Skip to main content
x

जोशी, वसंत कृष्ण

         संत कृष्ण तथा व.कृ. जोशींचा जन्म अलिबागमध्ये झाला. त्या काळात, इंग्रजांच्या जमान्यात त्यांच्या वडिलांनी उपजिल्हाधिकारी हे पद भूषवले. व.कृं.ना तीन भाऊ आणि तीन बहिणी. व.कृ. अगदी लहान असताना त्यांच्या आईचे छत्र हरपले. मोठ्या भावाच्या पत्नीने त्यांना मातेचे प्रेम दिले. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते विद्यार्थी. त्यांनी वक्तृत्वस्पर्धा, राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा जिंकल्या. उंचेपुरे, गोरेपान, बळकट शरीरयष्टी, धारदार नाक या त्यांच्या प्रसन्न आणि सतत हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे ते सर्वांना आवडायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे वर्गमित्र त्यांना युरोपियनम्हणायचे. पुढे मुंबई विश्वविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात त्यांनी बी.एस्सी.ची पदवी संपादन करून पोलीस सेवेत प्रवेश केला. सेवेत असतानाच त्यांनी कायद्याची पदवी घेतली.

तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि पोलीस सेवा म्हणजे तारेवरची कसरतच होती. त्या वेळी मुंबई राज्यात गुजरात आणि कर्नाटक यांचाही समावेश होता. त्यांना या तिन्ही भाषाभागांत काम करण्याचा अनुभव मिळाला. केंद्रीय डिक्टेटर ट्रेनिंग स्कूल, कोलकाता येथे त्यांनी अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. विज्ञानाच्या साहाय्याने गुन्ह्याचा तपास कसा करावा या तंत्राचा तेथे त्यांनी अभ्यास केला. भारतातील सर्व भागांतून तेथे प्रशिक्षणासाठी अधिकारी येत. त्यांच्यासह चर्चा, विचारविनिमय, संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या गुन्हेगारी घटना, त्यांचे तपासकामातील अनुभव, हा सर्व मौल्यवान खजिना त्यांच्या हाती आला.

अगदी लहानपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार, घरातील वातावरण, त्यांचे पोलीस खात्यातील अनुभव, या सर्व शिदोरीचा त्यांनी आपल्या लेखनात मोठ्या कौशल्याने उपयोग केला. त्यांचे लेखन केवळ पोलीस तपासकथा न राहता त्या अध्यात्म, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान यांनी परिपूर्ण असत.

व.कृ. जोशींच्या इन्स्पेक्टर प्रधानया व्यक्तिरेखेने वाचकांना भुरळ घातली होती. त्यांच्या लेखनकालाच्या सुमारास पोलीस तपास कथा लिहिणारे अनेक लेखक होते. ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केस माहीत करून घेत व त्यावर काल्पनिक साज चढवत. घटनांची जंत्रीच वाचकांसमोर मांडत. पण व.कृ. जोशींच्या लेखनाचे वैशिष्ट्य हे, की ते अशा लेखनाच्यापलीकडे जाऊन, गुन्हेगार आणि त्यांचे निकटवर्तीय यांचे मनोव्यापार लक्षात घेऊन घटनेच्या मुळापर्यंत पोहोचत. घडलेल्या घटनेकडे फक्त पुरावा शोधण्यासाठी न पाहता गुन्हेगाराच्या सर्व शक्यता पडताळून पाहत अन् संशयित गुन्हेगाराच्या जाबजबाबातून तोच खरा गुन्हेगार आहे का आणि कोणी, हे शोधून काढत. त्यांच्या तपासकामाचे जसे वैशिष्ट्य होते, तसेच लेखनाचेही वैशिष्ट्य होते.

जे. कृष्णमूर्तींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळेच पोलीस तपास करताना सापडलेले सत्य समाजासमोर यायला हवे, असे त्यांना वाटे. या अंत:प्रेरणेतूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली.

