कोरे, विश्वनाथ आण्णाप्पा
श्री वारणा सहकारी साखर कारखान्याचे जनक, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे संस्थापक, वारणा सहकारी उद्योगाचे शिल्पकार आणि वारणा खोर्याचे भाग्यविधाते अशी तात्यासाहेब कोरे यांची ओळख आहे. त्यांचा जन्म पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या पारगावी झाला. त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई होते. त्यांनी काशी या मुलीच्या पाठीवर दोन वर्षांनी जन्मलेल्या मुलाचे नाव विश्वनाथ ठेवले. भागीरथीबार्ई यांचे 1918 मध्ये प्लेगच्या साथीत निधन झाल्यावर विश्वनाथचा सांभाळ त्याच्या कृष्णाकाकूंनी केला.
तात्यासाहेब कोरे यांचे काका बळवंत आणि वडील आण्णाप्पा यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी कोडोलीत किराणा मालाचे दुकान काढले. त्यात जम बसताच लोकांची गरज ओळखून त्यांनी व्यवसाय वाढवला व सावकारी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या दुकानावर 1923 मध्ये 40 हजारांचा दरोडा पडला. परंतु त्यातही खचून न जाता त्यांनी पुन्हा दुकानांची मांडामांड केली.
विश्वनाथ याला वयाच्या सातव्या वर्षी 1921 मध्ये कोडोलीच्या सरकारी शाळेत घातले. ही शाळा व्हर्नाक्युलर फायनलपर्यंतच होती. लहान वयातच विश्वनाथला वडिलांकडून व्यावहारिक शिक्षण मिळाले. तसेच वडिलांनी त्याला रामायण, महाभारत, शिवलीलामृतादी धार्मिक ग्रंथांच्या वाचनाची गोडी लावली व सुंदर हस्ताक्षराचे वळणही लावले.
विश्वनाथ 1927 मध्ये सहावी उत्तीर्ण झाला. सातवीच्या परीक्षेसाठी श्रीधरपंतांच्या शाळेत जाऊ लागला. तेथे त्यांच्यावर राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. देशभक्त श्रीधरपंत गावाच्या रोषाला बळी पडल्यामुळे ते गाव सोडून गेले व गावातील एकमेव इंग्रजी शाळा बंद पडली. त्यामुळे विश्वनाथ आपल्या धाकटया भावासोबत (दिनकर) नोव्हेंबर 1929 पासून सांगली रेल्वे स्टेशनजवळच्या क्षीरसागरांच्या प्रीपरेटरी वर्गाला जाऊ लागले. त्यावेळेस प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने विश्वनाथला चौथी व पाचवीचा अभ्यास एकाच वेळी करायची परवानगी मिळाली. सहाच महिन्यांच्या तयारीने तो जून 1930 मध्ये सांगलीच्या विद्यालयात सहावीच्या वर्गात बसू लागला. पुढे विश्वनाथ मॅिॅट्रAकच्या वर्गात असताना त्याचे बळवंत काका कर्करोगने दगावले. या धक्क्याने त्याचे वडील आण्णाप्पा कोलमडले व मानसिक संतुलन गमावून बसले. कौंटुबिक जबाबदारी अंगावर पडल्यामुळे 19 वर्षांच्या विश्वनाथला मॅिॅट्रAकची परीक्षा सोडून कोडोली गावी परतावे लागले. त्यावेळेस परीक्षा देता न आल्याचा सल त्यांच्या मनात कायम राहिला. काकांच्या मृत्यूनंतर गिर्हाईक घटू नये म्हणून आण्णाप्पांनी सावकारी हाताबाहेर जाण्याइतकी भरमसाठ वाढवली. बारा हजार रुपयांचे कर्ज केले. ते फेडणे गरजेचे होते. त्यातच कुळांना शेतीसाठी दिलेले कर्ज वसूल होत नव्हते. कुळांकडून घरच्या जमिनीचे खंडही मिळत नव्हते. या सगळया परिस्थितीत वाद-विवाद व अनेक सकंटांना सामोरे जावे लागले. तसेच कर्ज वसुलीसाठी 50-55 दावे लावावे लागले. त्यामध्ये यशस्वी झालेल्या विश्वनाथ कोरे यांना व्यवहारातील बारकावे कळले. तेव्हा त्यांच्या जरबेने कुळे व्यवस्थित वागू लागली. तेव्हापासून विश्वनाथचा तात्यासाहेब झाला.
