किर्लोस्कर, शंकर वासुदेव
‘शंवाकि’ या आद्याक्षरांनीच उभा महाराष्ट्र शंकर वासुदेव किर्लोस्कर यांना ओळखतो. व्यक्तिगत आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी उद्योजकता, स्त्री-विकास, शास्त्रीय दृष्टिकोन या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करीत समाजप्रबोधन करण्याचे ध्येय समोर ठेवून चालवलेल्या ‘किर्लोस्कर’ या युगप्रवर्तक मासिकाचे आद्य संपादक म्हणून केलेली त्यांची अतुलनीय कामगिरी तर सर्वमान्य आहेच; पण त्याच्या बरोबरीने मराठी व्यंगचित्रकलेचे जनक म्हणूनही त्यांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे.
शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म सोलापूर येथे झाला. ‘किर्लोस्कर खबर’ या नावाने १९१६ साली सुरू झालेल्या मासिकामध्ये १९२५ पासून शंवाकिंनी दर महिन्याला व्यंगचित्र काढायला सुरुवात केली, जवळजवळ तीस वर्षे अव्याहतपणे त्यांनी हे काम केले. याआधी ‘हिंदू पंच’ या ठाण्यामधून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रामधून १९०४ ते १९०८ या कालावधीत व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. ती या पत्राबरोबर १९०८ मध्ये बंद झाली. पण या व्यंगचित्रांचे चित्रकार एक होते की अधिक, त्यांची नावे काय, याबद्दल आज काही माहिती उपलब्ध नाही. शिवाय ती व्यंगचित्रेही सहज उपलब्ध नाहीत. या स्थितीत १९२५ पासून तीस वर्षे अखंड, निर्मिती करणार्या शंवाकिंना मराठीतील आद्य व्यंगचित्रकार मानणे उचित होईल.
व्यक्तिगत व त्यामधून समाजाची उन्नती कशी साधावी यासंबंधी प्रबोधन करणे हे ‘किर्लोस्कर’ मासिकाचे संपादकीय धोरण होते. उद्योग-उत्साह-उन्नती ही त्रिसूत्री मासिकाचे घोषणावाक्य होते.
आपले म्हणणे तत्काळ आणि बिनचूक पोहोचवण्यासाठी व्यंगचित्रांसारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही हे पाऊणशे वर्षांपूर्वीच शंवाकिंनी ओळखावे ही त्यांच्यामधील द्रष्टेपणाची साक्षच आहे. या दृढ विश्वासामधूनच त्यांनी इतर संपादकीय जबाबदारी पार पाडीत असताना व्यंगचित्रे रेखाटून प्रसिद्ध केली.
तीनशेहून अधिक अशा व्यंगचित्रांमधून शंवाकिंनी प्रबोधनपर भाष्य केले आहे. या चित्रांचे विषयानुसार ढोबळपणे तीन भागांत वर्गीकरण करता येईल.
१. व्यक्तिविकास : आत्मोन्नतीसाठी तरुणवर्गाने कोणते गुण अंगी बाणवले पाहिजेत हे सांगणारी; दारिद्य्रावर मात करण्यासाठी आळस टाकून अविरत कष्ट करण्याची तयारी व त्यासाठी सचोटी व अखंड प्रयत्न हवेत, मुख्य म्हणजे आत्मविश्वास हवा, असे ही चित्रे प्रतिपादन करतात.
२. समाजविकास : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काय हवे ते सांगणारी; गतानुगतिक, पुराण्या अंधश्रद्धेवर आधारित सनातन, कालबाह्य, कल्पना टाकून देऊन शास्त्रीय कसोटीवर उतरणारा बौद्धिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे; धार्मिक वेड, बुवाबाजी, दांभिकपणा यांची हकालपट्टी केली पाहिजे असे सांगणारी चित्रे त्यांनी काढली.
३. राजकीय : त्या काळी ब्रिटिश साम्राज्याखाली असलेल्या आपल्या देशात गुलामगिरी झिडकारून लावण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल दिशादर्शन करणारी, उदा. परदेशी मालाची लालसा सोडून स्वदेशीला उत्तेजन दिले पाहिजे; ब्रिटिशांच्या चिथावणीला दाद न देता आपसातील धार्मिक ऐक्य जपले पाहिजे, इ.इ. या प्रकारच्या व्यंगचित्रांमधून तत्कालीन घटनांवर, महायुद्ध चालू असतानाच्या घटनांवर, ब्रिटिश सरकार, काँग्रेस पक्ष, म. गांधी यांची धोरणे व वक्तव्ये आणि कृतींवर भाष्य करणारी व्यंगचित्रे येतात.
