Skip to main content
x

करंदीकर, मुकुंद महेश्वर

करंदीकर, नानासाहेब

     नानासाहेब, अर्थात मुकुंद महेश्वर करंदीकर यांचा जन्म ठाणे येथे जन्माष्टमीच्या दिवशी झाला. करंदीकरांच्या घरात देवभक्तीपेक्षा देशभक्तीचे वातावरण अधिक होते. त्यामुळे लहान वयातच नाना ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असत. शाखेत त्यांना राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळाले. घरात स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे संस्कार होतेच. त्यांचे घराणे सधन होते. त्यामुळे देशसेवा, समाजसेवा करण्यासाठी पुरेसा वाव आणि मोकळीक होती. जोडीला दानतही होती. ठाण्यातच शालेय आणि महाविद्यालयातील शिक्षणानंतर मुकुंदरावांनी खाजगी कंपनीत व्यवस्थापन विभागात अधिकारपदाची नोकरी काही काळ केली. ते चांगल्या प्रकारे नोकरीत रुळलेही होते आणि एक दिवस, १९६४ सालात त्यांना अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थांनी स्वप्नात दर्शन दिले आणि ‘लोकांमध्ये भक्तीचा प्रसार आणि प्रचार कर’ म्हणून सुचविले.

     या अनुभवातून नानांच्या मनात समर्थभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. इतकी, की त्यांनी मोठ्या आमदनीच्या नोकरीचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे ४१ वर्षांचे. त्यांचा विवाहही झाला होता; परंतु त्यांनी समर्थांच्या आदेशाप्रमाणे समर्थ विचारांचे प्रसारकार्य सुरू केले.

     दरम्यान, १९७६ सालात स्वामींनी नाना करंदीकर यांना पुन्हा एकदा दृष्टान्त दिला. तेव्हा नानांनी १९७६ साली ठाणे ते अक्कलकोट अशी पदयात्रा केली. त्यानंतर १९७९ सालातही त्यांनी ठाणे ते जगन्नाथपुरी ही दीर्घ पल्ल्याची पदयात्रा केली. ही पदयात्रा म्हणजे केवळ रस्त्यावरून पायी चालणे नव्हते, तर समर्थ विचारांचा जागोजागी प्रसार करणे हा हेतु-संकल्प त्यात होता. या दोन दीर्घ पदयात्रांनंतर १९८० साली नानांना गंभीर आजाराने घेरले. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु, ही स्वामींची परीक्षा होती. त्यातच पुन्हा एकदा समर्थांनी त्यांना स्वप्नात आदेश दिला. स्वामी समर्थांनी त्यांना मुंबईच्या आसपास एखादे देऊळ बांधायला सांगितले. त्यात वास्तव्य करण्याची इच्छाही स्वामींनी प्रदर्शित केली. त्यानुसार मग प्रकृतीस आराम पडू लागल्यानंतर नाना करंदीकर कामाला लागले.

     लोणावळा येथे १९८१ साली जमीन खरेदीचे सर्व व्यवहार पूर्ण करून १९८२ साली मंदिर उभारणीस सुरुवात करण्यात आली. या वास्तूत येऊन भाविकांना चिंतन आदी ध्यान-साधना करता यावी, अशी नाना करंदीकरांची संकल्पना होती. यामुळे या इमारतीला   ‘स्वामी भवन’ हे समर्पक नाव देण्याचे ठरले. या भवनाच्या उभारणीत पैशांची अडचण कधीच आली नाही. नानांनी पदयात्रेतून हजारो स्नेही, भाविक निर्माण केले होते. त्या सार्‍यांच्या योगदानातून पैसे, भांडी, वस्तू हा हा म्हणता गोळा झाल्या.

     स्वामी भवनात साधक, भक्तांच्या ध्यानसाधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून घंटा बसविलेली नाही. १०० किलो वजनाची शुद्ध तांब्यातील आजानुबाहू स्वामी समर्थांची जिवंत वाटणारी, सहा फुटांहून अधिक उंचीची मूर्ती, ६० X ९० चौरस फुटांच्या भव्य दालनात उभी केली आहे. श्याम सारंग हे या मूर्तीचे शिल्पकार आहेत. सारंग यांनी समर्थांच्या केवळ फोटोवरून मूर्ती घडवायचे ठरवले; परंतु ते समाधानी नव्हते. मूर्तीमध्ये परिपूर्णता येण्यासाठी स्वामींचे पाठमोरे दर्शन कसे होईल अशी तळमळ त्यांना लागली होती. तेव्हा स्वामी त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी स्वत:भोवती प्रदक्षिणा घालून सारंग यांना सर्वांग-दर्शन दिले.

     मंदिर पूर्ण झाल्यानंतर नाना करंदीकर यांनीच उद्घाटनासाठी १५ एप्रिल १९८४ हा हनुमान जयंतीचा दिवस सुनिश्चित केला. त्यापूर्वी नानांनी स्वत: ११ डिसेंबर १९८३ रोजी स्वामींच्या मूर्तीची पूजा केली. मंदिराची पुढे देखभाल आणि उपचार कसे असतील याची संहिताही नानांनी तयार करून ठेवली होती. मूर्तीवर पारंपरिक पद्धतीने अभिषेक न होता १०८ जपांनी व्हायला हवा. या प्रसंगी सोवळे-ओवळे, जाचक ठरणारे प्रकार बंद व्हावेत, तसेच भवनाचा मुख्य उत्सव स्वामी- जयंती म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया या समर्थांच्या जन्मदिनीच असेल, या काही मार्गदर्शक सूचना त्यांनी देऊन ठेवल्या होत्या.

    ‘स्वामी भवन’ जेव्हा सुरू झाले, त्या वेळी १३ कोटी जपांचा लेखन संकल्प केला गेला होता. परंतु, स्वामिभक्तांना याची बातमी कळताच हा आकडा २४ कोटींवर गेला. स्वामी भवनाच्या तळघरात हे जप-लेखन जपून ठेवले आहे. स्वामी मंदिराचे विधिवत उद्घाटन होण्यापूर्वीच नानांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीने नानांचे कार्य पुढे चालू ठेवले. नानांची स्मृती त्यांच्या भक्तांनी स्वामी भवनाशेजारी बांधलेल्या त्यांच्या समाधीतून जागृत ठेवली आहे. या समाधीसमोर ‘सकलजनहिताय’ हे स्वामी भवनाचे ब्रीदवाक्य कोरले असून नानांची तसबीर तेथे ठेवण्यात आली आहे.

संदीप राऊत

करंदीकर, मुकुंद महेश्वर