Skip to main content
x

ठाकूर, एकनाथ केशव

     राज्यसभेतून निवृत्त होत असताना शिवसेनेचे राज्यसभा सदस्य एकनाथ ठाकूर यांच्या कार्यकतृत्वाला मानवंदना देत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यांच्या कार्याचा आम्ही आदर्श ठेवला पाहिजे, असे गौरवोद्गार काढले. 

     एकनाथ केशव ठाकूर यांचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या दोनशे लोकवस्ती असलेल्या म्हापण ह्या छोट्याशा खेड्यात झाला. एकनाथ एक वर्षाचा असताना त्यांच्या आईला देवाज्ञा झाली आणि वयाच्या दुसर्‍या वर्षी वडिलांचेही निधन झाले.  छोटा एकनाथ वयाच्या सातव्या वर्षांपासून कुडाळ येथील मासळी बाजारात दादा तेली यांच्या दुकानात गडी म्हणून वाणसामानाच्या पुड्या बांधण्याचे काम करू लागला. काम सांभाळून तो तेली यांच्या मुलांबरोबर कुडाळच्या शाळेत जाऊ लागला.

     एकनाथ ठाकूर कुडाळ येथूनच मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षणाची आवड, जिद्द व चिकाटी असल्यामुळे त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर परशुराम महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला आणि 1964 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. ते पुणे विद्यापीठात इतिहास व इंग्रजी विषयाचे स्कॉलर होते. त्यांनी एम. ए. चा अभ्यास करत असतानाच 1966 साली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रथम दर्जाच्या अधिकारी पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यामधून त्यांनी विशेष प्रावीण्य (डिस्टिंक्शन) मिळवले व ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झाले. तेथे त्यांनी विविध जबाबदार्‍या समर्थपणे सांभाळल्या. त्यावेळेस त्यांनी बैतुल, होशंगाबाद, इंदोर, पणजी, अमरोती, हैद्राबाद व मुंबई या ठिकाणी प्रथम दर्जाचे अधिकारी म्हणून काम केलेले होते.

     पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये 14 बँकाचे राष्ट्रीयीकरण केले, त्या वेळी ठाकूर यांनी समविचारी अधिकारी व सहकार्‍यांना सोबत घेऊन अखिल भारतीय स्टेट बँक अधिकारी महासंघाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला. सुरुवातीला ते या महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते व नंतर अध्यक्ष झाले. त्यांनी ‘ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ ऑल बंँक ऑफिसर्स’च्या स्थापनेतही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना सदर संघाचे आद्य अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

     बंँकिंग क्षेत्राचा कायापालट घडवणे हा एकनाथ ठाकूर यांचा ध्यास होता. यासाठी त्यांनी आपल्या संघटनकौशल्याचा यथोचित वापर केला. यामुळे त्यांची बँकिंग क्षेत्रातील अभ्यासू वृत्ती सिद्ध झाली. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन 1973 मध्ये त्यांच्यावर ‘उद्योग अधिकारी समन्वय महासंघा’च्या (ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ ऑफिसर्स ऑर्गनायझेशन) महासचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या महासंघात बँक, विमा, विमानसेवा, कोळसा, पोलाद, खाणी, खते, औषधे  इत्यादी उद्योगांतील भारतभरातील साडेसहा लाख अधिकारी आणि उच्चपदस्थांचा समावेश होता.

     इंदिरा गांधी यांनी 1976 मध्ये देशावर आणीबाणी लादल्याचा निषेध म्हणून ठाकूर यांनी स्टेट बँकेतील आपल्या अधिकारपदाचा व नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांच्या कारकिर्दीला एक नवीन वळण लाभले. तत्त्वनिष्ठा व नैतिकता जपण्यासाठी राजीनामा देऊन बाहेर पडणारे ते स्टेट बँकेच्या इतिहासातील पहिलेच अधिकारी ठरले.

