Skip to main content
x

काळे, प्रभाकर बाळकृष्ण

            डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उद्यानविद्या विभागाने जे मिरचीचे सुरक्ता आणि जयंती हे वाण, दसरा-दिवाळी हे वालाचे वाण शोधले त्यांचे संशोधन व निवडकार्य करण्यात प्रभाकर बाळकृष्ण काळे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी शोधलेले वाण शेतकऱ्यांच्या हिताचे ठरले.

            प्रभाकर बाळकृष्ण काळे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे  झाला. त्यांनी बी.एस्सी. (कृषी) १९६३मध्ये कृषी महाविद्यालय, नागपूर येथून, तर एम.एस्सी. (उद्यानविद्या) कृषी महाविद्यालय, पुणे येथून १९६६मध्ये प्राप्त केली. त्यांनी पुसा संस्था, नवी दिल्ली येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली व त्यानंतर वनीकरण या विषयात १९८६मध्ये इडाहो विद्यापीठ (यूएसए) येथून पोस्ट डॉक्टरेट प्रशिक्षण प्राप्त केले.

            डॉ. काळे यांनी प्रात्यक्षिक साहाय्यक (डेमॉन्स्ट्रेटर) म्हणून जुलै १९६५मध्ये पुणे येथून नोकरीची सुरुवात केली. त्यानंतर १९६६ ते १९७० या काळात ते कृषी महाविद्यालयात कोल्हापूरला व्याख्याता म्हणून कार्यरत होते. पुढे अकोला येथे डॉ. पं.दे.कृ.वि.त उद्यानविद्या विभागात १९८३पर्यंत साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी १३ वर्षे सेवा केली आणि १९८३ ते १९९३ या काळात प्रपाठक (रीडर) म्हणून कार्य करून ते सेवानिवृत्त झाले. या काळात त्यांनी मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्य केले. १९८९मध्ये त्यांनी ‘सुरक्ता’ मिरची हा वाण चिखली या स्थानिक वाणापासून निवडला. या ताज्या (लाल) मिरचीचे उत्पादन ४७ ते ४८ क्विंटल प्रति हेक्टर येते. त्यानंतर त्यांनी ‘जयंती’ हा मिरचीचा वाण शोधला. हाही वाण शेतकर्‍यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला. तसेच १९८५मध्ये ‘गुलाबी डोरला’ या स्थानिक जातीतून ‘अरुणा’ हा वांग्याचा वाण त्यांनी शोधला. या वांगी वाणाचे उत्पादन खरीप हंगामात ३०० ते ४०० क्विंटल/प्रति हेक्टर येते व ९५ दिवस पिकाचा कालावधी असतो. दसरा (डी बी १८) व दिवाळी (डी बी १) हे २ वालाचे वाण त्यांनी शोधले व १९८५मध्ये त्यांची शिफारस करण्यात आली. दसरा वाण हा  ११५-१२५ दिवसांत येणारा असून त्याचे उत्पादन १४० ते २१० क्विंटल प्रति हेक्टर येते. दिवाळी हा वाण १५०-१५५ दिवसांत येऊन त्याचे उत्पन्न १५०-२३० क्विंटल मिळते.

            डॉ. काळे यांनी १९२५मध्ये ‘स्थानिक पांढरा कांदा’ म्हणून एक वाण निवडला व त्याची पूर्वप्रसारित शिफारस केली. पुढे तो वाण प्रसारित झाला. याशिवाय कन्हान २२ व काटेपूर्णा ४ हे खरबुजाचे वाण शोधण्यातही ते यशस्वी झाले व त्याची १९८७मध्ये पूर्वप्रसारित शिफारस केली गेली. त्यांना उत्कृष्ट संशोधनाबद्दल १९८५मध्ये डॉ. के.जी. जोशी रोख पुरस्कार मिळाला, तसेच १९८४-१९८५मध्ये कांद्याच्या व्यापारी लागवडीच्या अखिल भारतीय स्पर्धेत त्यांना रोख दहा हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काळे यांचे १२० शोधनिबंध, ६६ लेख, ३१ रिव्ह्यू पेपर्स, ८ मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘ भाजीपाल्यावर राज्यस्तरीय हिवाळी प्रशिक्षणा’ चे संचालक म्हणून त्यांनी कार्य केले. ते इंडियन सोसायटी फॉर व्हेजिटेबलचे आजीव सभासद आहेत. त्यांना १९९५ ते १९९९ बढती मिळून ते प्राध्यापक (वर्ग १) या पदावर अकोल्यातील उद्यानविद्या महाविद्यालयात रुजू झाले. या महाविद्यालयात प्रमुख किंवा प्रभारी म्हणूनही त्यांनी कार्य केले.

            - डॉ.  प्रकाश पुंडलिक देशमुख

काळे, प्रभाकर बाळकृष्ण