Skip to main content
x

क्षीरसागर, अशोक रामभाऊ

        शोक रामभाऊ क्षीरसागर उपाख्य बंडू क्षीरसागर यांचा जन्म पूर्व विदर्भातील भंडारा येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी आईला मदत करत आपल्या दोन भगिनींच्या सोबतीने भंडारा येथील मन्रो विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९६०मध्ये नागपूर येथील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (कृषी)च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. ते १९६४मध्ये पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत, नंतर १९६६मध्ये एम.एस्सी. (कृषी) प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले. पदव्युत्तर शिक्षणात संशोधनाचा विषय ज्वारी हा होता. त्याकरता नागपूरच्या कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक आर.जी.जोगळेकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे संशोधनाचे धडे पक्के झाले. त्या वेळी नर नपुंसकत्वाचा वापर करून ज्वारी पिकातील संकरित वाणनिर्मितीचे आर.जी. जोगळेकर आणि डॉ एम.ए.तय्यब यांचे कार्य संपूर्ण देशाला परिचित होते.

         क्षीरसागर यांची १९७९मध्ये अकोला येथील डॉ.पं.दे.कृ.वि.तील कडधान्य संशोधन विभागात नेमणूक झाली. त्यांनी १९८९मध्ये पीएच.डी. पदवी मिळवली. याकरता त्यांना प्रा. एकबोटे व डॉ. तय्यब या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. या काळात भाभा अणू अनुसंधान केंद्र, मुंबई या संस्थेबरोबर डॉ.पं.दे.कृ.वि.ने कडधान्य संशोधन कार्य एकत्रितपणे करण्याचा ठराव केला. तूर, मूग व उडीद या प्रमुख डाळवर्गीय पिकांतील निर्माण झालेले सुधारित वाण याचीच परिणती होय. त्यांनी विकसित केलेले तुरीचे टी.ए.टी.१० व ५, मुगाचे टी.ए.पी.७ व उडदाचे टी.ए.यू.१, ए.के.एम.८८०३ व हरभऱ्याचे ए.के.जी.४६ व गुलक वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले. त्यांनी १९८७ ते १९९३ या काळात तेलबियावर्गीय पिकांवर संशोधन कार्य केले. सूर्यफुलाचे पी.के.व्ही.एस.एच.२७ हे संकरित, तर ए.के.एस.एफ.९ हे सुधारित वाण आणि जवसातील एन.एल.९७ या वाणांची निर्मिती झाली. डॉ.तय्यब यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे डॉ.क्षीरसागर यांना संशोधनाची दिशा ठरवण्यास मदत झाली. दरम्यान तत्कालीन कुलगुरू प्रा.बथकल यांच्या विनंतीवरून साकोली येथे भात संशोधनास क्षीरसागर यांनी सुरुवात केली. तेथे त्यांनी पी.के.व्ही., एच.एम.टी. सिलेक्शन, साकोली - ८ व सिंदेवाही -२००१ वाणांच्या निर्मितीत प्रमुख योगदान दिले.

         डॉ.क्षीरसागरांच्या संशोधन कार्यातून निर्माण झालेल्या या सर्व वाणांची महाराष्ट्रात लागवडीकरता शिफारस केली गेली. यातील टी.ए.यू.-१ या उडीद पिकाच्या लागवडीखाली १९८६पासून महाराष्ट्रातील जवळजवळ ९० टक्के क्षेत्र आहे. या वाणाचा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची वाढ करण्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे ९ डिसेंबर २००६ ला महाबीजने केलेल्या शास्त्रज्ञांच्या सत्कार समारंभात कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डॉ.क्षीरसागरांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

          भंडारा जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी २०००मध्ये भात पिकांवरील किडी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झाले होते. याच काळात आय.पी.डब्लू. ६-१७ व ईश्‍वरकोरा या भातवाणांच्या संकरातून विकसित झालेले साकोली-८ हे बहुतांशी किडी व रोगांना प्रतिकारक्षम वाण भात संशोधन उपकेंद्र, साकोली येथे सर्व चाचण्या पूर्ण करून तयार झाले होते. एका खासगी कंपनीच्या संशोधन कार्यात ते मदत करतात. कृषीविषयक माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असलेल्या बिगरशासकीय संस्थांना जागतिक स्तरावरील अद्ययावत ज्ञानदानाचे कार्य ते करतात. लाखनी या तालुक्याच्या ठिकाणी नियमित होत असलेल्या वृक्षमित्र मंडळाच्या  कार्यक्रमात ते आवर्जून भाग घेतात.

- संपादित

क्षीरसागर, अशोक रामभाऊ