काकफळे, पांडुरंग आनंद
पांडुरंग आनंद काकफळे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सोमेगाव येथे झाला. दि. २० जानेवारी १९६९ पासून ते भूसेनेतील आठव्या महार रेजिमेंटमध्ये सेवेस रुजू झाले. हवालदार पांडुरंग काकफळे यांची श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. दि. १२ ऑक्टोबर १९८७ रोजी मारूथ्नामॅडम शहर जिंकण्यासाठी हल्ला करणाऱ्या कंपनीमध्ये ते सेक्शन कमांडर होते. या कंपनीला जोरदार प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. यात हवालदार काकफळे गंभीररित्या जखमी झाले. स्वतःच्या जखमांची पर्वा न करता ते आपल्या तुकडीचे नेतृत्व करीत राहिले. त्यांनी स्वतः शत्रूचा मशिनगन असणारा बंकर उध्वस्त केला.
त्या वेळी झालेल्या लढाईत त्यांना शत्रूच्या गोळ्याचा आघात झाला व त्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. हवालदार काकफळे यांनी अद्वितीय धाडस व निष्ठा यांचे प्रदर्शन घडवीत सर्वोच्च बलिदान दिले. या काम्गीरीबद्दल त्यांना मरणोत्तर ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-संपादित