Skip to main content
x

कोरिया, चार्ल्स मार्क

     चार्ल्स मार्क कोरिया यांचे घराणे गोव्यातील. त्यांचा जन्म सिकंदराबाद येथे झाला. शिक्षणासाठी ते मुंबईत आले. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम त्यांनी ‘सेंट झेवियर्स’ या शिक्षणसंस्थेत पूर्ण केला. वास्तुशिल्पकलेच्या पुढील अध्ययनासाठी त्यांनी अमेरिकेतील मिशिगन येथे प्रवेश घेतला. नंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ‘मास्टर्स’ पदवी घेतली. १९५८ साली त्यांनी मुंबईत वास्तुविशारद म्हणून व्यवसायास सुरुवात केली. त्यांच्या एकापेक्षा एक अप्रतिम व उत्कृष्ट वास्तू भारतात व जगभर पाहावयास मिळतात.

     एका वेगळ्या शैक्षणिक वातावरणातून व दृष्टिकोनातून आलेल्या विशीतील तरुणाला मुंबईच्या फोर्टमधील हॅन्डलूम हाउसचे छोटेसे इंटिरियरचे काम मिळाले. त्यातून त्यांनी आपले वेगळेपण व कल्पकता निदर्शनास आणून दिली. पाश्चिमात्य शिक्षण घेऊन आलेल्या कोरियांनी तेथील आधुनिक वास्तुकलेशी फारकत घेतली. येथील संस्कृतीशी, हवामानाशी व आर्थिक बंधनाशी निगडित अशा वास्तू उभारण्याचे त्यांनी व्रत घेतले.

     परंपरागत बांधकामाच्या प्रदीर्घ व सखोल निरीक्षणात्मक अभ्यासातून आधुनिक वास्तुकलेची संकल्पना विचारांती संपुष्ट होत गेली. ते त्यांचे स्वत:चे विचार होते. त्यामुळे त्यांची वास्तुशिल्पकला ही कोणा इतरांसारखी वाटत नाही, तर ती कोरियांचीच वाटते. वास्तुकलेला त्यांनी नवा संदर्भ दिला. ती पारंपरिक ढाच्याची वाटत नाही. तरीपण त्या विचारांची अभ्यासाशी जोड असल्याचे स्पष्ट दिसते. काही पाश्चिमात्य वास्तुविशारदांनी भारतात उभारलेल्या अपकृतीसारखी वाटत  नाही. ती भारतीय मातीतून उभारलेली वाटते. त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे, १९६३ साली त्यांचे पहिलेवहिले नावाजलेले साबरमतीमधील गांधी स्मारक संग्रहालय. त्याने साबरमती नदीच्या काठावर गांधी आश्रमाच्या वातावरणाशी, गांधीजींच्या सत्य व अहिंसेशी सरळ व साधे नाते जोडले. अनेक चौरस दालने एकमेकांशी मोकळ्या किंवा जलमय चौकोनांनी सांधलेली आहेत. विटांच्या खांबावर उभारलेली कौलारू छपरे नावीन्यपूर्ण आकार घेतात. त्यातून एक शांत, गंभीर वातावरणाची अनुभूती येते. यावर पाश्चिमात्य वास्तुकलेचा प्रभाव तसूभरही जाणवत नाही. आपली वास्तुकला आपल्या संस्कृतीवर व जनमानसावर आधारित असावी, ही त्यांची दृढ निष्ठा सिद्ध होते. या त्यांच्या पहिल्याच प्रकल्पाने त्यांना अपूर्व कीर्ती प्राप्त करून दिली. कोरियांच्या वास्तुकलेच्या व्यवसायाची वाटचाल व राष्ट्रप्रगतीचा काळ समांतर राहिला.

     ब्रिटिश साम्राज्याच्या दीडशे वर्षांच्या काळात संवेदनशील कलाकृती निर्माण झाली नाही. येथील वास्तुकलेला आलेली मरगळ, आपल्या संस्कृती व समृद्ध वास्तुकलेविषयीची उदासीनता कधी संपेल अशा मानसिकतेत वास्तुविशारद असताना, चार्ल्स कोरिया, बाळकृष्ण दोशी, अच्युत कानविंदेंसारख्यांनी वास्तुकलेत चैतन्य आणले.

