Skip to main content
x

तुळपुळे, पुरुषोत्तम गोपाळ

     डॉ. पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण श्री गोपाळ हायस्कूल, पुणे येथे झाले, तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नवरोज वाडिया महाविद्यालय, पुणे येथे घेतले. १९४७ साली ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. झाले. त्याच वर्षी त्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळून ते पोषण संशोधन प्रयोगशाळा, कुन्नूर (आता राष्ट्रीय पोषण संस्था, हैदराबाद) येथे रुजू झाले.  त्या वेळचे संस्थेचे संचालक डॉ. वि. ना. पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवनसत्त्व ब६ आणि आवश्यक मेदाम्ले यांचे परस्पर संबंध’ या विषयावर संशोधन करून त्यांनी जीवरसायनशास्त्रात १९५१ साली पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनात त्यांनी ‘फ्रेनोडर्मा किंवा बेडकाची कातडी हा त्वचेचा विकार आवश्यक मेदाम्लांच्या कमतरतेमुळे होतो’, हे सिद्ध केले. पीएच.डी.पश्चात संशोधनासाठी त्यांना अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाने फुलब्राइट शिष्यवृत्ती दिली. त्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन राष्ट्रीय पोषण संस्थेत अन्न-विष विज्ञानातील संशोधनाला वाहून घेतले.

     डॉ. तुळपुळे यांचे मूलभूत शास्त्रीय ज्ञानात आणि कृषीविषयक, तसेच मानवाच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे काम कवकविष (अफ्लॉटॉक्सीन) या बुरशीच्या विषाबद्दलचे आहे.  कृषिउत्पन्न, मुख्यत्वे मका आणि भुईमूग यांचा साठा करताना बाष्प जास्त प्रमाणात राहिले, तर ‘अ‍ॅस्पर्शिलस फ्लॅवस’ या विषारी कवकाची त्यावर वाढ होते व अफ्लॉटॉक्सीन निर्माण होते. त्याच्या प्रतिबंधाकरिता काय उपाय योजावेत हे डॉ. तुळपुळेंच्या संशोधनाने दाखवून दिले. या विषामुळे यकृताचा कर्करोग होतो हे त्यांनी माकडांवर प्रदीर्घ प्रयोग करून दाखवून दिले. राजस्थानात टोळीने राहणाऱ्या जमातीत दिसून येणारे यकृताचे विकार (सिऱ्हॉसिस) अफ्लॉटॉक्सीनमुळे होतात हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध झाले.

     ते १९७१ साली सहायक निर्देशक आणि अन्न, तसेच औषध विषशास्त्राचे प्रमुख झाले. १९८० साली ते राष्ट्रीय पोषण संस्थेचे (जी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर.) अखत्यारीत आहे) संचालक झाले आणि १९८३ साली निवृत्त झाले. त्यांच्या ३०-३५ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनकार्यात डॉ. तुळपुळे यांनी आहार व पोषणशास्त्राच्या विविध क्षेत्रांत मूलभूत संशोधन केले असून त्यांचे ऐंशीहून अधिक लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. 

     त्यांचे खास संशोधन क्षेत्र अन्नविषविज्ञान होते आणि कवकविषासंबंधीचे संशोधन त्यांनी देशात सुरू केले. त्यांनी ‘कवकविषाचे हिंदुस्थानातील आरोग्याला धोके’ ही पुस्तिका प्रसिद्ध केली.  त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या संशोधनाकरिता मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटना, अन्नविषयक संघटना, आहार परिमाणित मध्यवर्ती समिती अशा विविध जागतिक संस्थांमधून डॉ. तुळपुळे यांनी महत्त्वाचे कार्य केले. डॉ. तुळपुळे यांनी भारतीय पोषण मंडळात सचिव, खजिनदार आणि नंतर उपाध्यक्ष ही वेगवेगळी पदे सांभाळली. ते १९८१ साली भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. तुळपुळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पोषण संस्थेच्या कार्याला नवीन दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच संस्थांबरोबर सहकार्याच्या योजना सुरू झाल्या. त्यांच्या अखत्यारीत त्यांनी सरकारला, तसेच काही आंतरराष्ट्रीय कार्यालयांना सल्ला दिला.

डॉ. तरला नांदेडकर

तुळपुळे, पुरुषोत्तम गोपाळ