Skip to main content
x

केळकर, नीलकंठ महादेव

चित्रकार, कलासमीक्षक 

नीलकंठ महादेव केळकर यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वती होते. या दाम्पत्याला पाच अपत्ये होती. नीलकंठ सर्वांत थोरले होते. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. ते महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्गसन व एस.पी. महाविद्यालयात विज्ञान शाखेत घेत होते; पण ते सोडून मुंबईत झेवियर्स महाविद्यालयात कलाशाखेत प्रवेश घेऊन ते बी.ए. झाले. नंतर सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथेही त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले व १९३१ मध्ये ‘जी.डी.आर्ट’ ही पदविका प्राप्त केली.

त्यांचा द्वितीय विवाह ११ डिसेंबर १९३३ रोजी विमल रामचंद्र ढवळे यांच्याशी झाला. व्यक्तिचित्रण- कलेत त्यांना रस होता व त्यामुळे त्यांनी स्वानंदासाठी व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारची चित्रनिर्मिती केल्याचे आढळते. खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या वडीलबंधूंचे १९३० मधील चित्र व माय-लेक हे त्यांच्या पत्नी व मुलीचे चित्र बघताना केळकर यांचे जोमदार व आत्मविश्‍वासपूर्ण रंगलेपन आणि यथार्थदर्शनावरील प्रभुत्वाचा प्रत्यय येतो. माय-लेक या चित्रात आईच्या पाठुंगळी लाडाने बसलेली लेक हा विषय असून त्यातील भावदर्शन विलोभनीय आहे. (हे चित्र इ.स. २००० च्या ‘मौज’च्या दिवाळी अंकावर प्रसिद्ध झाले.)

त्या काळात व्यक्तिचित्रण हे एक द्रव्यार्जन किंवा उपजीविका करण्याचे महत्त्वाचे साधन होते. व्यक्तीचे साम्य म्हणजेच व्यक्तिचित्र एवढीच तत्कालीन बहुसंख्य लोकांची समजूत होती. जोपर्यंत संस्थाने होती, तोपर्यंत त्यांच्यासाठी काम करणार्‍या चित्रकारांना पुरेसे पैसे मिळत असत. केळकर यांना ग्वाल्हेरच्या महाराजांनी व्यक्तिचित्रणासाठी आमंत्रित केले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी काढलेली लोकमान्य टिळक व न.चिं. केळकर यांची व्यक्तिचित्रे पुण्याच्या शिवाजी मंदिरात आहेत. त्यांनी काढलेले लोकमान्यांचे अग्रलेख लिहितानाचे चित्र पुण्याच्या केसरी कार्यालयात  आहे.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे चित्र दिल्ली येथील संसदभवन येथे आहे, तर लोकसभागृहातील एका दालनात १४×१० फुटांचे २६ जानेवारीच्या संचलनाचे चित्र आहे. यात डॉ. राजेंद्रप्रसाद सलामी देत आहेत असा प्रसंग आहे. सोबत काही मान्यवर मंडळी आहेत. यांतील काहींची चित्रे पुसून टाकून तेथे आपला चेहरा रंगविण्यासाठी त्यांच्यावर काही मंडळींनी बराच दबाव आणला होता. अर्थात  केळकरांनी त्यास नकार दिला. परिणामी त्यांचे मानधन रखडले होते. त्यांची चित्रे बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, म्हैसूर दसरा एक्झिबिशन, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन अशा भारतभर भरणार्‍या अनेक प्रदर्शनांतून प्रदर्शित झाली व त्यांतील काही चित्रांना पदके व पारितोषिकेही मिळाली.

 नी.म. केळकर हे व्यवसायाने व्यक्तिचित्रकार होते; परंतु त्यांनी व्यक्तिचित्रणासोबतच कलाविषयक, चरित्रात्मक, समीक्षात्मक व विश्‍लेषणात्मक विपुल लेखन केले. यात चित्रकलेसोबतच संगीत व ललित लेखनाचाही समावेश आहे. त्यामुळे ते चित्रकार म्हणून प्रसिद्ध असण्यापेक्षा लेखक म्हणून अधिक परिचित होते.

