Skip to main content
x

किर्लोस्कर, शंतनू लक्ष्मण

     शंतनु लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म सोलापूरला झाला. शालेय शिक्षण औंध येथे झाले आणि पुण्यात झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी १९२७ साली प्राप्त केली.

     पारतंत्र्याच्या काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून यंत्रनिर्मिती करण्याचे धाडस करणारा उद्योगसमूह म्हणूनच ‘किर्लोस्कर उद्योग समूहा’ची ओळख करून द्यायला हवी. ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ ही भारतातील पहिली कंपनी, की ज्यांनी स्वत:चेच गुणवत्ता मापदंड निश्चित करून ‘चारा कापण्याचे यंत्र’ आणि ‘लोखंडी नांगर’ अशी दोन अवजारे बाजारात आणली. विशेष म्हणजे, त्या काळी अशाच प्रकारच्या ब्रिटिश अवजारांशी स्पर्धा करून ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’चे नाव सातासमुद्रापलीकडे प्रसिद्धी पावले. भारतात जणू स्वदेशी यंत्रयुगाला सुरुवात झाली. शेंगदाण्याची टरफले काढणारे यंत्र, उसाचा रस काढणारे यंत्र, पाणी उपसण्याचा पंप, अशा हातयंत्रांची निर्मिती करून नव्या अर्थव्यवस्थेच्या भारतीय उद्योगजगतात किर्लोस्कर कंपनीने क्रांतीच घडवून आणली. आता गरज होती ती या यंत्रांना ऊर्जा देऊन गतिमान करण्याची. हेही आव्हान किर्लोस्कर ब्रदर्सने स्वीकारले आणि भारतीय उद्योगजगतात स्वयंचलित यंत्रयुगाला सुरुवात झाली. डीझेल इंजीन, कोलगॅस जनरेटर्स, विद्युत मोटर अशा स्वदेशी यंत्रांच्या साहाय्याने भारतीय उद्योगात चैतन्याचे वारे वाहू लागले, त्याला एक वेगळीच गती प्राप्त झाली. पंप आणि झडपा (व्हाल्व्ह्स) तयार करणारा सर्वांत मोठा भारतीय उद्योगसमूह म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स उदयाला आला.

     जागतिक युद्धकालीन परिस्थितीत भारतीय उद्योगांची अवस्था खूपच बिकट झाली होती. आमच्याकडे स्वदेशी तंत्रज्ञानाचा अभाव आणि ब्रिटिश सरकारने ब्रिटिश बनावटीची यंत्रसामग्री भारतात पाठवण्यास घातलेली बंदी अशा अवस्थेत किर्लोस्करचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या दृष्टीने भारतीय उद्योगपतीने ‘मशीन टूल्स’ तयार करण्याचा धाडसी निर्णय घेऊन ब्रिटिश सरकारला चकित केले. शेतीची अवजारे बनवणारे किर्लोस्कर, मशीन टूल्सकडे वळले हे भारतीय उद्योगजगतातील क्रांतिकारक वळणच म्हणायला हवे. यासाठी त्यांनी ‘हरिहर’ येथे ‘मैसूर किर्लोस्कर लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली. या कामी मैसूरचे महाराजा त्यांना हितचिंतक म्हणून लाभले. त्या वेळी तयार केलेली सातही ‘लेथ मशीन्स’ हातोहात विकली गेली.

