Skip to main content
x

केरकर, केसरबाई

केसरबाई केरकर यांचा जन्म गोव्यातील केरी फोंडा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. त्यांच्या घरातच संगीताची परंपरा होती. गोव्यात जत्रेच्या दिवसांत होणार्‍या गवळणकाला व नाटकांतून केसरबाई श्रीकृष्णाची भूमिका करीत. वयाच्या आठव्या वर्षी कोल्हापूर येथे अब्दुल करीम खाँ यांनी त्यांना दहा महिने शिकवले. त्यानंतर त्यांना वझेबुवांची तालीम तीन ते चार वर्षे मिळाली. त्या १९०९ साली मुंबईत राहण्यास आल्या. बर्कतुल्ला खाँची तालीम त्यांना खंडितच स्वरूपात १९१५ पर्यंत मिळाली. मध्यंतरात १९१२ मध्ये अल्लादिया खाँचा मुक्काम मुंबईत आठ महिने असताना त्यांना त्यांचीही तीन महिने तालीम मिळाली. तसेच, त्यांना भास्करबुवा बखल्यांचीही सुमारे ४-५ महिने तालीम मिळाली. जवळजवळ १९१७ पर्यंत त्यांचे शिक्षण नियमित न होता काहीसे खंडित स्वरूपाचे झाले. त्यांनी हिरालाल यांच्याकडून कथक नृत्याची तालीम घेतली होती. त्या मझले खाँ यांच्याकडून अदाकारी व ठुमर्‍याही शिकल्या.

केसरबाईंच्या जीवनाला वळण देणारी मुंबईतील घटना म्हणजे भास्करबुवांच्या पट्टशिष्या ताराबाई शिरोडकर यांच्याबरोबर एकाच मैफलीत गाण्याचा प्रसंग होय. केसरबाईंचे गायन ताराबाईंच्या आधी झाले होते, पण त्यात रंग भरला गेला नव्हता. त्यामुळे आपल्या गायनाला सुरुवात करण्याअगोदर, ‘‘आधी इथली बेसुरी हवा निघून जाऊ दे,’’ असे बोल ताराबाईंनी सुनावले. ते जिव्हारी लागल्यामुळे ज्याला हिंदुस्थानात तोड नाही अशा गुरूकडून तालीम घेण्याचा केसरबाईंनी निर्धार केला. गानसम्राट अल्लादिया खाँ हे या दृष्टीने योग्य नाव होते. पण खाँसाहेबांनी आधी केसरबाईंना १९१२ मध्ये मुंबईत असताना चार महिने शिकवून पाहिले होते व त्यांना ही विद्या पेलवणार नाही असे त्यांनी ठरवून टाकले होते. परंतु शेठ विठ्ठलदास द्वारकादास यांनी खाँसाहेबांचे मन वळवले, तसेच कोल्हापूर दरबारातून खाँसाहेबांना मुंबईला पाठविण्याचीही शाहू महाराजांना गळ घातली. पण खाँसाहेबांनी अतिशय कडक अटी समोर ठेवल्या : केसरबाईने किमान दहा वर्षे शिक्षण घेतले पाहिजे, या काळात आपण सांगू तसा आणि सांगू तितका वेळ रियाझ केला पाहिजे व बाहेर कोठेही मैफल करू नये. खाँसाहेब जर बाहेरगावी गेले तर केसरबाईने तेथे स्वखर्चाने येऊन तालीम सुरू ठेवली पाहिजे. ध्येयप्राप्तीकरिता केसरबाईंनी या सर्व अटी मान्य केल्या व १ जानेवारी १९२१ रोजी खाँसाहेबांकडून त्यांचे रीतसर गंडाबंधन झाले व त्यांच्या संगीत जीवनातील दुसरे पर्व सुरू झाले.

या दहा वर्षांच्या तालमीत केसरबाईंच्या गाण्याने जुनी कात टाकून नवे रूप धारण केले. केसरबाई १९३० नंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या एक प्रथितयश गायिका म्हणून मानल्या गेल्या. भारतभरातील विविध संगीत परिषदांमधून त्यांचे गायन होई. एक मानी व मोठी बिदागी घेणार्‍या करारी गायिका म्हणून त्यांचा दरारा होता. त्यांच्या गायकीची पुढील वैशिष्ट्ये सांगता  येतील : अतिशय चुस्त, लांब-रुंद असा स्थाई अंतरा भरणे, त्यानंतर विलंबितही संथ, दीर्घ आलापांनी भरणे, चिजेचा मुखडा गाठताना शेवटच्या स्वरावलीत आमदचा हटकून प्रयोग करणे. खाँसाहेबांचा हा खास गुण केसरबाईंनी बहुतांशी आत्मसात केला होता. या रीतीनुसार स्वत: केसरबाई विलंबित इतक्या भारदस्तपणे भरत, की आलाप चालू असताना अगदी किंचितसुद्धा हरकतीचा तुकडा घेत नसत. या घराण्याची तानकारी अतिशय आकर्षक असे. तान स्वच्छ व दाणेदार असे. त्यात निव्वळ जोरकसपणा नसून नादमाधुर्य होते. त्यांनी १९६६ मध्ये त्यांचे गाणे ऐन बहरात असतानाच संगीत संन्यास घेतला.

कलकत्त्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत केसरबाईंचा एप्रिल १९३८ मध्ये मोठा सत्कार झाला होता. त्यांना दिल्लीची सरकारी सनद मिळाली. त्यांना १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व महाराष्ट्र सरकारने ‘राजगायिका’ म्हणून त्यांचा गौरव केला. संगीत नाटक अकादमीने १९५३ मध्ये ‘प्रमुख आचार्य’ म्हणून त्यांना गौरविले. त्यांना १९४८ साली कलकत्ता येथील ‘संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन समाज समिती’ या संस्थेने  ‘सूरश्री’ हा किताब दिला व नेहमी याच पदवीने त्यांचा उल्लेख होई. कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर त्यांच्या गायनाचे चहाते होते.

एच.एम.व्ही.ने त्यांच्या ललित, बिभास, तोडी, मुलतानी, ललितागौरी, तिलककामोद, मारुबिहाग, मालकंस, परज इ. रागांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या, ज्या विलक्षण गाजल्या. तसेच, ‘ब्रॉडकास्ट लेबल’खाली त्यांच्या खंबावती, गौरी, काफी कानडा, देस या रागांच्या व काही ठुमर्‍यांच्याही ध्वनिमुद्रिका निघाल्या होत्या. ‘व्हॉएजर’ या अवकाशयानातून १९७७ साली केसरबाईंच्या भैरवी होरीतील ‘जात कहाँ हो’ या ठुमरीचे ध्वनिमुद्रण अवकाशात पाठविण्यात आले. एक भव्य गायकी सतत ३० वर्षे संगीत रसिकांना ऐकवून त्यांच्यासमोर केसरबाईंनी संगीताचा भव्य आदर्श उभा केला. त्यांचे मुंबईत निधन झाले.

धोंडूताई कुलकर्णी या त्यांच्या एकमेव शिष्या होत. त्यांच्या तेजस्वी गायकीची छाप अनेकांवर पडली होती. पं. गजाननबुवा जोशी, पं. भीमसेन जोशी यांच्यावरही त्यांचा प्रभाव होता.

— पं. बबनराव हळदणकर 

केरकर, केसरबाई