     अणीबाणीच्या काळात ठाकूर यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पुढे सत्तापालटानंतर त्यांनी जनता पक्षाच्या राजवटीत पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विश्वास संपादन केला. त्याचवेळी जिनिव्हा व स्वित्झर्लंड येथे युनोतर्फे पहिल्या जागतिक अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक देशातील एक याप्रमाणे जगभरातील तीस लाख अधिकार्‍यांचे प्रतिनिधित्व 127 प्रतिनिधी करणार होते. मोरारजी देसाई यांनी परिषदेसाठी ठाकूर यांची निवड केली. त्यांची जागतिक परिषदेत उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आणि भारतातील अधिकारी चळवळीचे ते सर्वोच्च नेते ठरले. जिनिव्हाहून 1978 मध्ये परतल्यानंतर ठाकूर यांनी 32 मुलांची एक तुकडी घेऊन नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग ही बुद्धिमत्ता विकसन संस्था स्थापन केली. या संस्थेच्या देशभरात आज पन्नासहून अधिक शाखा कार्यरत आहेत. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी बँक भरती परीक्षा प्रशिक्षण, बँक सेवांतर्गतच्या परीक्षांचे प्रबोधन, व्यक्तिमत्त्व विकास असे उपक्रम राबवते. आजवर 3,25,000 विद्यार्थी या संस्थेतून प्रशिक्षित झाले असून 73,000 विद्यार्थी विविध बँकांमध्ये सेवारत आहेत तर 5,500 विद्यार्थी अन्य आर्थिक क्षेत्रांत कार्यरत आहेत.

     ठाकूर यांचे आर्थिक, राजकीय, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्व झळाळून उठले आहे. त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे चीफ एक्झीक्युटिव्ह, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशनचे संचालक अशी विविध पदे भूषवली. स्टेट बँकेचा राजीनामा देऊनही पुढे 2001 मध्ये दहा लाख कोटींचे भांडवल आणि 14,000 शाखा असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

     सारस्वत बँंक म्हणजे एकनाथ ठाकूर हे समीकरण रूढ झालेले आहे. त्यांनी सदर बँंकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. गेली वीस वर्षे ते बँकेच्या संचालक पदावर आहेत. त्यांच्या 16 जणांच्या पॅनलला 2011मध्ये 16,800 भागधारकांनी बँकेच्या 93 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध पसंती दर्शवली. ठाकूर 2012 मध्ये बँकेचे अध्यक्ष या नात्याने कार्यरत आहेत.

     बॅ. नाथ पै, एस.एम.जोशी, ग.प्र.प्रधान, बाबा आमटे या प्रभृतींशी ठाकूर यांचा स्नेह होता. राज्यसभेतील कामकाजामधील त्यांच्या अभ्यासू सहभागाबद्दल अनेक दिग्गजांनी त्यांची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असल्यापासून ठाकूरांचा त्यांच्याशी चांगला परिचय होता.

     ठाकूर यांना लहानपणापासून संघर्षमय जीवनाला सामोरे जावे लागले. जीवनात कसोटी पाहणारे क्षण  वारंवार उभे राहिले. परंतु ते सर्व संकटांना न डगमगता धीराने सामोरे गेले. ठाकूर 1970 पासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही त्यांनी स्वत:ला सावरले आहे. त्यांच्या जिभेवर 1970 साली शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांची डावी (व्होकल कॉर्ड) ध्वनी झडप बंद झाली. त्यातूनच डाव्या बाजूने चेहरा, ओठ यांच्यावर पाल्सी असल्यामुळे वाणीवर परिणाम झाला आहे.

     कर्करोगाचा पुन: प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यांना अनेकदा शस्त्रक्रिया, किरणोत्सार चिकित्सा अशा उपचारांना सामोरे जावे लागले. त्यांच्या मेंदूत गाठ झाल्याचे 1998 मध्ये निदर्शनास आले. सुप्रसिद्ध मज्जाशल्यविशारद डॉ. भगवती 6 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही गाठ काढून टाकण्यात यशस्वी झाले.

     बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियान ह्या 13,000 कि.मी.च्या राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरण जागृती प्रकल्पातही ठाकूर यांनी महासचिव म्हणून भूमिका बजावली होती.

     ठाकूर यांना समाजरत्न पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, साने गुरुजी पुरस्कार, ‘असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेटर ऑफ इंडिया’ तर्फे दिले जाणारे ‘एक्सलंस इन बिझनेस कम्युनिकेशन अ‍ॅवॉर्ड’, उद्योगरत्न पुरस्कार, अण्णासाहेब चिरमुले राष्ट्रीय पुरस्कार, सारस्वत समाजातर्फे दिला जाणारा ‘सारस्वतरत्न पुरस्कार’, रोटरी इंटरनॅशनलतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड’, मॅक्सेल फाउण्डेशनचा ‘मॅक्सेल अ‍ॅवॉर्ड’ असे विविध पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

- संदीप राऊत

ठाकूर, एकनाथ केशव