     संस्कृती, हवामान, वातावरण, स्थानिक साधनसामग्री या संदर्भात अवकाशनिर्मितीच्या विषयाचा विचार व सर्जनशील संकल्पना यांवर त्यांच्या कलाकृती नावारूपाला येऊ लागल्या. भोपाळमधील ‘विधानसभा भवन’ ही त्यांपैकी एक लक्षणीय वास्तू म्हणावी लागेल. थोड्या अंतरावरील प्रसिद्ध बौद्ध स्तूपाचा गोलाकार या संदर्भातून या भवनाची संकल्पना साकारली गेली व तिला गोलाकार बाह्यरूप प्राप्त झाले. वास्तूच्या अंतरंगाचे निरीक्षण करताच अवकाशाचे वेगळेच रूप दृष्टीस पडते. घुमटामधील मोकळ्या सोडलेल्या जागेतून येणारी प्रकाशकिरणे अंतरंग सचेतन करतात. कोरियांनी प्रकाशाबरोबर साधलेला मेळ किती परिणामकारक होऊ शकतो, याची जाणीव होते. या उत्कृष्ट कलाकृतीला आगाखान पारितोषिक मिळाले.

     उष्ण कटिबंधातील मॉरिशस या बेटावर आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाच्या वास्तुसंकल्पनेत, हैदराबादच्या ई.सी.आय.एल. कार्यालय, चेन्नईच्या एम.आर.एफ. कार्यालय येथे छायाप्रकाशाचा प्रयोग परिणामकारक झालेला दिसतो. छतावर थोड्या-थोड्या अंतरावर ठेवलेल्या काँक्रीटच्या तुळईच्या छायारेषा सूर्यप्रकाशात एक अद्भुत परिणाम करून जातात. छाया - प्रकाशाचा विलोभनीय खेळ ते आपल्या वास्तूत सहज हाताळतात. यातून विविध प्रतिमा पाहावयास मिळतात.

     जयपूर येथील जवाहर कला केंद्राची संकल्पना अठराव्या शतकातील विद्याधर या नगर-रचनाकाराच्या शहर मांडणीवर आधारित आहे. उत्स्फूर्त, वेगळेच आकृतिबंध या त्यांच्या कामातून दिसतात. त्यात त्यांच्या विचारांची झेप दिसते. नऊ चौकोनांत नवग्रह मंडळ व मध्यभागी सूर्यकुंड असा प्रतिमात्मक आलेख येथे आयोजिला आहे. वास्तुपुरुषमंडलाशी संबंधित या वास्तूला वेगळीच प्रमाणबद्धता दिसून येते. त्यांच्या इतरही वास्तू नावीन्यपूर्ण वाटल्या, तरी परकीय वाटत नाहीत.

     दिल्लीतील ब्रिटिश कौन्सिलची वास्तू अशीच डोळ्यांत भरण्यासारखी आहे. वैदिक काळातील कुंडाची कल्पना, मोगलांचे चारबाग, पाश्चिमात्यांचा विज्ञानावरील भर यांचा सुंदर मिलाफ प्रतीत करणारी संकल्पना येथे साकार झाली आहे. या प्रकल्पाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे दर्शनी भागावर चितारलेले वटवृक्षासारखे म्युरल. पुण्यातील ‘आयुका’ प्रकल्प असाच मध्यवर्ती पाषाणकुंडाभोवती उभारला आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास व संशोधनकार्य चालणाऱ्या या संस्थेची वास्तू त्यांच्या कल्पकतेची व प्रतिभेची उत्तुंगता दाखविते.

     आकाशाशी जडलेले कोरियांचे नाते त्यांच्या गृहरचनेत पाहावयास मिळते. मोकळ्या निळ्या आकाशाशी भारतीयांचा संबंध अनादी काळापासूनचा आहे. त्यामुळे हा अजोड संबंध येथील वास्तुकलेशी निगडित आहे. ते तत्त्व त्यांनी संकल्पित केलेल्या सर्व गृहबांधणींत पाहावयास मिळते. मुंबईतील बहुमजली ‘कांचनगंगा’ ही धनिकांसाठीची गृहरचना, यात सुखसोयींबरोबर हवामान व आकाशाशी नाते या संकल्पनांचा अंतर्भाव दिसतो. ती अनेक मजल्यांवरील घरकुलेच, दोन-तीन बेडरूम्सचे फ्लॅट्स नव्हेत. त्यात उंच, सखल पातळीवरील दालने, तसेच दोन मजली उंचीची घराच्या परिघात गच्ची, ज्यातून स्वच्छ निळे आकाश पाहता येईल, पश्चिमेचा वारा इकडून तिकडे, सहज घरभर फिरावा, अशी खोल्यांची रचना केलेली आहे..