पोलीस अधिकारी असूनही, सतत गुन्हे अन् गुन्हेगारांशी संबंध येत असूनही त्या व्यवसायामुळे येणारी आढ्यता, तुच्छता व मग्रूरी यांपासून ते कोसो दूर होते. प्रत्येक व्यक्तीशी सहृदयतेने, संवेदनशीलतेने अन् हळुवारपणे बोलून त्यांची मने जिंकण्याचे कसब त्यांच्यापाशी होते. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पाहावयास मिळते. व.कृ. जोशींनी सत्यघटनांवर, शास्त्रीय तपासकामाच्या तंत्रावर आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनातल्या अनुभवांवर अनेक कथा लिहिल्या. त्यांचे ३३ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. गुन्हाकबूल’, ‘पाठलाग’, ‘सतीचं वाण’, ‘विज्ञान पोलीसकथाहे त्यांपैकी काही. महाराष्ट्रात आणि अन्य राज्यांत त्यांची अनेक व्याख्याने व कथाकथने झाली आहेत. त्यांच्या कथांच्या ध्वनिफिती आणि कथांवर आधारित दूरदर्शन मालिका प्रदर्शित झाल्या. हॅलो, मी इन्स्पेक्टर प्रधान बोलतोयया कथासंग्रहावरची दूरदर्शन मालिकाही गाजली. विज्ञानावर आधारित शास्त्रीय तपासकामांवरील त्यांचे अभ्यासक्रम पुस्तक प्रकाशित झाले आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या शिक्षणक्रमात त्याचा समावेश झाला आहे.

खरे म्हणजे त्यांनी लिहिलेली प्रत्येक कथा, लेख भारतातील सर्व पोलीस खात्यांनी आणि गुन्हेगारी विश्वाला मार्गावर आणू इच्छिणाऱ्या सर्व सरकारी खात्यांनी संदर्भम्हणून वापरायला हवी. कारण व.कृं.नी ते निश्चित विचारांनी, ध्येयाने लिहिले आहे. म्हणूनच व.कृ. जोशी हे नाव प्रत्येक मराठी साहित्यप्रेमी रसिकाच्या मनात कायम राहील. वकृंना प्राप्त झालेले महत्त्वाचे पुरस्कार: १९७४ मध्ये राष्ट्रपती पोलीस सेवा पदक (अतुलनीय स्तुत्य सेवेसाठी), ‘गुन्ह्याचा तपास आणि विज्ञानया पुस्तकाकरिता त्यांना महाराष्ट्र राज्य विज्ञान पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतरही त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी केली महत्त्वाची कामे पोलीस सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते, तसेच पोलीस कोठडीत होणाऱ्या कैद्यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या समितीचेही ते सदस्य होते.

पोलीस सेवेत असताना त्यांनी जनसंपर्क अधिकारी, ‘दक्षतामासिकाचे संस्थापक, संपादक, महासंचालक तसेच अतिरिक्त पोलीस व ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विश्वस्त म्हणूनही काम केले.

मातब्बर वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी त्यांच्या साहित्याला कायमच प्रसिद्धी दिली. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत होता. त्याच वेळी महाराष्ट्र राज्य सरकारने जनता आणि पोलीस यांच्यामध्ये सहकाराचा दुवा निर्माण व्हावा यासाठी  एका मासिकाची  निर्मिती करण्याची योजना आखली. त्यासाठी जनसंपर्क अधिकारी आणि संपादक म्हणून व.कृं.जोशीची निवड करण्यात आली. दक्षतामासिकाची सुरुवात करताना व.कृं.ना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या मासिकासाठी सरकारने निधी मंजूर केला नव्हता. तेव्हा पोलीस कल्याण निधीतून त्यांनी ३०,०००/- रुपयांचे कर्ज घेतले. मासिक सुरू झाले. छपाई, सजावट, व.कृं.चे स्वत:चे व त्यांनी निवडलेले उत्तम साहित्य, त्यांचे व्यवस्थापकीय कौशल्य, जाहिरात व विक्रीसाठी आवश्यक असलेला जनसंपर्क, सौजन्य यांमुळे दक्षताअल्पावधीतच वाचकप्रिय झाले. त्यांनी घेतलेले कर्ज एका वर्षातच परत फेडले. मराठी मासिकाच्या इतिहासात हे नोंद करण्यासारखेच आहे. 

प्रामाणिक आणि कायद्याच्या मार्गाने जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जे जे सहन करावे लागते त्याला ते सामोरे गेलेच, परंतु या सर्वांपेक्षा त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात, डोके सुन्न करणारा होता.

व.कृं.चा मुलगा सुहास, वय वर्षे पंचवीस भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर होता. १९७० मध्ये सुहासचे अपघाती निधन झाले. यातून त्यांनी स्वत:ला सावरले आणि आपला वेळ लेखनात व सामाजिक कार्यात गुंतवला. मुलाच्या निधनानंतर त्यांना सरकारतर्फे जमीन व अन्य सुविधा मिळत होत्या पण त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. 

२० सप्टेंबर २००४ रोजी व.कृं.जोशींचे निधन झाले आणि इन्स्पेक्क्टर प्रधानांच्या रूपाने, कायम अन्यायाविरुद्ध लढणारी लेखणी शांत झाली.

- राजेंद्र कुलकर्णी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].