वर निर्देशिलेल्या पहिल्या दोन प्रकारांमधील निवडक व्यंगचित्रे, सोबत प्रा. ना.सी. फडके यांच्या लालित्यपूर्ण, सुगम शैलीतील प्रत्येक चित्रांवरील नेमक्या भाष्यासहित ‘टाकांच्या फेकी’ या शीर्षकाने संग्रहित स्वरूपात १९३४ मध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. याखेरीज शं.वा.कि. यांच्या जन्मशताब्दी वर्षात, १९९० साली त्यांच्यावरील तिन्ही प्रकारांतील निवडक व्यंगचित्रांचा संग्रह ‘शंवाकि : शब्द व रेषा’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
तरुण शं.वा.कि. यांची महत्त्वाकांक्षा चित्रकार बनण्याची होती. म्हणून मॅट्रिक झाल्यावर चित्रकलेच्या शास्त्रोक्त शिक्षणाचे धडे त्यांनी हैद्राबाद येथील रामकृष्ण वामन देऊसकर आणि पंडित सातवळेकर यांच्याकडून प्रथम हैद्राबाद व नंतर लाहोर येथे घेतले. त्यानंतर रीतसर शिक्षणासाठी मुंबईला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये असतानाच्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी परीक्षेत गुणवत्तेची बक्षिसे मिळवली. पुढील शिक्षणासाठी इटली, फ्रान्स येथे जाण्याचा मनसुबा मात्र आजारी पडलेल्या आईच्या इच्छेला मान देऊन त्यांनी सोडूून दिला व किर्लोस्करवाडीला ते कारखान्यात रुजू झाले. त्यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकाची संपादकीय जबाबदारी स्वीकारली. ‘शं.वा.कि.’ यांच्या रक्तातील चित्रकार अखेरपर्यंत सक्रिय राहिला व ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या त्यांच्या मासिकांसाठी मुखपृष्ठे, कथाचित्रे आणि जास्त करून व्यंगचित्रे यांमध्ये ते निवृत्त होईपर्यंत महत्त्वाचे योगदान देत राहिले.
श्री.ना. कुलकर्णी यांच्या ‘किर्लोस्कर’मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या व नंतर संग्रहित स्वरूपात पुस्तक म्हणून प्रकाशित झालेल्या ‘रेखाचित्रे’ या मालिकेला शंवाकि यांच्या प्रेरणेचा भक्कम आधार होता. शंवाकि यांची व्यंगचित्रे त्यांच्या भक्कम, शास्त्रोक्त रेखाटन शिक्षणाचा पाया प्रतिबिंबित करतात. चित्रांतील मानवी आकृत्यांमध्ये प्रमाणबद्धता, अॅनॉटॉमी या तपशिलाकडे तसेच पर्स्पेक्टिव्ह, कम्पोझिशन वगैरेंकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याचे स्पष्ट दिसते. व्यंगचित्रामध्ये बाह्यरेषांच्या उपयोगाने द्विमिती चित्रण न करता शेडिंगसाठी रेषा वापरून गोलाई व्यक्त करून त्रिमिती व्यक्त करण्याचा प्रयत्न आढळून येतो. व्यंगचित्र रेखाटण्यासाठी त्यांनी ब्रश न वापरता टाकाचाच उपयोग केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, व्यंगचित्रांचा एकूण हेतूच मुळी समजावून देण्याचा, समाजातील अनिष्ट, अधोगतीला नेणार्या प्रथा, वृत्ती, वागणुकी यांकडे अंगुलिनिर्देश करून त्या सुधारण्याचा, उपदेश करण्याचा असतो. त्यामुळे चित्रांमधून टिंगल, टवाळी, झोंबणारा आक्रमक उपहास क्वचितच आढळतो. चित्रणामध्ये विरूपीकरण तर जवळजवळ नाहीच. त्यामुळे ही व्यंगचित्रे अधिक करून एखाद्या कथेतील प्रसंगचित्रे वाटतात.
शंवाकिंनी ‘किर्लोस्कर’ मासिकासाठी गंभीर, कौटुंबिक, तसेच विनोदी कथांसाठीही चित्रे काढली. यांमधील लक्षात राहण्यासारखे काम म्हणजे ना.धों. ताम्हणकरांच्या ‘दाजी’ या कथामालेसाठी काढलेली कौटुंबिक विनोदी कथाचित्रे आणि मुख्यत: ‘दाजी’ या काल्पनिक व्यक्तिचित्राला दिलेले दृश्य स्वरूप होय.
नंतरच्या काळात, १९६२/६४ नंतर, शं.वा.किं.नी काही वर्षे निखळ, विनोदी व्यंगचित्रे (हास्यचित्रे) सुद्धा रेखाटली. पांढरपेशा कुटुंबातील सभ्य, रोमँटिक, सोज्ज्वळ, निरुपद्रवी, सुसंस्कृत, माफक खट्याळ अशा कल्पनांवर आधारलेल्या त्यांच्या हास्यचित्रांचा संग्रह ‘लग्नमंडपातील विनोद’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
त्यांनी १९६५ नंतर चित्रे रेखाटणे थांबवले असे दिसते. पाऊणशे वर्षांपूर्वीची सामाजिक स्थिती, चालीरीती, पोशाख, त्याचप्रमाणे त्या वेळचे प्रश्न यांचे ‘शंवाकि’ यांच्या चित्रांमधून प्रतिबिंबित झालेले चित्रण जसे उद्बोधक व आजच्या घडीला मनोरंजक वाटते, तसेच समाजसुधारणेबाबतची ‘शं.वा.किं.’ची तळमळ हृद्य वाटल्याखेरीज राहत नाही.