     चार्ल्स कोरिया हे नावाजलेले वास्तुशिल्पी आहेतच; पण ते एक निष्णात नगर-रचनाकारही आहेत. सर्वसामान्यांकरिता गृहनिर्माण व स्वस्त घरबांधणी हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. त्यांवरील स्वत:चे प्रगल्भ विचार त्यांनी वेळोवेळी प्रगट केले आहेत. लोकसंख्येचा ताण दुसऱ्या दिशेला वळविण्याच्या दृष्टीने मुंबई बेटाच्या पूर्वेकडील खाडीपलीकडे जुळ्या ‘नवी मुंबई’ या शहररचनेची संकल्पना वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांना सुचली. एक वास्तुविशारद व स्थापत्य अभियंता यांच्या  साह्याने त्यांनी ही योजना स्वयंस्फूर्तीने मांडली. ती पुढे महाराष्ट्र सरकारने मान्य करून हा एक शहररचनेचा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करून दाखविला. त्याला जगन्मान्यता प्राप्त झाल्यावर लिमामध्ये अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्पासाठी पेरू सरकार व संयुक्त राष्ट्र यांनी त्यांना आमंत्रण दिले.

     अमेरिकेतील ‘टाइम’ मासिकाने १९५४ साली जगातील १५० तरुणांची भविष्यातील ‘पुढारी’ म्हणून निवड यादी तयार केली होती. त्यात चार्ल्स कोरिया यांचा समावेश होता.

     राजीव गांधी पंतप्रधान असताना, त्यांनी ‘नॅशनल कमिशन फॉर अर्बनायझेशन’ या आयोगावर अध्यक्ष म्हणून कोरियांची नियुक्ती केली होती. कमिशनने सखोल अभ्यासातून एक उत्तम अहवाल सरकारला सादर केला होता.

     आर्टिस्ट कॉलन (बेलापूर), नवी मुंबई, सॉल्टलेक सिटी सेंटर (कोलकाता), जीवनभारती (नवी दिल्ली), कोवालम बीच रिसॉर्ट (केरळ), बे आयलंड रिसॉर्ट (अंदमान), एमआयटी परिसरातील नवीन संशोधन केंद्र, इमाईली सेंटर (टोरॅन्टो, कॅनडा) असे विविध बरेच कौशल्यपूर्ण प्रकल्प त्यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या व्यावसायीक जीवनात उभारले आहेत. त्यांच्या सर्जनशील वास्तुकलेबद्दल जगातील अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांत प्रामुख्याने आगाखान अवॉर्ड फॉर आर्किटेक्चर, प्रीमियम इंपिरियल पारितोषिक (जपान), रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्चर व इन्टरनॅशनल युनियन ऑफ आर्किटेक्चरची सुवर्णपदके यांचा समावेश होतो.

     वास्तुशास्त्राशी संबंधित अशा जगातील बहुतेक संस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे. भारतीय वास्तुकलेला विश्वप्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या वास्तुशिल्पीला भारत सरकारने ‘पद्मश्री’, व ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले. हा मान मिळालेले ते भारतातील पहिलेच वास्तुविशारद.

     शहररचना संदर्भात ते सामाजिक उन्नतीचे भाष्यकार झाले आहेत. एक द्रष्टा विचारवंत, बदलत्या काळाचे भान ठेवून वास्तुनिर्मिती व नगर नियोजन करणारा प्रवर्तक, एक उत्तम लेखक, उच्च प्रतीचा शिक्षक व प्रतिभावंत, अशी त्यांची प्रतिमा आहे. विकसनशील तिसऱ्या जगाचे वास्तुकला, नगररचना यांचे ते प्रवक्तेच झाले होते. मुंबई इथं १६ जून २०१५ साली त्यांचं निधन झालं.

     - चिंतामण गोखले

कोरिया, चार्ल्स मार्क