतो. मुंबईकरांच्या जीवनातले लोकलचे हाल, पाण्याची समस्या, कामगारांचे मोर्चे यांचे चित्रण जसे त्यांत आहे, तसेच टीव्हीसारख्या माध्यमांनी वागण्या-बोलण्याच्या पद्धतीत किंवा समाजवर्तनात घडलेले बदल मार्मिकपणे टिपलेले आहेत.

          साहित्य, चित्रकला, संगीत, नाटक अशा कलाप्रकारांतील नव्या-जुन्या प्रवाहांबद्दल आणि अभिरुचीमधील दांभिकतेबद्दल सरवटे यांनी जी व्यंगचित्रे काढली आहेत, ती दंभस्फोट करत असली तरी त्याच वेळेस त्या-त्या कलेबद्दलची सूक्ष्म जाण आणि आस्थाही व्यक्त करतात. ‘माझा संगीत व्यासंग’, ‘मॉडर्न आर्ट अर्थ ज्याचा त्याचा’ अशा मालिकांमध्ये सरवटे कला आणि रसिक यांच्यातल्या विसंवादाला चित्ररूप देतात. त्यात कलेवर टीका असत नाही, तर अभिरुचीच्या सवंगपणावर, कलाकारांच्या अतिउत्साहावर शरसंधान केलेले असते.

          वसंत सरवटे यांनी अर्कचित्रांचा (कॅरिकेचर) प्रकार मराठीत रूढ केला. सरवटे यांच्या दृष्टीने अर्कचित्रात विशिष्ट व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, स्वभाव, विशिष्ट लकबी, त्याचे सामाजिक स्थान यांचा एकत्रित परिणाम साधलेला असतो. सरवटे यांनी वि.स. खांडेकरांपासून ते जयवंत दळवी, दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्यापर्यंत अनेक साहित्यिकांची ‘अर्कचित्रे’ काढलेली आहेत. कॅरिकेचरला अर्कचित्र हा समर्पक मराठी प्रतिशब्द सरवटे यांनीच दिला. डेव्हिड लेव्हाइन, आर.के. लक्ष्मण यांच्या अर्कचित्रांप्रमाणेच वसंत सरवटे यांच्या अर्कचित्रांची शैली आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे. सरवटे यांचा अर्कचित्रांचा वारसा प्रभाकर भाटलेकर आणि प्रभाकर वाईरकर सोडले, तर मराठीत तरी कोणी चालवताना दिसत नाही.

          ‘ललित’ मासिकाच्या आणि अन्य अंकांच्या मुखपृष्ठांसाठी वसंत सरवटे यांनी जी रंगीत चित्रे केलेली आहेत, ती संकल्पनात्मक स्वरूपाची आणि अभिजात चित्रांच्या शैलीला अधिक जवळची आहेत. इथे सामाजिक परिस्थितीवरचे किंवा जीवनाचे भाष्यकार म्हणून सरवटे आपल्याला जाणवतात. चित्राच्या मांडणीमधून, त्यातल्या तपशिलांमधून आणि शब्दांचा आधार न घेता सरवटे यांनी चित्राचा आशय समर्थपणे मांडलेला आहे. ‘ललित’ दिवाळी २००० च्या अंकावर दाखवलेला फ्रेंच शिल्पकार रोदांचा थिंकर आणि अमिताभचा ‘कौन बनेगा करोड़पति’ यांच्या प्रश्नांमधला ‘अर्थ’पूर्ण फरक किंवा ‘ललित’ दिवाळी २००७ च्या मुखपृष्ठातले परदेशस्थित मुला-नातवंडांचे आजी-आजोबा: त्यांचा समृद्ध, पण एकाकी वानप्रस्थाश्रम ही संस्कृती बदलावरची मूल्यसापेक्ष अशी जीवनभाष्ये आहेत. शि.द. फडणीस यांची ‘हंस’, ‘मोहिनी’ अशा नियतकालिकांची मुखपृष्ठे आणि सरवटे यांची ‘ललित’साठी केलेली मुखपृष्ठे सोडली, तर इतक्या सातत्याने हास्यचित्रांच्या माध्यमातून केलेली संकल्पनात्मक चित्रे मराठीत आढळत नाहीत.