केळकर यांचे हिंदी, इंग्रजी, मराठी भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. त्यांना संस्कृत भाषाही अवगत होती. त्यांचा गणित विषय उत्तम होता. आवाज चांगला होता. पेटी, व्हायोलिन अशी  वाद्ये ते वाजवीत असत. बालगंधर्व नाटक मंडळी पुण्याच्या मुक्कामात केळकरांच्या वाड्यात उतरत असे. त्या वेळी मोठमोठ्या संगीतकारांच्या भेटी घडत. त्यातून ते संगीतविषयक लेखनाकडे वळले. त्यांनी लिहिलेले बखलेबुवांचे चरित्र संदर्भासाठी आणि संगीताच्या अभ्यासासाठी आवर्जून पाहिले जाते. त्यांची सवाई गंधर्व, ज्ञानकोशकार केतकर व लेखक ह.ना. आपटे यांची चरित्रे प्रकाशित झाली असून यांतील काही पुस्तके महाविद्यालयांच्या व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांस लावली गेली होती.

चित्रकलेचा प्रसार करणारे, तिची उद्दिष्टे, मर्म सांगणारे, विश्‍लेषण करणारे, तसेच कलेच्या इतिहासाची, कलाकारांची ओळख करून देणारे अनेक अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहिले, तसेच अन्य विषयांवरील लेखनही केले. कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची वृत्ती होती. आवश्यक असल्यास ते संस्कृत वाङ्मयाचा संदर्भ घेत. काही वेळा त्यासाठी ते संस्कृत पंडितांचीही  मदत घेत. युरोपियन कलेवरचे त्यांचे लेखन ‘प्रतिभा’ मासिकाच्या फेबु्रवारी, मार्च, एप्रिल १९३६ च्या अंकांत प्रसिद्ध झाले. त्यांनी शिल्पकार करमरकरांबाबतचे ‘चरित्र व कला’ आणि ‘चित्ररचनेची मूलतत्त्वे’ यासारखे विश्‍ले- षणात्मक लेखन केले. हे व अन्य लेख ‘यशवंत’ मासिकात १९३७-३८ मध्ये प्रसिद्ध झाले होते. याशिवाय ‘सह्याद्री’, ‘वसंत’ या मासिकांतूनही ते सातत्याने लेखन करीत.

‘कला-चित्र आणि शिल्प’ हा लेख ‘महाराष्ट्र जीवनः परंपरा, प्रगती आणि समस्या’; खंड दुसरा (१९६०) या ग्रंथात प्रसिद्ध झाला. यात प्राचीन व अर्वाचीन महाराष्ट्रातील चित्र-शिल्पकलेचा आढावा घेतला आहे. प्राचीन-अर्वाचीन महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा स्पष्ट करून येथील द्रविड-आर्य सांस्कृतिक संगमापासून ब्रिटिश राजवटीपर्यंतच्या स्थित्यंतराचे त्यात संदर्भ आहेत.

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टला १९५७ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली, त्या वेळी ‘स्टोरी ऑफ सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ हे इंग्रजी पुस्तक निर्मिण्यात त्यांचे मोठेच योगदान होते. आपल्याकडे चित्रकलेवरचे लेखन आजही फारसे नाही. मराठीत तर त्याचे प्रमाण आणखीनच कमी आहे. तरीही त्या काळात केळकर यांनी अभ्यासपूर्वक व सातत्याने लेखन केल्याचे आढळते. त्या काळात त्यासाठी त्यांना फारशी साधनसामग्री, पुरेसे संदर्भ साहित्य उपलब्ध नसे. कलाकारांची माहिती मिळविणे अत्यंत जिकिरीचे असे. ती माहिती मिळविणे शक्य असलेल्या इंग्रजी पुस्तकांचा संदर्भ घेऊन ह्या पूर्वसुरींनी केलेले कलेचे लेखन, ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहे.

- साधना बहुळकर

संदर्भः १. नी.म. केळकर यांचे लेख.

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].