तात्यासाहेबांचा विवाह 1934 मध्ये बेडगकर वीरसंगाप्पांच्या मुलीशी-सावित्रीशी झाला. तेव्हा घरच्यांनी लौकिक प्रपंचाचा भार सांभाळून तात्यासाहेबांना समाजसेवेसाठी मुक्त केले हे विशेष.
तात्यासाहेब यांनी 1935 मध्ये कोडोलीच्या सर्वोदय विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सभासदत्व स्वीकारून समाजसेवेचा श्री गणेशा केला. तेव्हा ती संस्था ‘ड’ वर्गात असून मोडकळीस आलेली होती. तिचा कारभार त्यांनी 15 वर्षे सांभाळला. यातूनच तात्यासाहेबांमधला सहकारी कार्यकर्ता घडला. बँकेवर अवलंबून असलेली संस्था त्यांनी सभासदांच्या ठेवीतून आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी केली. कर्ज वसुली, पहिले कर्ज फेडताच 10-15 दिवसातच नवे कर्ज मिळण्याची सोय, व्याजात सूट इत्यादी पद्धतींचा अवलंब केल्याने संस्था वाढली व ती ‘अ’ वर्गात आली. या सर्व खटाटोपातूनच ‘सहकारी संस्था’ डबघार्ईला का येतात, त्यांच्या विकासासाठी कोणती पथ्ये पाळायला हवीत हे त्यांना उमगले. पैसा खेळता ठेवून सामाजिक उत्तरदायित्वाचा स्वीकार केला तरच देशाला आर्थिक स्वायत्तता येईल ही भूमिका त्यांनी पुढील जीवनात कायम ठेवली.
तात्यासाहेब 1940 मध्ये कोडोलीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. त्या कारकिर्दीत त्यांनी स्वस्त धान्य दुकानाचा यशस्वी प्रयोग केला. त्यासाठी ‘भांडवल अन् तूट फंड’ योजना आखली. तेव्हा त्यांना नगीनदास गुजर या भांडवलदाराचा विरोध झाला पण तो त्यांनी बहिष्काराद्वारे मोडून काढला. तसेच त्यांनी देशभक्तीच्या भावनेतून 1942 च्या चळवळीतील अनेक भूमिगतांना आश्रय देण्यासाठी स्वतःच्या डागमळ्याचा उपयोग केला.
तात्यासाहेब 1940 ते 1954 या कालावधीत शिक्षण कार्यात गुंतले. कोडोली विभागात शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रत्येकी रु. 50 ची देणगी घेऊन विद्यार्थी साह्यनिधी उभारला. 10 जून 1946 रोजी कोडोली विद्यालय हायस्कूल सुरू केले. त्यांनी शिक्षकांचे पगार नियमितपणे महिन्याच्या 5 तारखेच्या आत देण्याची व्यवस्था केली. ह्या सर्व दगदगीत 1943 मध्ये त्यांना जिवावरच्या दुखण्याशी सामना करावा लागला. त्यांनी 1947 मध्ये कोडोलीत अभूतपूर्व सहभोजनाचा यशस्वी प्रयोग करून अस्पृश्य निवारणाला चालना दिली.