     भारताची वाटचाल वसाहतवादाकडून स्वातंत्र्याकडे सुरू झाली. १९४० साली भारताचे राजकीय वातावरण बदलले. महाराजांच्या आशीर्वादाची आता गरज उरली नाही. भारताचे औद्योगिक धोरण बदलले आणि त्याचा किर्लोस्कर ग्रूपला खूपच मोठा फायदा झाला. शंतनुराव किर्लोस्कर यांनी अखेर पुणे गाठले आणि डीझेल इंजीन तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. उद्योग उभारण्यासाठी पुणे येथे जमीन मिळविण्यासाठी त्यांना जनतेच्या विरोधाला आणि नोकरशाहीवृत्तीला तोंड द्यावे लागले. माणसापेक्षा उद्योगधंद्यांचे आयुष्य दीर्घकालीन असते असे लोकांना पटवून शंतनुरावांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड’साठी जागा मिळवली. यासाठी त्यांना ‘असोसिएटेड ब्रिटिश ऑइल इंजीन एक्स्पोर्ट लिमिटेड’ या इंग्लंडच्या कंपनीशी करार करावा लागला. या करारानंतर तब्बल एका वर्षाने किर्लोस्करांना जागा ताब्यात मिळाली. परदेशी कंपनीशी करार करून तंत्रज्ञानाची दरी ‘टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर’द्वारा भरून काढण्याचा प्रयत्न करणारा पहिला भारतीय उद्योगपती म्हणून शंतनुरावांचे नाव घ्यायला हवे. १९४६ साली किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड कंपनी अस्तित्वात आली आणि या कंपनीने भारताला पहिले स्वदेशी असे ‘व्हर्टिकल हाय स्पीड इंजीन’ प्रदान केले. हे पहिले इंजीन खरेदी करणारे ब्रिजलाल सारडा यांनी ४० वर्षे हे इंजीन उत्तम चालल्याची पावतीसुद्धा दिली आहे.

     विद्युत मोटारी तयार करणे हे लक्ष्मणरावांचे स्वप्न होते, ते १९४६ साली पूर्ण झाले. लक्ष्मणरावांचा धाकटा मुलगा रवी याने १० हेक्टर जागेवर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड उद्योग सुरू केला. पुढे १९५८ साली एअर कॉम्प्रेसर्स तयार करण्याचा परिपूर्ण कारखाना शंतनुरावांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत यांनी समर्थपणे सांभाळला. इंग्लंडच्या ब्रूम अ‍ॅण्ड वेड या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडने एअर कॉम्प्रेसर्स आणि न्यूमॅटिक साधनांचे उत्पादन सुरू केले.

     आज अमेरिकेच्या ‘ट्वि डिस्क’ या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिकने टॉर्क इन्व्हर्टर्स, मरीन गिअर बॉक्स आणि रेल ट्रॅक्शन ट्रान्समिशन्स यांचेदेखील उत्पादन सुरू केले आहे. आता मात्र किर्लोस्कर उद्योगाच्या एवढ्या प्रचंड ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याचा उपयोग भारतातील  उदयोन्मुख उद्योजकांना होणे गरजेचे होते. यातूनच १९६३ साली ‘किर्लोस्कर कन्सल्टंट्स लिमिटेड’ ही कंपनी उदयाला आली. गेल्या २५ वर्षांत किर्लोस्कर समूहाने संरक्षण, पर्यावरण, रस्ते आणि शेती या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. १९६४ साली किर्लोस्कर समूहाने सेवा उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. ‘पुणे इंडस्ट्रियल हॉटेल लिमिटेड’ कंपनीतर्फे पुण्यात ‘हॉटेल ब्लू डायमंड’ आणि कोल्हापुरात ‘हॉटेल पर्ल’ सेवाक्षेत्रात रुजू झाले. यातूनच पुढे ‘बेकर्स बास्केट कन्फेक्शनरी चेन’ आणि ‘हॉटेल अ‍ॅण्ड कॅटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या सेवा संस्था अस्तित्वात आल्या. आज शेती, पाणीपुरवठा, ऊर्जा आणि शेतकीकरण या क्षेत्रांत किर्लोस्कर समूहाने कमावलेल्या नावाचे श्रेय शंतनुराव किर्लोस्कर यांनाच जाते.

     किर्लोस्कर उद्योग समूहाचा व्याप त्यांनी देशी-परदेशी वाढवल्याने ते केवळ किर्लोस्कर समूहाचे नेते नव्हते, तर पुण्यात ज्यांना उद्योग करायचा, त्या सर्वांना ते सल्ला देत. त्यासाठी त्यांनी वेगळे खातेच सुरू केले होते. ते वेगवेगळ्या वीस कंपन्यांच्या संचालक मंडळांवर होते. १९६५-१९६६ साली भारतीय उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. ‘बोर्ड ऑफ ट्रेड’वर ते सल्लागार होते. ‘इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शिक्षणसंस्थेचे ते १५ वर्षे अध्यक्ष होते. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

- डॉ. रंजन गर्गे

किर्लोस्कर, शंतनू लक्ष्मण