Skip to main content
x

वाघमारे, जनार्दन माधव

     कौठा ता. औसा जि. लातूर येथेे जनार्दन माधवराव वाघमारे यांचा जन्म झाला. निजामाच्या संस्थानिक कालखंडातले इस्लाम रझाकारी यवनी राज्य, शैक्षणिक सुविधांचा अभाव, गावात शाळा फक्त चौथीपर्यंत होती. नंतरचे शिक्षण पानचिंचोली या गावी झाले.

     १९५७ मध्ये निजाम महाविद्यालय, उस्मानीया विद्यापीठ, औरंगाबाद येथे इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय घेऊन बी.ए. केले. १९५९ मध्ये पुणे विद्यापीठातून इंग्रजीभाषा व साहित्य या विषयात एम.ए.केले. तसेच १९७० मध्ये एलएल.एम. अभ्यास पूर्ण केला. अर्थ, कायदा, राज्यशासन, भाषा अशा विविध विषयांत मुळातच रस असल्याने त्यांनी कायद्यांचा सखोल अभ्यास केला. पुढे १९८० मध्ये ‘द प्राब्लेम ऑफ आयडेंटीटी इन द पोस्टवॉर अमेरिकन निग्रो नॉवेल’ याविषयात पीएच.डी संपादन केली.

      प्राचार्य म्हणून राजर्षी शाहु महाविद्यालय लातूर या पदावर कार्य करण्यासाठी सज्ज झाले. १९७० पासून येथेच प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे यांनी लातूर पॅटर्नची निर्मिती केली. प्राचार्य म्हणून कार्यरत असताना इंग्रजी भाषा आणि साहित्य या विषयांचे पदवीपूर्व, पदवी आणि पदव्युत्तर वर्गास अध्यापन केले. तसेच ३५ वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवाबरोबरच शिक्षणक्षेेत्रातील प्रशासकीय कामाचा २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. १९७० ते १९९४ कालावधीत तब्बल २५ वर्षे प्राचार्य म्हणुन राजर्षी शाहु महाविद्यालयाचे काम पाहिले.

      वाघमारे यांना सर्वच एक विचारवंत म्हणून ओळखतात. नवीन विचार, नवनवीन कल्पना, नवीन प्रकल्प सतत नव्याचा शोध.

     डॉ. जे. एम. वाघमारे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे कुलगुरू पदावर नियुक्ती झाली. डॉक्टरांनी कुलगुरु पदावर सन १९९४-१९९९ या कालावधीत अत्यंत सक्रियपणे काम केले. नवीन विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रमांचा अंतर्भाव केला. व्यावसायिक व जीवनाभिमुख शिक्षणाची समाजातील गरज लक्षात घेऊन विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी खुले केले.

      शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या समृद्ध अशा अनुभवातून तसेच शिक्षण, साहित्य, समाजकारण या विषयाचा गाढा अभ्यास यातून जनसामान्यापासून बुद्धिवादी लोकांपर्यंत विचार पोचविण्याकरिता लेखन आणि ग्रंथनिर्मिती केली. यामध्ये -

      ‘अमेरिकन निग्रो, साहित्य आणि संस्कृती’, ‘महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण’, ‘शिक्षण - समाज परिवर्तन व राष्ट्रीय विकास’, ‘प्राथमिक शिक्षण - यशापयश आणि भवितव्य’, ‘साहित्यचिंतन’, ‘आजचे शिक्षणः स्वप्न आणि वास्तव’, ‘समाज परिवर्तनाच्या दिशा’ इ. होत.

      जे.एम.वाघमारे यांनी कादंबरी, व्यक्तिरेखा, प्रवासवर्णन, गौरवग्रंथ, अनुवादन असा साहित्याच्या विविध लेखन प्रकारामध्ये/लेखनशैलीमध्ये साहित्य निर्मिती केली आहे. विविध संशोधन पत्रिका व नियतकालिकातून मराठी आणि इंग्रजी भाषेतून वाङ्मयीन, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषयांवर विपुल प्रमाणात लिखाण प्रसिद्ध झाले आहे.

