केळकर, उत्तरा विश्राम
उत्तरा विश्राम केळकर यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांनी मुंबईच्या ग्रँट रोड येथील ‘सेंट कोलंबा’ या शाळेत शालेय शिक्षण, तर ‘विल्सन महाविद्यालया’मधून उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठामधून अर्थशास्त्र या विषयात पदवी (बी.ए.) आणि शास्त्रीय संगीतामध्ये पदविका संपादन केली. उत्तरा केळकरांच्या आई शकुंतला फडके या वामनराव सडोलीकर यांच्याकडे गायन शिकत असत. त्यामुळे बालपणापासून आईच्या गायकीचे सूर उत्तराताईंच्या कानी पडू लागले. नकळत्या वयातच सुरांची ओढ आणि समज येत गेली. मग शिक्षणासोबतच संगीताचा प्रवासही सुरू झाला.
पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे त्यांनी जवळपास पंचवीस वर्षे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. संगीतकार यशवंत देव यांच्याकडून सुगम संगीत, तर संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडून त्यांनी गीत, गझल आणि भजन या प्रकारांचे धडे घेतले. लहानपणापासूनच नानाविध गायन स्पर्धांमधून त्यांनी आपल्या गायकीची छाप रसिकांच्या मनावर उमटविली. ऑल इंडिया रेडिओवरील शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत या तीनही गानप्रकारांमध्ये त्यांनी प्रथम स्थान पटकावले. विशेष म्हणजे, डिसेंबर २०१० मध्ये याच स्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणून कार्यभारही सांभाळला.
एकाहत्तर साली ‘हयवदन’ या नाटकासाठी गायलेल्या गाण्याने उत्तराताईंची पार्श्वगायिका अशी ओळख बनली. उत्तरा केळकरांना १९७६ च्या सुमारास आलेल्या ‘भूमिका’ या हिंदी चित्रपटात शुद्ध कल्याण रागातील चीज गाण्याची संधी मिळाली. या छोट्या, पण महत्त्वाच्या संधीचे केळकरांनी सोने केले आणि त्या पाठोपाठ स्वतंत्र गाण्यांसाठी त्यांचे नाव नेहमी पुढे राहिले. केळकरांनी हिंदी, मराठी, गुजराती अशा जवळपास दहा ते बारा भाषांमध्ये चारशेहून अधिक चित्रपटगीते गायली आहेत.
दूरदर्शनवर कवयित्री बहिणाबाई यांच्या जीवनावर आधारित एक लघुपट प्रदर्शित झाला. या लघुपटातील बहिणाबाईंच्या अहिराणी भाषेतील ओव्या आणि गीते केळकरांच्या गायकीने लोकप्रिय झाली. यातील गीतांची ध्वनिफीत काढण्यात आली. या ध्वनिफितीनेदेखील भरघोस यश संपादन केले. केळकरांनी पाचशेहून अधिक ध्वनिफितींसाठी गाणी गायली आहेत.
जाहिरात क्षेत्रातदेखील कुबल मसाला, उज्ज्वला सुफला खत, रवी पंखे, अमृत मलम अशा अनेक जाहिरातींची गीते त्यांनी गायली. आवाजातील गोडवा आणि तोलून-मापून सहज उमटणारे हृदयस्पर्शी सूर यांमुळे केळकरांना चहात्यांचा एक मोठा वर्ग मिळाला. त्यांच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम देशातील आणि परदेशांतील रसिकांनीदेखील उचलून धरले.
उत्तरा केळकरांनी ‘सलाम आशा’ हा आशाजींच्या हिंदी गाण्यांवर आधारित कार्यक्रम रसिकांपुढे आणला. या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग झाले.
‘सुरसिंगार’ या चित्रपटातील शास्त्रीय गायनासाठी त्यांना ‘मियां तानसेन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले. त्यांना २०१० साली ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ साली त्यांना ‘राम कदम पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
- अमोल ठाकूरदास / आर्या जोशी