          वसंत सरवटे यांनी पुस्तकांची मुखपृष्ठे आणि कथाचित्रे यांच्या माध्यमातून प्रकाशनक्षेत्राशी संबंधित उपयोजित कलेवरही आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. या प्रकारच्या कामासाठी आवश्यक असलेली साहित्याची उत्तम जाण आणि कल्पकता सरवटे यांच्यापाशी आहे. त्यामुळे पु.ल. देशपांडे, रमेश मंत्री यांच्या विनोदी लेखनापासून ते विंदा करंदीकर, विजय तेंडुलकरांच्या गंभीर साहित्यापर्यंत आणि वैचारिक लेखनापासून बालसाहित्या-पर्यंत सर्व पुस्तकांची मुखपृष्ठे वा कथाचित्रे त्यांनी केलेली आहेत. ही चित्रे कधी कथेच्या आशयाला चित्ररूप देणारी, तर कधी आशयाला समांतर; पण चित्रकाराच्या कल्पनेला वाव देणारी आणि कथेच्या आशयाची नवनिर्मिती करणारी झालेली आहेत.

          वसंत सरवटे यांच्या चित्रांची शैली त्यांच्या प्रयोगशीलतेतून आणि आत्मचिंतनातून घडलेली आहे. कोल्हापूरला झालेले निसर्गचित्रांचे आणि अभिजात चित्रकलेचे संस्कार, दलालांच्या कथाचित्रांचा आणि व्यंगचित्रांचा प्रभाव, तसेच आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रांबद्दल आणि कलाप्रवाहांबद्दल असलेली डोळस जाणीव, आस्था यांतून त्यांची शैली बनलेली आहे. व्यंगचित्रांमध्ये रेखाटनकौशल्यापेक्षा (ड्रॉइंग) भावना व्यक्त करण्याला (एक्स्प्रेशन) अधिक महत्त्व असते. विरूपीकरण (डिस्टॉर्शन) हादेखील व्यंगचित्रातला एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक व्यंगचित्रकार आपल्या प्रकृतीनुसार या घटकांचा कमी-अधिक प्रमाणात उपयोग करून घेत असतो.

          सरवटे या घटकांचे प्रमाण साहित्याच्या आशयानुसार लवचीकपणे वापरतात. त्यामुळे त्यांची रेषा कधी प्रमाणबद्ध, कधी स्वैर, तर कधी विरूपाचा आश्रय घेताना दिसते. मराठीत राजकीय व्यंगचित्रांमध्ये डेव्हिड लो, आर.के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यांची कमी-अधिक जाडीची रेषा अधिक रूढ झाली, तर फडणिसांनी प्रमाणबद्ध, सौंदर्यपूर्ण रेषेचा हास्यचित्रांसाठी वापर केला.

          सरवटे यांची रेषा क्विल निबने अथवा पेनने काढावी तशी एकाच जाडीची आणि तिरकस आहे. ती कधी जोरकस, कधी हळुवार, तर कधी लयबद्ध होते. कधी तपशील भरून, तर कधी रेषांच्या आडव्या-उभ्या जाळीतून त्यांच्या चित्राचा पोत (टेक्स्चर) तयार होतो. परिप्रेक्ष्याचा (पर्स्पेक्टिव्ह) वापर हेदेखील त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे. दलालांनी जसा कथाचित्रांमध्ये विविध शैलींचा वापर केला, तसाच सरवटे यांनी व्यंगचित्रांमध्ये केला. मराठी मध्यमवर्गीय जीवनाचा भाष्यकार म्हणून समकालीन साहित्यिकांइतकेच वसंत सरवटे यांचे योगदानही महत्त्वाचे आहे.

          पुणे-मुंबईपासून कुडाळ-चाळीसगाव या महाराष्ट्रातील आणि बंगळुरू, पणजी या बाहेरील गावी भरलेल्या त्यांच्या ‘खेळ रेषावतारी’ या हास्यचित्रे आणि अर्कचित्रांच्या प्रदर्शनांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

          त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्याचा ‘उत्कृष्ट साहित्य’ पुरस्कार मिळाला आहे, तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्टने त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरवले आहे.

- दीपक घारे

सरवटे, वसंत शंकर