       १९८२ मध्ये ‘इंटरनॅशनल एक्सचेंज अँड स्कॉलर्स वॉशिंग्टन’ आणि ‘युनायटेड स्टेटस् फाऊंडेशन इन इंडिया’, न्यू दिल्ली या दोन संस्थांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या अमेरिका आणि इंग्लंडच्या शैक्षणिक प्रश्‍नांच्या अभ्यासाच्या फुलब्राईट प्रकल्पात निवड व सहभाग तसेच या प्रकल्पासाठी निवडलेल्या पाच भारतीय शिक्षणतज्ज्ञांच्या गटाचा नेता म्हणून त्यांची निवड झाली. प्रामुख्याने अमेरिकेतील कम्युनिटी कॉलेजांचा आणि इंग्लंडमधील तंत्रनिकेतनाचा विशेष अभ्यास केला. अमेरिका, इंग्लंड या देशातील विविध विद्यापीठ, महाविद्यालयातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्‍नांवर व्याख्याने दिली. काही ठिकाणी शैक्षणिक परिषदा व परिसंवादांमध्ये विचार व्यक्त केले.

      ऑगस्ट १९९८ मध्ये कॅनडाची राजधानी ओटा येथे झालेल्या कॉमनवेल्थ राष्ट्रातील विद्यापीठ परिषदेमध्ये (युनिव्हर्सिटीज कॉन्फरन्स)मध्ये सहभाग घेतला.

      शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक सेवाव्रत त्यांनी सतत लक्षात ठेवले. विविध समाजिक संस्था आणि विविध शासकीय, अशासकीय उच्चस्तरीय महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. सदस्य, विशेष निमंत्रित, अध्यक्ष, कुलपतींचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य नियोजन मंडऴ, मुंबई, जिल्हा नियोजन समिती, बीड (परभणी, उस्मानाबाद, लातूर इ.) महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, समाज प्रबोधन संस्था, पुणे, पुणे विद्यापीठ प्राध्यापक निवड समिती- पुणे.

      संपादक मंडळ -महाराष्ट्र शासन गॅझेटीअर्स डिव्हीजन, मुंबई, विद्यापरिषद,सोलापूर विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण लोकविकास प्रतिष्ठान लातूर, क्वालिटी अ‍ॅश्यूरन्स सेल- महाराष्ट्र शासन- मुंबई, मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम मसुदा समिती, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद- पुणे, महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण परिषद, मुंबई, सल्लागार समिती-राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण केंद्रशासन, नवी दिल्ली, प्रदेश उपाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुंबई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ( विभागीय केंद्र , लातूर) या संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.

      सन १९७०-१९९४ या २५ वर्षांच्या कालावधीमध्ये कुष्ठरोगी,अंध, अपंगांसाठी लातूर येथे सेवा दिली. जाती निर्मूलन, राष्ट्रीय प्रौढ शिक्षण, हमाल पंचायतीची स्थापना व कार्य ( १९८१) यामध्ये सक्रिय सहभाग आहे. १९९३ मध्ये किल्लारी येथे भूकंप झाला. या आपत्तीला तोंड देण्यासाठी सुसज्ज यंत्रणा असायला हवी हे लक्षात घेऊन किल्लारी येथे भूकंपशास्त्र अभ्यास संशोधन केंद्राची स्थापना केली. भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कार्यासोबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातुर येथील भूकंपग्रस्त ग्रामपुनर्रचना प्रकल्पाचे कार्याध्यक्ष म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी केली. भूकंपग्रस्त भागात चलबुर्गा (ता. औसा) येथे जातीपातींना मूठमाती देणाऱ्या ८० घरांच्या राष्ट्रीय सेवाग्राम या अभिनव गावाची राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निर्मिती  (२००१ मध्ये) केली.

     सेवानिवृत्तीनंतर बहुमताने ते लातूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष झाले. फिरता दवाखाना शहरातील वस्तीमधील गरिबांसाठी सुरु केला, पाणी पुरवठा जलपुनर्भरण योजना, एक खिडकी योजना, नाना - नानी पार्क, लातूर व्हिजन २०२५ यथार्थदर्शी विकास आराखडा इ. अनेक शहराच्या व शहरातील अतिशय शेवटच्या माणसांच्या सेवासुविधांचा विचार करुन योजना राबविण्यात आल्या. अशा या वैशिष्टपूर्ण विविधांगी कार्याचा गौरव म्हणून डॉ. जे. एम. वाघमारे यांना विविध संस्था, व शासनाकडून विविध पुरस्कार व पारितोषिके  प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार(१९९०) महाराष्ट्र शासन, डॉ. आंबेडकर विशेष सेवा पुरस्कार (१९९४) नवी दिल्ली, मराठवाडा गौरव पुरस्कार(२००१), महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार (१९९६), शास्त्री सेवा पुरस्कार, नवी दिल्ली (२००३), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२००५) इ. व अनेक पुरस्कारांनी ते सन्मानीत झाले आहेत. 

   - प्रा. निलिमा साठे - शिंदे 

वाघमारे, जनार्दन माधव