Skip to main content
x

तलगेरी, श्रीकांत

     श्रीकांत तलगेरी यांची मातृभाषा कोकणी असून त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. वन्यजीव संपदा, संगीत, भाषाशास्त्र, धर्म व तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती हे त्यांचे आवडते विषय आहेत.

     ‘‘इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत्’’ ह्या उक्तीनुसार पुराणांच्या मदतीने वेदांचा अर्थ लावताना अनेक वर्षांच्या अविरत अध्ययन व संशोधनाने त्यांनी ‘आर्य बाहेरून आले’ या पाश्चात्त्यांच्या मताचे मुद्देसूद खंडन केले. ‘The Aryan Invasion Theory: A Reappraisal’हा १९९३ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा पहिलाच ग्रंथ पौर्वात्य व पाश्चात्त्य विद्वानांसाठी विचारप्रवर्तक व विवाद्य ठरला. राजकीय भाष्यासहित काढलेली या पुस्तकाची आवृत्ती  ‘The Aryan Invasion Theory and Indian Nationalism’ या नावाने निघाली व त्याचे पुनर्मुद्रण २००३ साली झाले.

     मध्यंतरी २००० साली त्यांचे ‘The Rigveda: A Historical Analysis’ हे ऋग्वेदाचे ऐतिहासिक दृष्टिकोनातून विश्लेषण करणारे दुसरे पुस्तक प्रसिद्ध झाले. यावर जी विरुद्ध मत-मतांतरे प्रसिद्ध झाली त्यांचा परामर्श घेऊन पुनर्मुद्रित आवृत्तीत तलगेरी यांनी त्यांची भूमिका तीन मुद्दे देऊन स्पष्ट केली. १) हिंदुत्व हा भारतीयांना एकत्र आणणारा सांस्कृतिक ऐक्याचा मुद्दा आहे, २) इस्लाम व ख्रिश्चन धर्म हे अभारतीय आहेत, तर हिंदू भारतीय आहे. ३) हिंदू म्हणजे आर्य नव्हे, तर भारतीयच होय.

     मूळ संस्कृत वेद संहिता वाचून ऋग्वेदातील १० मंडलांची प्राचीन, मध्यकालीन व अर्वाचीन अशी फेररचना करताना तलगेरी यांनी मंडलकर्ते ऋषी, राजकुले, तत्कालीन इतिहास व भूगोल, नद्यांची नावे, अवेस्ता ह्या पारशी लोकांच्या धर्मग्रंथात आढळणारी साम्यस्थळे या सर्वांचा सखोल अभ्यास केला व निष्कर्ष काढला, की आर्य भारताच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी असून विस्तारासाठी ते पश्चिमेस व वायव्येस गेले. भारतातून त्यांनी इराण व अन्य प्रदेशांत स्थलांतर केले.

     त्यांचा निष्कर्ष दृढ करण्यासाठी त्यांनी पुन्हा आठ वर्षे संशोधन केले व ’The Rigveda and the Avesta The Final Evidence’ हा ग्रंथ २००८ साली प्रसिद्ध केला. आर्यांच्या स्थलांतराविषयी, ऋग्वेदातील मंडलांच्या पौर्वापर्याविषयी हा निर्णायक ग्रंथ आहे असे लेखक आत्मविश्वासाने मांडतो. हार्वर्ड विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक मायकेल विट्झेल यांच्या पूर्वग्रहदूषित मतांचे, शालेय जीवनापासून भारतीयांना विभाजित करण्यासाठी हेतुपुरस्सर प्रसृत केलेल्या आर्य-अनार्य वादाचे खंडन या निर्णायक ग्रंथात आढळते. यातील निष्कर्ष असे : १) ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपासून वैदिक ऋषी सरस्वतीच्या तीरावर पुरू/पौरव म्हणून राहत होते. २) इराणी, आर्मेनिअन लोक आर्यांच्या पश्चिमेस ‘अनू’ या नावाने ओळखले जात. ३) अनूंच्या पश्चिमेस व उत्तरेस मध्य आशियात द्रुहयू होते. ४) यदू तुर्वसू वैदिकांच्या दक्षिणेस, तर ईक्ष्वाकू पूर्वेस होते.

     आपल्या अभ्यासपूर्ण संशोधनाची मांडणी तलगेरी हे व्याख्यानांच्या माध्यमातून करीत असतात.

      हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून, तौलनिक भाषाशास्त्राच्या अध्ययनातून, मूळ संहितांच्या वाचनातून व भारतीयत्वाच्या निष्ठेतून लिहिलेले हे तीनही ग्रंथ व त्यांतील मौलिक विचारधन वेदांच्या अभ्यासकांना व संशोधकांना पथप्रदर्शक ठरतील यात संदेह नाही.

     — डॉ. गौरी माहुलीकर

तलगेरी, श्रीकांत