मानवी हिताला मदत करण्याइतकाच यंत्राचा उपयोग करून सामाजिक नीतिमूल्यांची जाण असणारा, सामाजिक बांधिलकी मानणारा ‘नवा माणूस’ त्यांना वारणाकाठी घडवायचा होता. हा ‘नवा माणूस’ पराकोटीचा प्रामाणिक, अभ्यासू, निष्ठावंत आणि तळमळीचा असावा हा त्यांचा ध्यास होता. कार्याला आर्थिक दृष्टीच्या जोडीने नैतिक बैठकही असायला हवी म्हणूनच त्यांनी सहकारी चळवळी उभारण्याचे काम केले. ‘विना सहकार, नही उद्धार’ च्या जोडीला ‘विना संस्कार, नही सहकार’ अशी त्यांची धारणा होती. त्यानुसारच कोरे यांनी साखर कारखान्याच्या जोडीनेच सर्व प्रकारचे प्रकल्प राबवून वारणा खोर्याचा कायापालट केला.
गुळाच्या धंद्याला 1951 मध्ये कल्पनातीत मंदी आल्याने कोडोली येथे सहकारी साखर कारखाना काढण्याची ऊर्मी कोरे यांना आली. त्यासाठी तात्यासाहेब मोहिते मदत करणार असल्याने भांडवल जमवण्यासाठी त्यांनी कोडोली परिसरात दौरा काढून एक लाख रुपये भांडवल जमवले. परंतु तेल गिरणी प्रकरणात गुंतलेल्या मोहित्यांनी माघार घेतली. परिणामी कोरे यांना कारखान्याची कल्पना सोडावी लागली व जमा केलेले भांडवल प्रत्येक सभासदाला परत करावे लागले.
भारत सरकारने 1954 मध्ये देशातील साखर उत्पादनातील तूट भरून काढण्यासाठी देशात तेवीस नवे साखर कारखाने काढण्याचे ठरविले. त्यावेळच्या मुंबई प्रांतात साखर उत्पादनाला अनुकूल परिस्थिती होती. म्हणून येथे बारा साखर कारखाने काढायची परवानगी मिळाली. त्यामुळे कोरे यांनी पुन्हा नव्या जोमाने भांडवल जमा केले आणि अथक प्रयत्नांनंतर 1 नोव्हेंबर 1959 रोजी यशवंतराव चव्हाण यांंच्या हस्ते ऊसाच्या गव्हाणीची पूजा करून कारखान्याचा शुभारंभ झाला.
कारखाना स्थापन झाल्यावर कामगार वसाहतीची गरज निर्माण झाल्यामुळे त्यांच्या उभारणीची जबाबदारी कोरे यांनी स्वीकारली. तसेच शिपाई व अधिकारी यांच्यातील विषमता टाळण्यासाठी समान दिसणारी, समान सोयींनी युक्त अशी घरे बांधून समानता आणली. वारणा नगरमध्ये कामासाठी येणार्या सभासदांसाठी शेतकरी निवास बांधण्याचे कामही त्यांनी केले. या शेतकरी निवासात मोठे सभागृह, जेवणखोली अशी व्यवस्था आहे. त्यात सर्वसामान्य शेतकर्यांच्या सोयींचा विचार सूक्ष्मपणाने आणि जिव्हाळ्याने केला. कामगारांचे आरोग्यसंवर्धन आणि रोगनिवारण करण्याच्या हेतूने कॉटेज हॉस्पिटलची योजना कोरे यांनी राबवली. तेव्हा त्यांनी मूकबधिरांसाठी शिबिरे भरवण्याचे काम केले. कामगारांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कोरे यांनी कामगार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापनाही केली. त्याद्वारे स्वस्त धान्याचे सरकारमान्य दुकान, साखर विक्री केंद्र, लाकूड कोळसा वखार, गॅस पुरवठा केंद्र, पीठ गिरणी, कापड दुकान, विविध वस्तू भांडार इत्यादी चालवले जातात. त्याचबरोबरीने ही संस्था शेतकर्यांना अडीअडचणीच्या प्रसंगी मर्यादित कर्जपुरवठाही करते. त्यांनी श्री वारणा सहकारी बँक सुरू केली व त्या जोडीला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वारणानगर येथे शाखाही काढली.
