Skip to main content
x

कोरपे, वामन रामकृष्ण

अण्णासाहेब कोरपे

     वामन रामकृष्ण कोरपे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील निमखेड बाजार या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव चंद्रभागा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळोद, अमरावती, दर्यापूर आदी ठिकाणी झाले. नंतर त्यांनी काशी हिंदू विद्यापीठात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व पुढे तेथेच अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. महात्मा गांधींच्या आवाहनानुसार 1942 मध्ये स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने महाविद्यालय बंद पडले आणि सर्व विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. नंतर कोरपे यांनी एक वर्ष घरच्या शेतीत लक्ष घातले व 1943 मध्ये अभियांत्रिकी सोडून इंदोर येथे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘किंग एडवर्ड मेडिकल स्कूल’ मध्ये प्रवेश घेतला. ते 1948 मध्ये एल.एम.पी.ची पदविका घेऊन उत्तीर्ण झाले आणि त्यांचा विवाह 12 जुलै 1948 रोजी कुसुम सपकाळ यांच्याशी झाला.

     कोरपे यांनी 1949 मध्ये अकोला येथे वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला. या क्षेत्रातील संघटनात्मक कामातही रस घेऊन नंतर ते अकोला वैद्यकीय संघटनेचे सचिव झाले व पुढे त्यांनी या संघटनेचे अध्यक्षपदही सांभाळले. त्यांनी 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नंतर द्विभाषिक राज्याची निवडणूकही लढवली. त्यांनी 1958 मध्ये सहकारी क्षेत्रातील पहिल्या आदर्श सहकारी वसाहतीची (को-ऑप.हौ.सोसा) अकोला येथे स्थापना केली.

     शेती, शेतकरी व एकंदरच ग्रामीण जीवन हा कोरपे यांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय होता. समाजाप्रतीची बांधिलकी म्हणून ते 1960 पासून सहकारी चळवळीशी जोडले गेले. प्रथम त्यांनी ‘अकोला जिनिंग प्रेसिंग को ऑप फॅक्टरी लि.’ ची स्थापना केली. त्यांनी 1962 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सभासदत्व घेऊन अकोला जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ या जिल्ह्यातील अग्रणी बँकेचे कोरपे 1963 मध्ये सचिव झाले तर 1966 पासून 1993 पर्यंत सतत 27 वर्षे त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. या काळात शेती पूरक व कृषी उद्योगीकरणासाठी बँकेने अनेकविध योजना राबविल्या. तसेच बँकेने जलसिंचनाच्या विविध योजना राबवून त्याद्वारे जिल्ह्यातील 9000 एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आणले आणि पीक कर्जपुरवठा, दुग्ध व्यवसाय योजना, इतर पूरक व्यवसायांना कर्जाची उपलब्धता, तेलबिया वाढीसाठी विशेष कार्यक्रम तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना दिली. त्यांच्या कारकीर्दीत विविध शहरांमध्ये बँकेच्या एकूण 77 शाखा सुरू झाल्या.

     कोरपे यांनी 1966 मध्ये ‘अकोला सुपरव्हिजन सोसायटी’ ही शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणारी संस्था सुरू केली. त्याच दरम्यान त्यांनी ‘अकोला जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी’ या संस्थेचीही स्थापना केली. या संस्थेमार्फत शेतकर्‍यांना शेती उपयोगी सर्व वस्तूंचा रास्त भावात पुरवठा केला गेला. त्यांची 1971 मध्ये महाराष्ट्र सहकारी फर्टिलाईझर व केमिकल्स लि., मुंबई या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

     जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था व ग्रामीण जनतेला रास्त भावात छपाई सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने कोरपे यांनी 1967 मध्ये अकोला जिल्हा सहकारी मुद्रणालयाची स्थापना केली. अकोला जिल्हा मराठा महामंडळ या बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणार्‍या संस्थेच्या कामात कोरपे 1964 पासून सक्रिय होते. त्यांची 1972 मध्ये या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली व पुढे त्यांनी हे कार्य सतत 15 वर्षे सुरू ठेवले. तेव्हाच त्यांनी आदर्श विद्यालयाची स्थापना केली. तसेच कोरपे यांची अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

     महाराष्ट्रात सर्वप्रथम संघटित शेतकरी चळवळ उभी करण्याचा मान अण्णासाहेब कोरपे यांनाच जातो. त्यांनी 50 हजाराच्या विराट मोर्चा काढून 1972 मध्ये महाराष्ट्राला शेतकर्‍यांच्या एकतेचे दर्शन घडविले आणि महाराष्ट्र कापूस संघाची स्थापना केली. या चळवळीत त्यांना तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. शेतकरी हिताची कापूस एकाधिकार योजना या चळवळीतून अस्तित्वात आली. शेतकर्‍यांच्या विविध न्याय्य मागण्यांकरिता कापूस संघाच्या माध्यमातून आंदोलने, मोर्चे, रास्ता व रेल रोको, अधिवेशने यांसारख्या कार्यक्रमातून त्यांनी ही चळवळ सतत क्रियाशील ठेवली. देशातील सर्व कापूस उत्पादकांना या चळवळीत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्या पुढाकाराने 1974 मध्ये अखिल भारतीय कापूस उत्पादक संघाची स्थापना झाली.

     दिल्ली येथे 1976 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय कृषी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कापूस अभ्यासक समितीचे अध्यक्षपद, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सदस्यत्वही भूषविले. त्यांनी 1988 मध्ये अकोला जिल्हा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. ते 1995 मध्ये विदर्भ सहकारी संस्थेचे अध्यक्ष झाले.

    सहकार चळवळीला दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कोरपे यांचा 1976 मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते तर 1984 मध्ये लोकसभेचे सभापती व भारत कृषक समाजाचे अध्यक्ष बलराम जाखर यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र को. ऑप. बँक असोसिएशन लि. मुंबई तर्फे फेब्रुवारी 2005 मध्ये प्रतिष्ठित विष्णूअण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार देऊन कोरपे यांचा गौरव करण्यात आला.

    कोरपे यांच्या पत्नी कुसुमताई या 1957 ते 1967 या दहा वर्षांच्या काळात मूर्तिजापूर या मतदारसंघाच्या आमदार म्हणनू कार्यरत होत्या. कोरपे यांच्या ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या आत्मलेखनपर पुस्तकाचे मे 2005 मध्ये प्रकाशन झाले. महाराष्ट्र सहकारी चळवळीच्या जडणघडणीत गेल्या सुमारे चार दशकांहून अधिक काळ कोरपे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

- आशा बापट

कोरपे, वामन रामकृष्ण