कोरे यांनी डाक तारघर, दूरध्वनी संचरण केंद्र, विद्युतवितरण केंद्र इ. सोयी गावात सुरू केल्या. त्यांनी वारणा सहकारी कोंबडी पालन संघ, कुक्कुटपालन केंद्र, प्रायोगिक क्षेत्र इ. विविध प्रकल्प राबवून सामाजिक विकास घडवण्याचे काम केले.
वारणा परिसराची आर्थिक उन्नती साधतानाच कोरे यांनी श्री वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळाची स्थापना करून लोकांमध्ये विधायक कामांद्वारे स्वत:ची व समाजाची सर्वांगानी प्रगती करून घ्यायची वृत्ती जागृत करण्याचे कामही केले. त्यांनी उपसा जलसिंचन योजना, सावर्डे-लाखडे वारणा शेती पाणीपुरवठा योजना, तळसंदे पारगाव जलसिंचन योजना, संकरित ज्वारी उत्पादन प्रकल्प, दुग्ध प्रकल्प, कागद प्रकल्प इ. उपयुक्त प्रकल्प सुरू केले. त्याचबरोबरीने त्यांनी शैक्षणिक कार्य हाती घेऊन बालवाड्या आणि किसान साक्षरता योजना राबवली. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी वारणा नगर संघ येथे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले.
शैक्षणिक विकास साधण्यासाठी त्यांनी 1964 मध्ये श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ स्थापन केले. या संस्थेच्या अंतर्गत 20 जून 1964 रोजी त्यांनी श्री वारणा महाविद्यालय स्थापले. या महाविद्यालयात कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. तेथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा इ. सर्व सोयी दूरदृष्टी ठेवून केल्या आहेत.
वारणा परिसरात सहकारी चळवळ उभारणे अत्यंत जिकिरीचे होते. पण कोरे यांनी आपल्या योजनाबद्ध श्रमांनी सहकारी चळवळ तेथे रुजवली.
ग्रामीण स्त्रियांनाही उद्योग मिळावा म्हणून महिला गृहोद्योग आणि लिज्जत पापड यांची वारणा शाखा सुरू करण्यात आली. चौफेर योजना आखून, त्या यशस्वीपणे राबवून वारणाकाठचा परिसर समृद्ध करण्यासाठी कोरे यांनी अथक परिश्रम घेतले.
सहकार क्षेत्रात कोरे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना वसंतराव नाईक कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान, बॉम्बे डेअरी डेव्हलपमेंटसाठी प्रथम पुरस्कार; नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि. न्यू दिल्लीचा, उत्तम कार्यक्षमतेसाठी प्रथम पुस्कार (1988-89); भारत सरकार अन्न व नागरी पुरवठाखात्याचा देशांतर्गत कमीतकमी तोटा व कर बचतीसाठीचा पुरस्कार; यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी प्रथम पुरस्कार; फाय फाऊंडेशनचा ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक विकासासाठी पुरस्कार; रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3140 : (1992) इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित केले. याशिवाय तात्यासाहेबांच्या प्रेरणेने तयार झालेल्या ‘वारणाबालवृंदा’ला आंतरराष्ट्रीय बालसंमेलनात सुवर्णपदक मिळाले. ही प्रवेशपत्रिका इंदिरा गांधी यांनी पाठविली होती.
आयुष्याच्या उत्तरार्धातही कार्यमग्न असणार्या तात्यासाहेब कोरे यांनी 1947 मध्ये आपल्या वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी ‘मी : एक कार्यकर्ता’ या आत्मचरित्रात आयुष्याचा लेखाजोखा शब्दबद्ध केलेला आहे. ते अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले होते.